कॉलेजातल्या पहिल्या दिवशी …… ती दिसता वर्गात
पाहताक्षणी गेला भाळून …… पडला प्रेमात
आठवड्यातून एकदा तरी …… लिहायचा पत्र
तरी उत्तर नाही नकार नाही …… अस्पष्ट हे चित्र
इतक्या चिठ्ठ्या लिहून काही …… मिळेना दाद
होकाराची वाट पाहिली …… दुर्दम्य आशावाद
अन् वर्षामागुनी सरली वर्षे …… संपले कॉलेज
शेवटच्या दिशी तिजला पाहुन …… धस्स काळीज
अखेर फुटले शब्द कसेबसे …… मुखातूनी त्याच्या
हिशेब मागण्या पत्रांचा त्या …… इतक्या वर्षांच्या
म्हणे “पत्रांची त्या जमली रद्दी …… सकाळीच विकली” !
निघता निघता देऊनी बटवा …… नाजुकशी हसली
खिन्न मनाने घरी परतला …… अगदी सरळसोट
उघडूनी बटवा काढून ठेवली …… नाणी आणि नोट
पण आनंदाने नाचला वाचून …… निरोप नोटेवरचा
दगड मैलाचा केला पार …… प्रेमाच्या वाटेवरचा
दुसऱ्या दिवशी जाऊन देवळात …… घेतले आशीर्वाद
वाट बघितली देवळाबाहेर …… पुन्हा आशावाद
आली नाही आज ती जरी …… खचला नाही
अन् नोटेवरचा निरोप अजून …… पुसला नाही
निरोप वाचून वाजे हृदयात …… रोज पिपाणी
पुन्हा नव्याने तिष्ठत राही …… त्याच ठिकाणी
एके दिवशी समोर अचानक …… ती अवतरली
पाहून सोबत मूल लहानगे …… धडकी भरली
चिमटा काढून स्वतःलाच एक …… केली खातरजमा
नेमके तेव्हाच बाळ ओरडले …… “मामा मामा मामाss!”
“अगं नोटे वरचा निरोप तुझा …… होता का खोटा ?”
“अरे माझ्या नाही रद्दीवाल्याच्या …… होत्या त्या नोटा !”
इतके बोलूनी हसत खिदळत …… गाभाऱ्यात गेली
अन् भक्तांमधुनी सुंदर मुलगी …… सांत्वनास आली
“अहोs काय होते इतके त्या …… नोटेवरचे शब्द ?”
“जेजे वाचून तुम्ही हे असे …… महिनोंमहिने स्तब्ध !”
“उद्या भेटूया देवळाबाहेर” …… असे लिहिले आहे !
“रोज वाचूनी वाटे आज ते …… उद्यासाठी आहे !”
“म्हणून यायचो नित्य नेमाने …… होतो आशावादी !”
“सत्य सारे आज उमगले …… उगा लागलो नादी !”
“रोज तुमची बघून अवस्था …… वाटायची कीव !”
“आशावाद हा पाहुनी जडला …… तुमच्यावर जीव !”
“मीही थांबले इतकी वर्ष …… फक्त तुमच्यासाठी !”
“वेळ साधूनी यायचे मुद्दाम …… तुमच्या दर्शनासाठी !”
“पुढील आयुष्य घालवू आपण …… एकत्र आनंदाने !”
“तुमची माझीच असेल बांधली …… गाठ विधात्याने !”
संपून सारा आशावाद तो …… आला भानावर
अन् तयार झाला लग्नासाठी …… एका पायावर
इतकी वर्ष थांबून सोडल्या …… जेव्हा सगळ्या आशा
योगायोग पण असा विचित्र …… नाव तिचे “आशा”
कॅलेंडरच्या उलटू लागल्या …… तारखांवर तारखा
संसार त्यांचा सुरू जाहला …… चार-चौघांसारखा
कधी भांडण तर होतो कधी …… प्रेमळ संवाद
“वाद” होतो “आशा”शी कधी …… तोच “आशावाद”
उरला आता तोच आशावाद …… आता तोच आशावाद
–क्षितिज दाते , ठाणे
आवडल्यास शेअर/फॉरवर्ड करायला माझी काहीच हरकत नाही …
Leave a Reply