नवीन लेखन...

अशी ही व्यापाराची तर्‍हा

कैरोमधल्या पिरॅमिडबद्दल शाळेत असल्यापासून कुतूहल होतंच. भूगोलाच्या पुस्तकात त्याची बरीच माहिती संगितली होती. त्यावरून पिरॅमिड खूपच भव्य असावे एवढीच कल्पना मनात निर्माण झाली होती.शाळा संपली,मग कॉलेजजीवन,नंतर लग्न ,संसार या सरळसोट वाटेने जाताना पिरॅमिडस ची माहिती व कुतुहल मनाच्या कुठल्या कप्प्यात लपून बसले कळलेच नाही.मोठेपणी Chariots of Gods आणि इतर काही पुस्तकांमधून पिरॅमिड व तत्सम इतर अवाढव्य कलाकृतींबद्दल वाचून त्याविषयीचे आकर्षण वाढले. एवढे अवाढव्य काम कोणी केले असेल,कशासाठी केले असेल याची उत्सुकता निर्माण झाली.‘चॅरिएट्स ऑफ गॉड’ मध्ये ब-याच आश्चर्यकारक जागांचा व बांधकामांचा उल्लेख आहे. हिस्ट्रीचॅनलवर तेंव्हा एक‘ एनशियंट एलियन्स ’म्ह्णून एक मालिकाही बघण्यात आली व नास्काच्या रेषा,पिरॅमिड्स,चीनची भिंत वगैरे ब-याच माहितीची भर पडली.त्यातल्या त्यात  पिरॅमिडस हे जरा जवळचे वाटले.म्हणून पिरॅमिडच्या तीव्र ओढीने आम्ही इजिप्तचा विचार करू लागलो म्हटले तरी चालेल. अर्थात नाईलमधल्या प्रवासाचेही आकर्षण होतेच. योग्य अशी टूर शोधणे, व्हिसा याची तयारी झाली अन खरंच एके दिवशी आम्ही इजिप्तमधल्या कैरोला येऊन पोहोचलो. आम्ही ही टूर जरी सिंगापूरला बुक केली होती तरी ती सुरू होणार होती कैरोपासून. त्यामुळे माझा जीव नेहमीप्रमाणे आमचा गाईड दिसेपर्यंत टांगलेलाच. पण सगळे सुरळीत होऊन आम्ही नाईलच्या काठावरच्या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. तिथल्या नियमांप्रमाणे विमानतळावरच आमचे पासपोर्ट प्रथम गाईडच्या ताब्यात व नंतर हॉटेल मॅनेजरच्या ताब्यात गेले. परदेशात असताना पासपोर्ट दुस-याच्या ताब्यात असण्याची कधीच सवय नसल्याने मला खूपच चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागले.

१० -१२ वर्षांपुर्वी इजिप्त आजच्या पेक्षा खूपच शांत व सुरक्षित होतं. सरकारने सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला होता. रस्त्यांवर, हॉटेलमध्ये,चौकाचौकात पोलीस तैनात होते. ते दिवस रमादानचे होते. त्यामुळे सिंगापूरहून निघतानाच टूर एजन्सीकडे आम्ही खूप चौकशा केल्या होत्या – विशेषतः जेवणाबद्दल. कारण मी पक्की शाकाहारी. त्यामुळे त्याची सोय होईल का, निदान दुपारी जेवायला मिळेल का आणि तेही वेळेवर मिळेल का, वगैरे वगैरे विचारून मी तिथल्या एजंटला अगदी भंडाऊन सोडले होते. त्यांच्या परीने त्यांनी आमच्या सर्व शंकांचे निरसन केले खरे, तरीपण शेवटी सामानात ‘ रेडी टू ईट ’ ची भरताड केली, तेव्हाच माझे समाधान झाले व आम्ही सिंगापूरहून निघालो. इजिप्त हा मुस्लीम देश, तिथले लोक जरी रमादान अगदी कट्टर पध्दतीने पाळत असले तरी ‘अतिथी देवो भव’ हा धर्म इजिप्तमध्ये व्यवस्थित अमलात येताना दिसत होता. आमचे हॉटेल होते त्या ‘माएदी’ भागातून  नाईलचे प्रथम दर्शन झाले.अगदी नाईलच्या किना-यापाशीच हॉटेल होते व खिडकीतून नदी मस्त बघता येत होती.‘नादी’ या हॉटेलच्या दाराशी, तिथल्या जवळच्या चौकात पोलीस तैनात होतेच पण फुटपाथवरही सतत गस्त घालत होते.मला तर ते बघूनच बाहेर पडायची भीती वाटायला लागली. पण एवढी प्रसिद्ध नदी आपल्या दारातून वहात असताना तिला भेटायला न जाणे  आमच्या स्वभावात बसणारे नव्हते. थोडेसे रिलॅक्स झाल्यावर आम्ही भटकायला बाहेर पडलो.

