नवीन लेखन...

मराठीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे

मराठीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९४८ रोजी गडहिंग्लज येथे झाला.आशा काळे या मराठी नाट्यसृष्टीतल्या एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. आशा काळे मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचा जन्म गडहिंग्लजचा. आशा काळे यांचे वडील रावसाहेब काळे हे वनाधिकारी होते. शासकीय नोकरी असल्याने बदली ठरलेली. आई, वडील, मोठा भाऊ, धाकटी बहीण असे त्यांचे कुटुंब. रत्नागिरी, पाली, भोर, पुणे, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी त्यांचे बालपण गेले. शाळाही त्यामुळे वेगवेगळ्या झाल्या. लहानपणापासून त्यांना नाटक किंवा चित्रपटाची आवड नव्हतीच. नृत्याची विशेष आवड असल्याने बाळासाहेब गोखले आणि हजारीलाल यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय नृत्याचे (भरतनाटय़म्, कथ्थक) धडे घेतले. आठ-दहा वर्षांच्या असताना त्यांचे नृत्याचे कार्यक्रमही होत असत.

आईचे मामा अभिनेते प्रकाश इनामदार यांचे वडील आप्पासाहेब इनामदार हे यांच्या ‘कलासंघ’ संस्थेतही त्यांनी काम केले. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी देशाच्या संरक्षण निधीसाठी मदत म्हणून व्ही. शांताराम, बाबुराव पेंढारकर यांनी ‘शिवसंभव’ या नाटकाची निर्मिती केली होती. या नाटकात निजामशहाच्या दरबारातील एका प्रसंगात नर्तकीच्या भूमिकेसाठी ते मुलीचा शोध घेत होते. त्यांच्या वडिलांचा आणि पेंढारकर यांचा परिचय होता. पेंढारकर त्यांच्या घरी आले आणि आमच्या नाटकात तुमची मुलगी काम करेल का? असे विचारले. आशा भोसले यांनी गायलेल्या ‘गुलाबी ऑंखे है तेरी’ या ठुमरीवर नृत्य करायचे होते. आई-वडिलांनी परवानगी दिल्यामुळे नाटकात नर्तकी म्हणून आशा काळे यांनी काम केले. स्वत: बाबुराव पेंढारकर, बाळ कोल्हटकर आदी ज्येष्ठ कलाकार नाटकात होते.

त्यावेळी त्या १४ वर्षांच्या होत्या. त्या नाटकाचे पुढे १५ ते २० प्रयोग केले. त्यांची नृत्य आणि अभिनय कला बाबुराव पेंढारकर यांनी पाहिली आणि ‘नाटय़ मंदिर’ संस्थेच्या ‘सीमेवरून परत जा’ या नाटकातील भूमिकेसाठी विचारणा केली. आशा काळे यांचे पहिले व्यावसायिक नाटक, ‘सीमेवरून परत. याचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे होते. पुढे बाळ कोल्हटकर यांचे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ हे नाटक त्यांनी केले आणि या नाटकाने त्यांना ‘ताई’ अशी ओळख मिळाली.

आशा काळे यांनी वेगवेगळ्या नाटय़संस्थांच्या अनेक नाटकांमधून कामे केली. यात प्रामुख्याने ‘कलावैभव’, ‘अभिजात’, ‘नाटय़संपदा’, ‘सुयोग’ आदींचा समावेश आहे. ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय हे’, ‘घर श्रीमंतांचे’, ‘देव दीनाघरी धावला’, ‘लहानपण देगा देवा’, ‘वर्षांव’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘महाराणी पद्मिनी’ आणि अन्य काही त्यांची गाजलेली नाटके. ‘दुर्वाची जुडी’ चे ८४५, ‘गुंतता हृदय हे’ चे ८७५ प्रयोग त्यांनी केले. रंगभूमीवरून पुढे मराठी रुपेरी पडद्यावर त्यांचा प्रवेश झाला. भालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा त्यांचा पहिला चित्रपट. ‘गनिमी कावा’, ‘घर गंगेच्या काठी’, ‘कैवारी’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘सासुरवाशीण’, ‘थोरली जाऊ’, ‘ज्योतिबाचा नवस’, ‘बाळा गाऊ कशी अंगाई’, ‘कुलस्वमिनी अंबाबाई’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘माहेरची माणसे’ ‘सतीची पुण्याई’, ‘सतीचं वाण’ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांचे बहुतांश सर्व चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. राज्य शासनाच्या व्ही. शांताराम, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या ‘जीवनगौरव’ पुरस्कारासह त्यांना अन्य अनेक पुरस्कार आजवर मिळाले आहेत.

