नवीन लेखन...

असे जगणे

मुकुंद अमेरिकेहून सुट्टीसाठी घरी आला होता. त्याला जेमतेम पंधरा दिवसांची सुट्टी मिळाली होती. घरात त्याचे आई वडील दोघेच होते. तो बघत होता की आई वडील घरातली सगळी कामे स्वतःच करत होते. रोज दूध आणणे, भाजीपाला आणणे, इस्त्रीचे कपडे टाकणे आणि घेऊन येणे आणि बँकेत जाणे.

मुकुंद वडीलांबरोबर बँकेत जायचे ठरविले. तिथे काम आटोपेपर्यंत जवळ जवळ एक तास गेला. घरी आल्यावर मुकुंद वडीलांना म्हणाला “एवढा वेळ बँकेत घालविण्याऐवजी मी तुम्हाला कॉम्प्युटरवर सगळे व्यवहार करायला शिकवतो. वाणी सामानापासून सर्व काही घरपोच येईल याचीही सोय करुन देतो. कधी आईला जेवण बनविणे शक्य झाले नाही तर आजूबाजूच्या हॉटेल्सची नावे व नंबर स्टोअर करुन ठेवतो. नुसते फोनवर सगळे मागवता येते. तुम्हीही आता नवीन तंत्रज्ञानाबरोबर दोस्ती करा. तुमचे आयुष्य फार सुखकर होऊन जाईल.

मुकुंदचे बोलणे ऐकून वडील काहीच बोलले नाहीत. त्यांनी मुकुंदकडून नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यायचे ठरविले. वडीलांनी बँकेचे व्यवहार व इतर गोष्टी कशा ऑर्डर करायच्या हे मुकुंदकडून शिकून घेतले. मुकुंदने त्यांना विचारले “झाली ना मस्त सोय? आता तुम्हाला घराच्या बाहेर पडावेच लागणार नाही.”

वडील हसले आणि म्हणाले “तू म्हणतोस ते बरोबर आहे. परंतु माझेही एकदा ऐकून घे. आपतकालीन सोय म्हणून तू शिकविलेले ज्ञान मला निश्चित उपयोगी पडेल. परंतु मी माझे रोजचे फिरणे थांबवू शकत नाही. त्याचे असे आहे की घरात आम्ही दोघेच असतो. वेळ कसा घालवावा आम्हाला कळत नाही. बाहेर जाण्याने आम्हाला चार माणसे भेटतात. आम्ही एकमेकांची प्रेमाने विचारपूस करतो. तुला माहित आहे, काही दिवसांपूर्वी तुझी आई कडक उन्हामुळे रस्त्यातच चक्कर येऊन पडली. आपल्या रोजच्या भाजीवाल्याने तिला पाहिले. आपला धंदा सोडून तो बिचारा आईला घेऊन घरी आला. तसेच बँकेमधल्या लोकांचे. मला काही अडचण असली तर ते मदत करतात. अडचण फक्त बँकेच्या व्यवहाराबद्दल असते असे नाही. कधी आपल्या वैयक्तिक अडचणी आपण त्यांच्याशी बोलतो. आम्ही नाहीतर कोणाशी बोलणार? ते आम्हाला मदत करतात, सल्लाही देतात. वेळ प्रसंगी तेच आमच्या उपयोगी पडतात.

आता तू मला सांग, तुझ्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये ही सेवा आहे काय? त्याच्यात कोणी तुमच्याशी प्रेमाने बोलते काय? तुमच्या अडल्या पडल्या प्रसंगी तुमच्या मदतीला कोणी येते काय? “जेवण झाले का आजोबा? ” एवढे देखील कोणी आपल्याला पुसते काय? अरे एवढा मोठा दिवस माणसांविना काढायचा तरी कसा? आणि समजा आमच्या दोघातला एक जण निवर्तला तर दुसऱ्याला आधार द्यायला ही माणसेच ना उपयोगी पडणार? तू तेथे लांब परदेशात रहातोस. तुझ्या परीने तू मेल लिहितोस, फोन करतोस. परंतु रोजच्या दिवसात आपल्या सोबतीला कोणीतरी लागतेच ना रे?

जोपर्यंत ही माणसे आहेत, त्यांच्याशी आपले अतूट नाते आहे तोवर हे जगणे सुसहय असणार आहे. एकदा या मशिन्सच्या नादी लागलो की एक विराण आयुष्य ‘उरेल. ज्यात माणूस नसेल. कोणी तरी येऊन माल टाकून जाईल, पैसे घेऊन जाईल. त्याला आमच्या सुख दुःखाशी काही देणे घेणे नसेल. म्हणून मी ‘तुझ्याकडून सगळे शिकून घेतले आहे. परंतु मी असाच जगणार आहे. माणसांमध्ये, प्रेमाच्या चार शब्दांसाठी.

— नीला सत्यनारायण

अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..