नादी हॉटेलच्या समोरचा रस्ता ओलांडला की नदी होती. पण ती कैरो शहरातून वहात असल्याने नदीच्या दोन्ही किना-यांवर भींती बांधून थोड्याप्रमाणात बंदिस्त केलेली होती.दोन्ही बाजूंना नक्षीदार रेलींग होते व त्याला लगटून वेगवेगळ्या वेली व झुडूपे नदीची गंमत बघत होती.पोलीस होतेच अधून मधून तेवढे मात्र उगीचच खटकत होते.आमच्यासारखे काही प्रवासीही गळ्यात कॅमेरे अडकवून फिरत होते पण  स्थनिक लोकही बिनधास्तपणे ये जा करताना पाहून मला खूपच धीर वाटला हे खरं.आम्ही मजेत संध्याकाळची मस्त हवा,गार वारे,व नदीचे सान्निध्य मजेत अनुभवत होतो.नदीचे निळेशारपाणी संथपणे वहात होते.सूर्यदेव आपली ड्युटी संपवून घरी जाण्याच्या गडबडीत होते व इजिप्तचे रहिवासी त्यांच्या(सूर्यदेवांच्या) घरी जाण्याची अगदी आतुरतेने वाट पहात होते. रस्त्याच्या दुस-या बाजूला छोटे छोटे रस्ते होते.त्यांच्या दुतर्फा एकमजली क्वचित दुमजली घरे होती .

सगळे पहाता पहाता सूर्यास्त कधी झाला तेच  कळले नाही.मशीदीमधून मुस्लीम धर्मगुरूंनी त्या दिवशीच्या रोजाचा उपवास संपल्याचे  जाहीर केले व घराघरातून एकच गडबड उडाली.जागोजागी लोक एकमेकांना खजूर भरवून उपवास सोडू लागले.मशीदीच्या बाहेर गरीब लोकांच्या जेवण घेण्यासाठी रांगा लागल्या.त्यांना जेवणाचे पदार्थ पुरवण्यासाठी मशीदीच्या आसपास धनिक लोकांच्या व्हॅन्स उभ्या राहू लागल्या. शिवाय कोप-याकोप-यावर मोठ्या टोपलीतून टम्म फुगलेले खुबुस घेऊन काही दानशूर मंडळी जो मागेल त्याला खुबुस देण्यात मग्न होती.सगळे पाहताना हॉटेल कधी आले कळलेच नाही.आमची रात्रीच्या जेवणाची सोय हॉटेलमध्येच होती.जेवण अर्थातच मस्त होते. भाज्या आपल्या चवीशी मिळत्याजुळत्या होत्या.पोटभर जेवल्यावर निद्रादेवी आमच्यावर केंव्हा प्रसन्न झाली कळलेच नाही. पण रात्री जाग आल्यावर खिडकीतून बाहेर पाहिले तर पोलिस गस्तीवर होतेच .त्यावरून मागे झालेल्या परदेशी प्रवाशांवरच्या हल्ल्यापासून व हत्येपासून सावध होऊन पूर्ण नष्ट होऊ पहाणा-या पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार परदेशी प्रवाशांच्या सुरक्षेची किती काळ्जी घेतय हे कळत होतं.

सकाळी सकाळी हॉटेल मॅनेजरचा फोन आला की  “थोड्यावेळात आम्हाला आमची गाईड न्यायला येणार होती .तेंव्हा तयार रहा”.आम्ही आवरून खाली येण्याअगोदरच एक मध्यम वयीन गोरीपान, तरतरीत मुस्लीम महिला रिसेप्शनीस्टच्या टेबलाशी उभी होती. आम्हाला पहाताच ती लगबगीने पुढे आली व आमचे हात हातात घेऊन तिने अभिवादन केले व स्वतःची माहिती सांगितली. तिचे नाव ‘सराह’ व ती कैरोतीलच रहिवासी होती. आमच्या टूर मध्ये आम्ही दोनच प्रवासी होतो. कारण इंग्रजी बोलणाराच वाटाड्या आम्हाला हवा होता. ती तिचा धर्म- रोजे, पोषाखाची मर्यादा काटेकोरपणे पाळत होती. तरी तिने आमच्या खातिरदारीत तसूभरही कमतरता ठेवली नाही. तिच्याबरोबर आमचे कैरो दर्शन सुरू झाले. पिरॅमिड पाहिल्याशिवाय इतर काहीच सुचणार नव्हते. आम्ही तिथूनच सुरुवात केली. अस्खलीत इंग्लिशमध्ये ती सगळी माहिती अतिशय रसाळपणे सांगत होती. सगळ्या प्रवासात ती कैरोचा इतिहास, महत्वाच्या इमारती, भौगोलीक माहिती सांगत होती. नाईल नदी बद्दलही तिने बरेच सांगितले.

“नाईल ही २००७ पर्यंत जगातील सर्वात जास्त लांबीची नदी होती.आता तो किताब जरी ऍमेझोनला मिळाला असेल तरी दक्षिणेकडून उत्तरेला वहात जाणारी इजिप्तची जीवनदात्री म्हणून तिचे महत्व जरासुद्धा कमी झालेले नाही.”

“म्हणजे नाईल आहे तरी किती लांबीची?” माझी उत्सुकता मला गप्प बसू देत नव्हती.

“नाईलची लांबी अंदाजे ४२५८ मैल आहे. ती पूर्वी सतत तिचा मार्ग बदले. त्याप्रमाणे तिच्याकाठावरची वस्तीही आपले स्थान बदले. परंतू आस्वान इथल्या धरणामुळे आता नाईल शहाण्यामुलीसारखी वहाते.अर्थात तिच्या मार्ग बदलण्यामुळे व तिने वाहून आणलेल्या गाळामुळे आसपासची जमीन समृद्ध झाली आहे. त्यात मका, बार्ली,कडधान्ये,जवस, गहू वगैरेची भरघोस पिके येतात.”

“नाईलचा उगम कसा व कोठे आहे?ती कोणत्या समुद्राला आपले अस्तीत्व अर्पण करते?”

“नाईल ही काही पर्वतातून उगम पावलेली नदी नाही .तर ही ‘व्हाईट नाईल व ब्लु नाईल ’अशा दोन उपनद्यांच्या एकत्र येण्याने बनलेली आहे.”