‘महाराणी पद्मिनी’ नाटकाच्या वेळचा एक किस्सा सांगताना त्या म्हणतात, दारव्हेकर मास्तरांनी तालमीच्या वेळी एक कागद दिला. त्यावर ‘शांतारामचा ससा आषाढात मेला, हे ऐकून सान्यांची शकू फार कष्टी झाली’ हे वाक्य लिहिलेले होते. खरे तर नाटकाचा आणि या वाक्याचा काहीच संबंध नव्हता. पण दारव्हेकर मास्तरांनी दिले म्हणून कोणताही प्रश्न न विचारता ते वाक्य पाठ केले. दुसऱ्या दिवशी त्यांना वाक्य पाठ केल्याचे सांगितले. तर हसून आणि लटक्या रागाने ते म्हणाले, अगं ते वाक्य पाठ करण्यासाठी दिले नव्हते.

तुझे शब्दोच्चार शुद्ध व स्पष्ट होण्यासाठी ते तुला दिले होते. ‘शांताराम’ मधील ‘श’चा उच्चार शहामृगाच्या ‘श’चा, ‘आषाढातल्या’ ‘ष’चा उच्चार पोटफोडय़ा ‘ष’चा. श, स, ष यातील फरक कळावा म्हणून ते वाक्य तुला दिले होते. आणि तुम्हाला सांगते त्या नाटकातील माझ्या ‘अश्रु पुसू शकेल अशा पुरुषासमोर स्त्रीने रडायचे असते’ या वाक्यावर प्रेक्षकांकडून मला कडाडून टाळी मिळायची. दारव्हेकर मास्तरांचे ते मार्गदर्शन मोलाचे ठरले. या सगळ्याचे मूळ कुठे तरी माझ्या लहानपणातही रुजले गेले. संध्याकाळी घरी आल्यानंतर दिवेलागणीच्या वेळेस घरातील लहान मुलांनी रामरक्षा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणण्याची आमच्याकडे पद्धत होती. ते स्तोत्रपठण मी तोंडातल्या तोंडात, पुटपुटत केले किंवा घाईघाईत म्हटले तर आई मला ओरडायची आणि अगं मोठय़ाने म्हण, स्पष्ट उच्चार कर असे सांगायची. आईच्या त्या ओरडण्याचाही पुढे फायदा झाला.

नियतीचा आणखी एक योगायोग सांगताना त्या म्हणतात, बाबुराव पेंढारकर यांचे मित्र आणि सिने फोटोग्राफर पांडुरंग नाईक ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाच्या एका प्रयोगाला आले होते. चित्रपट आणि नाटकांधील सोशीक, सहनशील मुलगी, सून, आई अशा भूमिका हीच त्यांची ओळख झाली. या पठडीतून बाहेर पडावेसे वाटले नाही का? यावर त्या म्हणाल्या, हो तसा प्रयत्न केला. ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट आणि ‘गहिरे रंग’, ‘महाराणी पद्मिनी’ या नाटकातील भूमिका पठडीपेक्षा वेगळ्या होत्या. सोशीक व सहनशील भूमिकांप्रमाणेच या वेगळ्या भूमिकेतही रसिकांनी मला स्वीकारले. माझे कौतुक झाले. या भूमिकाही गाजल्या. वेगवेगळे कंगोरे असलेल्या विविध भूमिका करायला मी तयार असले तरीही माझ्या ‘चेहऱ्या’मुळे सोशीक, सहनशील, सोज्वळ, सुसंस्कृत आणि कौटुंबिक प्रकारच्या भूमिकाच माझ्या जास्त प्रमाणात वाटय़ाला आल्या. अर्थात त्याचे मला अजिबात वाईट वाटत नाही. जे घडायचे ते घडले. पण या सर्व भूमिका मी अक्षरश: जगले. त्या जिवंत केल्या.

त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही मी तेव्हा आणि आजही ‘आपली’ वाटते. आई, ताई, मुलगी, सून असावी तर ‘आशा काळे’सारखी असे प्रेक्षकांना वाटायचे. माझ्या अभिनयाला मिळालेली ही दाद माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. पुढे फोटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे चिरंजीव माधव नाईक यांच्याबरोबर आशा काळे यांचा विवाह झाला. माधव नाईक हे लघुपट निर्माते-दिग्दर्शक आहेत. लग्नानंतर त्यांचे नाव गौरी माधव नाईक असे असले तरी त्या आशा काळे या नावानेच प्रसिद्ध आहेत. आशा काळे या सामाजिक कार्य आवडीने करत असतात. त्या अनेक वृद्धाश्रम, मूकबधिर, मतिमंद मुलांच्या शाळा येथे जातात. कर्करोगाच्या शेवटच्या पायरीवर असलेल्या रुग्णांना भेटतात. आशा काळे ‘भारती विद्यापीठा’च्या संचालक मंडळावर आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

माहेरची माणसे चित्रपट.

संसार चित्रपट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..