ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. कारण त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५५ मध्ये सांगली येथे झाला. त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. ही ऊर्जा मूळच्या गाण्यापेक्षा आशाताईंच्या अंतरातून आलेली असते. त्यामुळेच आशाताई जेव्हा एखादं गाणं गातात,तेव्हा ते तत्पूर्वी कुणीही गायलेलं असलं तरीही विलक्षण चैतन्यमय भासतं.
विशेष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीत्यांनी पहिली मैफल गाजवली तेव्हाची आणि आताची त्यांचीगायनातली ऊर्जा, यात बिलकूल फरक पडलेला नाही. अगदी लहान वयातच आशाताईंच्या घरच्यांनी त्यांना पं. बाळकृष्णबुवा मोहिते यांच्याकडे गाणं शिकायला पाठवलं आणि आशाताई गाण्यातच अक्षरशः रुजल्या.
तेराव्या वर्षी त्यांनी पहिली मैफल मारली; तर वयाच्या सतराव्या वर्षीच पं. भीमसेन जोशी, गानहिरा हिराबाई बडोदेकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या गायनातील मान्यवरांनी आशाताईंच्या गाण्याला नावाजलं आणि त्यांना पुण्यात मानाचा ‘बालगंधर्व पुरस्कार’ बहाल केला.
१९७५ मध्ये लग्नानंतर मुंबईस स्थलांतर केल्यावर आशाताईंनी ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांच्याकडे गायनाचे शिक्षण चालू ठेवले. पुढच्या काळात त्या ग्वाल्हेर घराण्याचे समर्थ गायक पं. यशवंतबुवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गायनकलेची आराधना करत होत्या.
आशाताईंनी वेगवेगळ्या संगीत घराण्यांना आपल्या गायनात समाविष्ट करून त्यातून आपले गाणे अधिक कसदार बनविले आहे. किराणा घराणे, ग्वाल्हेर घराणे व आग्रा घराणे यांच्या गायन शैलीची अनेक वैशिष्ट्ये आशाताईंच्या गायनात दिसून येतात. ‘घेता किती घेशील दो करांनी’ या न्यायाने माणिक वर्मा, पं. यशवंतबुवा जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. शंकरराव अभ्यंकर अशा विविध संगीत घराण्यातील गुरुंकडून गाण्याची तालीम घेतली. केवळ तालीम घेतली नाही, त्यात्या घराण्याची खासीयत आपल्या गळ्यात उतरवली आणि आपली अशी एक स्वतंत्र, काहीशी आक्रमक गायनशैली विकसित केली.
आशाताईंचं गाणं ऐकताना किराणा, ग्वाल्हेर व आग्रा घराण्याची गान वैशिष्ट्यं आढळून येतात, ती त्यामुळेच. त्यांनी गायलेल्या भावगीतांत याची उत्तम झलक पाहायला मिळते. विशेषतः ‘घाई नको बाई अशी, आले रे बकुलफुला’ हे गाणं ऐकताना याचं प्रत्यंतर येतं.
आशाताई पारंपरिक मराठी भावगीते, भजने व नाट्यगीतेही तितक्याच प्रभावीपणे सादर करतात. देशोदेशी त्यांचे कार्यक्रम होत असतात. आशाताईंनी संगीत दिग्दर्शन व संगीत रचनाही केल्या आहेत, तसेच अनेक बंदिशी रचल्या आहेत. ‘संगीत आराधना’ व ‘संगीत कविराज जयदेव’ यांसारख्या नव्या काळातील मराठी संगीतिकांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. जाहीर कार्यक्रमांच्या जोडीला आशाताईंनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम, जसे, ‘होली रंग रंगीले’, ‘सावन – रंग’, ‘ऋतु-रंग’, ‘रचनाकार को प्रणाम’, सादर केले आहेत.
१९९४ पासून आपले पती श्री. माधव खाडिलकर यांच्या सहयोगाने आशाताईंनी ठाणे, मुंबई येथे ‘उत्तुंग सांस्कृतिक परिवार’ नामक सांस्कृतिक संस्था सुरू केली असून तिचा उद्देश संगीत, नृत्य, नाट्य व साहित्य विश्वातील नव्या दमाच्या प्रतिभेला आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. ह्या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांसाठी ही संस्था ‘उत्तुंग पुरस्कार’ जाहीर करते.
आजवर आशाताईंना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत माणिक वर्मा पुरस्कार, पं. कुमार गंधर्व पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ म.टा
काही गाणी आशा खाडिलकर यांची
घाई नको बाई अशी, आले रे बकुलफुला
वद जाऊ कुणाला शरण
जोहर मायबाप जोहर मायबाप
मजवरी तयाचे प्रेम खरे
अनंता तुला कोण पाहू शके
बलसागर तुम्ही
किती किती सांगू तुला
मर्म बंधातली ठेव ही
Leave a Reply