माझ्या चेह-यावरचा पुढचा प्रश्न समजून सहार पुढे सांगू लागली ” व्हाईट नाईल चा नाईलच्या पाण्याची मोठी पुरवठादार म्हणायला हवी.ती सुदान मधील व्हिक्टोरिया या तळ्यापासून निघते.तसेच ब्लू नाईल ही ‘ईथीयोपियातील ताना’ या तळ्यापासून निघते ती व्हाईट नाईल ला उत्तर सुदान मधील ‘खोरतुम’या राजधानीमध्ये मिळते व त्याचीच पुढे इजिप्तमधील नाईल होते.”

“मग ही कुठल्या समुद्रात विलीन होते?” मी परत एकदा मगाचाच प्रश्न विचारला.

“आस्वान, लक्झूर,कैरो समृद्ध करत ती उत्तर कैरो पाशी प्रथम २ भागात व नंतर पुढे ब-याच छोट्यामोठ्या भागात विभागली जात अलेक्झांड्रिया पाशी ती मेडिटेरियन समुद्रामध्ये आपला प्रवास संपवते.जवळपास ११ देशांमधून हिचा प्रवास होतो.आपल्या पाण्याने ती जवळपास १लाख चौरस मैलापेक्षा जास्त भूभाग पवित्र करते.”सहारा माहिती संगण्यात रंगून गेली होती.तोच एक नाईल वरून दुस-या किना-यावर जाणारा पूल आला व आम्ही दुसरीकडे गेलो.

नदी ओलांडल्यावर लगेचच पिरॅमिडचे दर्शन झाले.जसजसे आम्ही त्यांच्या जवळ जायला लागलो तसतसा त्याची भव्यता नजरेत भरायला लागली.पिरॅमिड लिबीयन वाळवंटात आहेत,तेंव्हा आजूबाजूला काहीही नव्हते. दिवसरात्र फक्त नाईलची सोबत ! पण हळू हळू जसे इजिप्त इतर देशातील प्रवाशांसाठी खुले व्हायला लागले व पिरॅमिड हे सर्वात मोठे आकर्षण ठरू लागले, तसे पिरॅमिडच्या आजूबाजूला दुकाने, घरे, हॉटेले यांचा पसारा इतका वाढत गेला, की आता बिचारे पिरॅमिड घरे, छोटी दुकाने यांच्या गर्दीतून त्यांच्या जुन्या मैत्रिणीला – नाईल नदीला  शोधत असतात. तरी पण वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर भले मोठ्ठे 3 पिरॅमिडस खूपच ठळकपणे डोळ्यात भरतात.

आजोबा, वडील व मुलगा यांची अंतिम चिरविश्रांतीची ही ठिकाणे जवळ जवळ एका रेषेत उभी आहेत. जवळ जावे तशी त्यांची भव्यता जाणवायला लागते. फिक्क्या तपकिरी, करड्या रंगछटेचे प्रचंड मोठे चौकोनी, आयाताकृती दगड चुना सिमेंट वगैरेचा फारसा वापर न करता एकावर एका रचून केलेल्या ह्या पिरॅमिडची बांधणी आजही ब-यापैकी भक्कम आहे. हे सगळे ग्रॅनाईट व चुनखडीचे  दगड नाईल नदीतून लक्झर-आसवान पासून कसे वाहून आणले असतील, अगदी  गुळगुळीत कसे केले असतील, एकमेकांवर बरोब्बर कोन साधून कसे बसवले असतील, एवढ्या प्रचंड उंचीवर कसे चढवले असतील याचाच विचार ते पहाताना मनात येत होता.

“हे तीन मुख्य पिरॅमिडस,त्या मागचे राण्यांचे छोटे पिरॅमिडस, समोर दिसतोय तो स्फिंक्स,मागे असणारी कामगारांची वस्ती, इंडस्ट्रीयल एरिया यांचा गीझा मधील हा ‘गीझा पिरॅमिडचा कॉंप्लेक्स’ आहे.हा मधला सर्वात मोठा आहे तो‘ खुफु ’राजाचा पिरॅमिड,यापेक्षा थोडा लहान आहे तो त्याचा मुलगा ‘खाफ्रे’ याचा व सर्वात लहान आहे तो खाफ्रेचा मुलगा ‘मेन्काउरा ’याचा. या पैकी खुफूचा सर्वात उंच म्हणजे मूळचा ४८१ फ़ूट पण भूकंपाच्या पडझडीनंतर राहीलेला ४५१ फूट आहे.हा ख्रीस्तपूर्व २५८० ते २५६० या कालावधीमध्ये बांधलेला आहे.याचा व्हॉल्यूम २५ लाख ८३ हजार २८३ घनमीटर असून प्रत्येकी ७५५ फूट लांबीच्या, वरच्या टोकाला एका बिंदूत जुळून येणा-या चार बाजूंचा हा भव्य आकार आहे.यासाठी लागणारे ग्रॅनाईट व लाईमस्टोनचे दगड लक्झूर-आस्वान हून नाईलनदीतून इथपर्यंत आणले गेले ,ते घासून गुळगुळीत केले गेले ,योग्य अशा आकारात कापले व फार थोडे मॉर्टर वापरून एकावर एक अश्या त-हेने रचले की ते एका बिंदूपाशी मिळावेत. यासाठी प्रत्येकी २.५ ते ३ टन वजनाचे २.३ मीलियन ब्लॉक्स वापरले आहेत.काही ब्लॉक्स १६ ते २५ टन वजनाचेही आहेत.यापैकी ५.५ मिलीयन टन लाईमस्टोन ,८००० टन ग्रॅनाईट ५ लाख टन चुन्याच्या सहाय्याने बसवले आहेत.खाफ्रीचा पिरॅमिड ४४७ फूट उंच व मेन्काउराचा २२८ फूट उंचीचा आहे……..”पिरॅमिडचा

इतिहास, किती दगड वापरले, किती मजूर लागले ही माहिती जरी साराह सांगत होती तरी माझ्या डोळ्यासमोर खूप मजूर काम करताहेत, भले मोठे अवजड दगड खूप उंचीवर चढवण्याची खटपट करताहेत, हळूहळू पिरॅमिडचा आकार घडतो आहे हेच दिसत होते.ह्या सुबक पिरॅमिडसच्या मागच्या बाजूला थोड्या अंतरावर ३ छोटे, अगदी साधे व ओबडधोबड पिरॅमिडस आहेत. ते अर्थातच फेरोंच्या राण्यांचे. ह्या पिरॅमिडसच्या आसपास सजवलेले उंट घेऊन त्यांचे मालक घुटमळत होते. वाळवंटातून ते प्रवाशांना चक्कर मारून आणायला उतावीळ होते. आम्हाला जरी ‘उंटावरचे शहाणे’ होण्यात रस नव्हता तरी पिरॅमिडसच्या पार्श्वभूमीवर ते उंट खूप आकर्षक दिसत होते.

तीनापैकी फक्त एकाच पिरॅमिडमध्ये आत पर्यंत जाण्याची सोय आहे. आम्ही प्रथम दोन मजले उंचीएवढा जिना चढून गेलो व जेमेतेम एक माणूसच एकावेळी जाऊ शकेल इतक्या अरूंद जिन्यातून पिरॅमिडच्या पोटात उतरू लागलो. पाय-या नव्हत्याच, त्याऐवजी लाकडाचे ओंडके, पाय घसरू नयेत म्हणून दोन्ही बाजूला कठडे व मिणमिणता दिवा. चढण्या-उतरण्यासाठी एकच रस्ता. त्यामुळे खालून व वरून माणसे एकदमच आली तर त्यांना दुस-याला वाट मोकळी करून देणे शक्य व्हावे यासाठी मध्येमध्ये मोकळे चौकोन होते.खरतर खाली जाण्याचा रस्ता बघतानाच छातीत धडधडत होते. असे वाटत होते कि एखादा धिप्पाड माणूस मध्येच अडकला तर …….किंवा एखादा दगड ढासळला तर….पिरॅमिडच्या आत भारतीय माणसांच्या ममीज.!!!!……पण आत काय असेल याचे कुतुहल जबरदस्त. जसे पिरॅमिडच्या पोटात खाली खाली जात होतो तसा उकाडा वाढत होता. खाली पोहोचेपर्यंत घामाने चिंब भिजलो होतो. खूप खाली गेल्यावर ब-यापैकी मोठी खोली होती. तिथे एक बंद पेटी होती व भिंतींवर फेरोच्या (राजाच्या) जीवनातील प्रसंग रेखाटलेले होते. खूप महत्वाचे व भव्यदिव्य असे काही बघायला न मिळाल्याने काहींची निराशा झाली, पण आम्हा दोघांना पिरॅमिडच्या आत येण्यातच खूप काही मिळाल्याचे समाधान झाले. मोकळा श्वास व लखलखीत सूर्यप्रकाश ही किती आल्हाददायक गोष्ट असते हे पिरॅमिडमधून वर आल्यावर कळले. त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर आत्तापर्यंत फक्त चित्रात पाहिलेला स्फिंक्स तीनही पिरॅमिडसची देखरेख करत बसला होता. काही ठिकाणी जरी तो भंगला असला तरी त्याची नजर सगळीकडे असावी असे वाटत होते. चारी पाय मुडपून बसलेला फिंक्स, त्या मागचे तीन पिरॅमिड……. कल्पनेपेक्षाही खूपच भव्य असे ते सगळे दृश्य होते. त्याच्या समोरच्या पटांगणात रोज रात्री लेझरच्या सहाय्याने इजिप्तचा इतिहास जसाच्या तसा साकार करतात. ते पहाताना नकळत आपणही त्या काळात रंगून जातो. सहारा वाळवंटावरून येणारा थंडगार वारा अंगावर काटा आणतो का फेरोचा इतिहास ऐकताना अंगावर काटा येतो ते सांगणे कठीण. रात्री कितीतरी वेळ सगळे आठवत राहिले.

दुस-यादिवशी आमच्या गाईडने परत एकदा पिरॅमिडचे दर्शन घडवले,तिथल्या एका गालीचे विकणा-या दुकानात नेऊन मस्त गालीचे दाखवले,इजिप्शियन चहा पाजला ,कैरोतील इतर ब-याच गोष्टी दाखवल्या व एका मस्त हॉटेलमध्ये जेवायला नेले.तिथे आमच्यासाठी शाकाहारी जेवणाची ऑर्डर  देऊन ती स्वतः उपवास असल्याने वर्तमानपत्र वाचत आमच्यापासून ब-याच दूरवर एका टेबलाशी बसून होती पण आम्हाला ७ कोर्सचे सर्व जेवण  मिळते का नाही यावर बारीक लक्ष ठेऊन होती.तिच्या संयमाचे खूप कौतुक वाटले.

संध्याकाळ रिकामी होती म्हणून आम्ही हॉटेलमधून टॅक्सीकरून कैरोतील प्रसिद्ध ‘ताहीरीर’ चौकात गेलो. दिवसा बघितलेल्या काही खुणा बघत नाईलच्या काठावरून शहराच्या मध्याकडे जाणा-या रस्तावरून आमची टॅक्सी पळत होती. डावीकडॆ नीळीशार नाईल व उजवीकडे उंचउंच हॉटेलच्या इमारती दिसत होत्या. नुकताच रोजाचा उपवास संपल्याने लोक जेऊनखाऊन मजेत फिरत होते.रस्त्यातील गर्दी पार करत आम्ही थोड्याच वेळात ताहिरीर चौकात पोहोचलो.

दगडी छोट्याछोट्या चौकोनी फरशांची जमीन असणारा हा चौक माणसांनी नुसता फुलून गेला होता.पायघोळ कंदूरा घातलेले, डोक्यावर छोट्या गोल टोप्या किंवा चौकोनी रूमाल बांधलेले पुरूष आपापल्या बायकामुलांसह मोकळ्या हवेवर गप्पागोष्टी करायला जमले होते. ओळखीच्या लोकांशी त्यांचे आलिंगन देणे व हस्तांदोलन करणे चालू होते तर बायका आपापले बुरखे किंवा हिजाब सांभाळत ओळखीच्या मैत्रीणींना भेटून आनंद व्यक्त करीत होत्या.मधला चौक गोल होता,मधोमध झाडे व त्याच्याकडेला छान कट्टा बांधलेला होता.त्यावर बसून बरेच जण गर्दीची गंम्मत अनुभवत होते. त्याला वळसाघालून चारचाकी ,दोनचाकी वहाने सावकाश जात होती. चौकाच्या आजूबाजूला पार्लमेंट हाऊस,इजिप्तचे प्रसिद्ध म्युझियम,एक पंचतारंकित हॉटेल होते.चौकामध्ये खेळणी विकणारे लहान मुलांना आकर्षित करून स्वतःचा फायदा करून घेत होते.गोलाकार रस्त्याच्या दुस-या फुटपाथवर लहान लहान दुकाने पिरॅमिड्सच्या प्रतीकृती, गळ्यातली कानातली, कपडे यांनी सजवून त्यांचे मालक  गि-हाईकांना ओरडून ओरडून बोलवत होते.हे सर्व बघताबघता १-२ तास कसे गेले कळलेच नाही. अम्हाला ज्या टॅक्सीवाल्याने तिथे सोडले होते तो आम्हाला त्याच ठिकाणी परत पिकअप करणार होता म्ह्णून आम्ही त्याची वाट पहू लागलो. आता रात्रीचे ११ वाजत आले होते. त्यामुळे जमलेली मंडळीही हळूहळू पांगू लागली. दुकानेही एकेक करून बंद होऊ लागली तरी टॅक्सीवाल्याचा पत्ता नाही.हॉटेलमध्ये फोन केला तर “१५ मि. थांबा ,तो येतोय” असे कळले.एव्हाना रस्त्यात अगदी तुरळक माणसे व गस्त घालणारे पोलीस शिल्लक राहीले हे पाहून माझीतर घाबरगुंडीच उडाली.काय करावे कळेना. पोलीसांनासुद्धा इंग्रजी येत नाही म्हटल्यावर त्यांची मदत घेण्याचा प्रश्नच मिटला.काय करावे कळेचना. शेवटी युक्ती केली. एक पोलीसांचीच गाडी थांबवली व त्यांना हॉटेलशी फोन जोडून दिला.तेंव्हा कळले की त्या टॅक्सीला अपघात झाल्यने तो येऊ शकत नाही.आमची अडचण ओळखून पोलीसांनीच पुढाकार घेतला व आम्हाला हॉटेलपाशी आणून सोडले.आत येताच तोच टॅक्सीवाला आमची जातानाचे पैसे घेण्यासाठी ठिया देऊन बसला होता. बरोबर आलेल्या पोलीसाने त्याची अशी मस्त …….केली की कय सांगू!.एक नवीनच अनुभव मिळाला व पोलीसांची तत्परता पहायला मिळाली. या नंतर राहिलेले कैरो आम्ही नाईलच्या सफरीवरून परतल्यावर पहाणार होतो.

दुस-या दिवशी आम्ही विमानाने लक्झूरला गेलो. कैरो ते लक्झूर संपूर्ण प्रवास आम्ही नाईलच्या पात्रावरून उडत उडत सहाराच्या कडेकडेने केला. विमानातून नाईल अगदी एका सरळ रेषेत वहाताना दिसत होती. तिच्या एका किना-यावर नदीच्या कडेने हिरव्या रंगाची झाडांची रांग होती तर दुस-या किना-यावर सहाराचे वाळूचे डोंगर व वाळवंट पसरले होते. एकाच नदीच्या दोन किना-यांवरचा एवढा फरक क्वचितच पहायला मिळतो. या पुढचा ४-५ दिवसांचा प्रवास नदीतून बोटीतून होता. विमानातून लक्झूरला उतरताना किना-यावरच्या बोटी अगदी खेळण्यातल्या वाटत होत्या. हा नदीतला प्रवास कसा काय असेल याविषयी ब-याच शंका मनात धरूनच मी लक्झूरला उतरले. आता इथून पुढे आमचा गाईड बदलला होता. तो अलेक्झांड्रियाच्या विद्यापीठात इतिहास शिकवत होता. त्यामुळे तो एकदा माहिती सांगू लागला की तासाभराची निश्चिंती. लक्झर एक ब-यापैकी मोठे गाव आहे तरी घरे साधीच. नाईलच्या पूर्वेच्या लक्झरमध्ये शेती, घरे, देवळे होती तर पश्चिम भागात (किंग्ज व्हॅली) रामसेस टू, तुत-अंख-अमुन वगैरेंची थडगी. इतिहासाचार्य गाईडमहाशयांनी सगळी माहिती भराभर एका सुरात सांगितली. अगोदर वाचन केलेलं होतं म्हणून थोडं फार तरी समजलं. दोन दिवस लक्झूरला घालवून आम्ही आमचा मोर्चा नाईलकडे वळवला.

‘नाईल नदीतून ४-५ दिवसांचा प्रवास’ ह्या एकाच गोष्टीसाठीसुध्दा इजिप्तला कितीही वेळा भेट द्यायची माझी तयारी आहे इतका तो प्रवास छान आहे. नाईलला इजिप्तची जीवनदात्री का म्हणतात ते तिथे गेल्यावर एकदम पटते. ही नदी नसती तर संपूर्ण वर्षातून पडणा‌-या २-३ इंच पावसावर , सहाराच्या रणरणत्या व विस्तृत वाळवंटात इजिप्त जगलेच नसते. सुमारे ४००० मैल लांबीची ही जगातील सर्वात लांब नदी आपला बराच प्रवास इजिप्तमधून उलट्या दिशेने म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे करते. ह्या नदीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिच्या पूर्व किना-यावर जीवन फुलते तर पश्चिम काठावर तेच जीवन चिरविश्रांती घेते. लक्झरच्या नंतर आस्वानपर्यंत याचा सतत अनुभव येतो.

लक्झरला ‘स्प्लेंडिड’ नावाची बोट आमची वाट पहात होती. नाईल पाहिली नव्हती, तोवर मनात आलेल्या शंका, नाईलवरच्या भन्नाट वा-यावर पहाता पहाता उडून गेल्या आणि “अरे बापरे“ एवढेच उद्गार शिल्लक राहिले. जवळपास २०-२५ खोल्या, रिसेप्शन काउंटर, दोन किंवा तीन मजले, स्विमिंग पूल असणा-या कमीत कमी ५-६ तरी बोटी किना-यावर उभ्या होत्या. बोटी बाहेरून दिसत होत्या त्या पेक्षा आतून जास्त प्रशस्त होत्या. विमान प्रवासापुरते आमच्या हातात आलेले आमचे पासपोर्ट रिसेप्शन काऊंटरवर बोटीच्या कप्तानाच्या ताब्यात दिल्यावर परत जरा अस्वस्थ वाटलं. पण तो एक आवश्यक सोपस्कार असतो. कोमट लिंबू सरबत व तोंड पुसायला ओला टॉवेल देउन केलेल्या स्वागतानंतर आमची रवानगी खोलीत झाली.

खोलीत डबल बेड, स्वच्छतागॄह, प्रसाधन कक्ष, सोफा, दोन खुर्च्या, चहाचे टेबल वगैरे सोयी पाहून आपण बोटीत आहोत का हॉटेलमध्ये याची शंका येणार तोच कर्कश्श भोंगा वाजवून बोटीने आम्हाला जमिनीवर (खरं तर पाण्यावर) आणले. प्रत्येक खोलीची प्रशस्त खिडकी नदीची शोभा मोकळेपणाने दाखवत होती. खाली २० खोल्या, वरच्या डेकवर अर्ध्या भागात जेवणघर व अर्धा उघडा डेक अशी रचना होती. ह्या बोटी नदीतून एकट्यादुकट्याने न जाता ५-६ चा गट करून जातात कारण १९९७ साली लक्झर इथेच झालेली ५२ प्रवाशांची हत्त्या सरकार विसरलेले नाही. पोलीस सतत बोटीवर, प्रवाशांच्या उतरण्याच्या ठिकाणी सतर्क असतात. एका मागोमाग एक बोटी सुटत असतात. आमची वेळ होताच आम्ही निघालो.

नाईलचा तळ सगळीकडे सारखा खोल नाही .ब-याच ठिकाणी तो खूपच उथळ आहे. त्यामुळे ह्या बोटींचे बूड खालून सपाट असते. म्हणूनच बोटींचा प्रवासाचा मार्ग ही नदी खूप रूंद असली तरी एकेरीच असतो. त्यामुळे सगळ्या जणी अगदी एकामागोमाग शाळेतल्या मुलांसारख्या शिस्तीत जातात. समोरून येणा-या बोटींना इशारे करत जराही धक्का न लावता ज्या त-हेने त्या वाट देतात ते अगदी बघण्यासारखे ! आत्तापर्यंतच्या प्रवासात पिरॅमिडस, लक्झर व कार्नाकचे देऊळ, हट-शेप-सुटचे देऊळ (क्वीन्स व्हॅली) असे बरेचसे प्रेक्षणीय पाहून झाले होते. तरी एडफूचे, होरोसचे देऊळ, आस्वान धरण असे बरेच बाकी होते.

आमचा प्रवास संथ गतीने रमत गमत चालला होता. रात्रीचे जेवण – शुध्द शाकाहारी — जेऊन आम्ही डेकवर मोकळी हवा खात आरामात बसलो होतो. बोट आता जरा आणखी रूंद पात्रातून चालली होती. सभोवताली सगळीकडे अंधार होता. दूरवर मिणमिणते दिवे उगीचच गंभीर वातावरणात भर घालत होते. नुकतेच लक्झरमध्ये पाहिलेले तुत-अंख-अमून, रामसेस-२ ची खोल गुहेत असलेली थडगी, क्वीन्स व्हॅली मधली ५२ प्रवाशांच्या कत्तलीची जागा राहून राहून आठवत होते. कुठेही कसलीही जाग दिसत नव्हती ना बोटींची ये जा. तरीपण बोटीची गती मनाला दिलासा देत होती. आता झोपावे असा विचार करून खाली यायला वळणार तोच बोट अचानक थांबली. काय झालं असावं ? आम्ही परत डेकच्या कडेवर पोहोचलो. खालच्या डेक वर बोटीचे कर्मचारी होते त्यांना सगळे कल्ला करून विचारायला लागले की बोट का थांबली? “नाईलचा तळ असमान (१५-२० फूट उंचीवर) असल्यामुळे बोट वॉटर लॉक द्वारे वर चढवावी लागते. त्याला वेळ लागू शकतो, तुम्ही शांतपणे झोपा” एवढी मोलाची माहिती देऊन सगळे कर्मचारी आपापल्या कामाला निघून गेले.

झालं! मला काहीच कळले नाही. धनंजयना—माझ्या नव-याला– सगळे माहिती असते हा माझा ठाम विश्वास ! त्यामुळे त्यांच्याकडे मी माझा रोख वळवला. पण त्यांच्या स्पष्टीकरणापेक्षा माझ्या शंकांची गती व आवाका व्यापक असतो या एवढ्या वर्षांच्या अनुभवामुळे “तू इथे उभी राहून काय ते बघ, सगळी गंमत कळेल” एवढच बोलून हे गप्प! “हवं तर मी तुला सोबत म्हणून इथे थांबतो” हे ह्यांचे शब्द ऐकताच मी एकदम शूर झाले व डेकवरून गंमत बघू लागले.

या ‘वॉटर लॉकला’ ‘ईस्ना वॉटर लॉक’ असे म्हणतात. वॉटर लॉक म्हणजे नदीच्या पाण्यात बांधलेली २ बोटी मावू शकतील एवढी मोठी खोलीच असते. नदीचा तळ पुढे बराच उंच असल्याने आमच्या बोटीला १५ फूट उंच चढायचे होते. त्यामुळे जेव्हां तिचा नंबर लागला तेव्हां तिला खोलीत प्रवेश मिळाला. बोट आत शिरताच ते दार बंद झाले. नदीच्या उंचीवरच्या बाजूने पाणी लॉकमध्ये पंप केले गेले. पाणी लॉकमध्ये साठायला लागले. पाण्याची लॉकमधली पातळी जशी वाढू लागली तशी बोट हळूहळु वर चढू लागली. अम्ही जे तळ मजल्यावरून लॉकच्या वरच्या कडेवर उभ्या असणा-या माणसाकडे पहात होतो ते पहाता पहाता त्याच्या लेव्हलला आलो.योग्य त्या पाण्याच्या पातळीवर बोट येताच एवढा वेळ बंद असणारे इंजिन चालू झाले व बोट पुढच्या प्रवासाला निघाली.

चला! बरीच नवीन माहिती मिळाली. आता झोपायला हरकत नाही असा विचार मनात आला. तोच चालू झालेली बोट परत थांबली. मी एकटीच नाही तर सगळेच सहप्रवासी डेकवर जमून बोटीच्या रुसून बसण्याच्या कारणाचा तर्क करू लागले. आजूबाजूचा अंधार आता जास्तच गडद झाला होता. रात्र जास्त झाली नव्हती पण आजूबाजूला कुठेच हालचाल नसल्यामुळे खूप उशीर झाल्यासारखे वाटत होते. एक एक करत डेकवरचे व बोटीतले आतलेही दिवे मालवत कर्मचारी आपापल्या खोल्यांमध्ये गायब होत होते. आता आम्ही प्रवासीच डेकवर रेंगाळत होतो. आसपास दुसरी बोटही दिसत नव्हती.

आता सगळीकडे नीरव शांतता होती. नेहमीच्या शहरी गडबडीपेक्षा हेही खूप छान वाटत होते. इतक्यात सहजच दूरवर नजर गेली तर पाण्याच्या पॄष्ठभागावर अचानकच काहीतरी रंगीबेरंगी चमकताना दिसू लागले. अगोदर वाटले की चंद्राचे प्रतीबिंब नदीच्या पाण्यावर दिसत असावे पण ते लाटांबरोबर खालीवर होताना दिसत नव्हते. कुतूहल म्हणून पाहू लागलो तर चमकणा-या पट्ट्य़ांसारखे आकार नदीच्या लाटांवर तरंगताना दिसू लागले. ते काय असावे ह्याचा तर्क आम्ही करतोय तोच त्या पट्ट्या बोटीच्या दिशेने पुढे सरकताना जाणवायला लागल्या, त्यांचा आकारही वाढायला लागला.  बघताबघता त्या आडव्या पट्ट्य़ांवर अचानक पांढरे आकार काटकोनात उभे राहिले व आडवेतिडवे नाचूही लागले. बापरे ! नदीच्या पृष्ठभागावर काळ्याकभिन्न अंधाराच्या पार्श्वभूमीवर फक्त नाचणा-या चमचमत्या आडव्या पट्ट्या व त्यावर उभे असणारे हलते आकार ! आणि तेही बोटीकडे झेपावत असलेले ! नुकत्याच पाहिलेल्या थडग्यांची नको ती आठवणही आत्ताच व्हावी ना ! क्वीन्स व्हॅली मधली निरापराध प्रवाशांची कत्तल आठवण्याचीही वेळ नेमकी हीच ! उभ्याजागी दरदरून घाम फुटला. ‘पाचावर धारण बसणे’ याचा अर्थ आत्ता बरोबर कळला. पण विचार करत बसायला वेळ होताच कुठे? त्या भयावह आकारासोबत आता “ओव, आव, ओय्य” असे चित्रविचित्र किंचाळणेही ऐकू येऊ लागले. पाण्यातली खळबळही वाढली.. झाले ! माझा  होता नव्हता तो धीरही सुटला. इतक्यात अचानक…………….

बोटीवरचे दिवे लागले. प्रखर उजेडात बोटीचा संपूर्ण डेक लख्ख्न उजळून निघाला. उजेडाची किती सोबत वाटू शकते ते त्या क्षणी पटले. एकदम हायसे वाटले. सगळे परत डेकच्या कडेवर धावले. भीतीची जागा उत्सुकतेने घेतली. हे व्हिडीयो कॅमेरा आणायला खोलीत गेले होते. पाण्यातला गोंधळ मात्र वाढतच होता. त्याच्याकडे बघताना एकदम लक्षात आले की आपल्याला त्यांच्या आकाराशिवाय काहीच दिसत नाही पण आता बोटीवरच्या उजेडामुळे आपण जे कोणी खाली आहे त्यांना स्वच्छ दिसतोय. हे लक्षात येताच आमची अधिकच घाबरगुंडी उडाली. डेकच्या अर्ध्या बंद सुरक्षित भागामध्ये जाण्यासाठी सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. एकदम रनिंग रेस सुरू झाली. एकच गोंधळ उडाला. धडाधड सगळे एकमेकांवर आपटलो कारण डेकचा दरवाजा आतून बंद होता. आमचाही आरडाओरडा, हाकांचा सपाटा सुरू झाला. एकाही कर्मचा-याचा मागोवा लागेना. सगळे कर्मचारी ‘त्यां’च्या हल्ल्यात सापडले की काय? आणि हे? हा विचार मनात येताच भीतीने माझी बोबडी वळली. ह्यांना मी हाका मारू लागले तर  बाजूच्यांनी मला गप्प बसवण्याचा सपाटा चालवला. शेवटी सगळेजण डेकच्या दाराशी अगदी एकमेकांना चिकटून खाली माना घालून देवाची प्रार्थना करू लागलो.

आता खालूनओरडण्याचे आवाज व अगम्य भाषेतले बोलणेही एकू यायला लागले व आपण भुतांच्या नाही तर चाच्यांच्या तावडीत नक्की सापडलो याची खात्री पटली. क्षणात सगळेजण चिडीचूप झाले.  आता सुटकेची आशा अजिबातच नव्हती. काय होतय तेवढं बघणं एवढंच हातात होतं.

इतकं सगळं कमी म्हणून की काय “धप्प” असा आवाज झाला व एक मोठ्ठा गोळा आमच्यावर येऊन आपटला. ज्याला तो लागला त्याने तो दुप्पट वेगाने दूर केला. पाठोपाठ दुसरा, तिसरा आणि…. गोळाबारी चालूच झाली. बॉम्ब असावा का काही दुसरे याचा विचार करायलाही वेळ मिळत नव्हता इतक्या वेगाने आता गोळे खालून वर येऊ लागले. गोळे अंगावर आपटले तरी दुखापत होत नव्हती हे खरं. पण भीती वाढायची ती तर वाढतच होती. काय असेल ते तर पाहावं अशी हिम्मतही कुणाची होत नव्हती. अजूनही सगळेजण चिकटून चिकटूनच कोंडाळे करून बसलो होतो. ही आमची सगळी मजा बहुधा कुठूनतरी बोटीवरचे कर्मचारी पहात असावेत. कारण गोळ्यांचा मारा जरा मंदावताच  कुठून तरी ते प्रगट झाले व एक एक गोळा हातात उचलू लागले. ते जिवंत आहेत ह्याने हायसे वाटण्याएवजी आम्हाला वाटू लागलं की ते आता त्यातले काहीतरी काढून आमच्यावर फेकणार. ”नको, नको, नाही” असा आमचा एकाच गलका चालू झाला व ते सगळे हसायला लागले. हाताने त्यांचे गोळे उघडणे चालूच होते. सगळे आता थोडे थोडे भानावर येऊन पाहू लागलो तो काय …..त्या गोळ्यांमधून बॉम्ब वगेरे काहीच न निघता चक्क कपडे, स्कार्फ, टोप्या निघाल्या. एकदम डेकवर हसण्याची लाट उसळली आणि मग काय…! खरेदीची एकच गडबड उडाली. कपडे अंगाला लाऊन बघायचे, कर्मचा-यांच्या मदतीने किमतीची घासाघीस करायची …..नुसती झुम्मड उडाली. व्यवहार जमला तर त्याच प्लॅस्टिकच्या पिशवीत पैसे ठेवायचे व ती नेम धरून पाण्यात टाकायची. आम्ही सगळे नेमबाज(!) होतो तरी खालचे व्यापारी –ज्यांना आतापर्यंत  आम्ही नुसतेच पांढरे कपडे समजत होतो ते काळेकभिन्न सुदानी, लेबनीज —आमचे भरकटलेले नेम उचलण्यात पटाईत होते. जेंव्हा ही देवाणघेवाण थांबली तेंव्हा ते हसत हसत दूऊर निघून गेले.त्यांचा हा भर पाण्यातला व्यापार पाहून इतकेच म्हणावे वाटले “धन्य ती व्यापाराची तर्‍हा.”

— सौ. अनामिका बोरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..