कापलेले पंख अन्,
तोडलेले हातपाय,
विचारेना इथे कुणी,
देईना धरणी ठाय,–!!!
काय करू, जाऊ कुठे ,
मन विषण्ण होई,—
सांगायाची कोणाला
आपुली कर्मकहाणी,–!!!
जग सारे पसरलेले,
चालते आहे एकटी,
स्थिती अगदी अनवाणी,
रणरणत्या वाळवंटी,–!!!
पाखरा किती गोंडस तू,
गोडुली तुझी वाणी,
आधार देई मम बुडती’ला,
देऊन काडी काडी,–!!!
*निराशेच्या गगनीही,
आशेचा पक्षी उडे,
संगतीला मी तुझ्या,
शांत हो राजसबाळे*,–!!!
दूर क्षितिजावरती,
प्रकाशकिरण चमचमती,
तुझ्या जीवनपथावरही,
डोकावेल तो एक दिनी,–!!!
सुमार”” नसेल आनंदाला,
इतुके सुख येईल जीवनी,
हे घेऊ की ते घेऊ,—
सुख वाटशील भरभरूनी,–!!!
एवढी खिन्नता कशाची,
काळोख दाटे का मनी,
आनंद जगाला वाटसी,
खूण पटेल समाधानी,–!!!
गर्तेत उदासीनतेच्या,
का अशी जाऊन पडशी,
पुन्हा पंख फैलावुनी,
आसमंती घे भरारी,–!!!
कितीदा तरी दुःखे,
मानवाला मागे लोटती,
परंतु बाहू फैलावुनी,
नव्हत्याचे होते करती,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply