जाता जाता सहज एक फुलपाखरू नजरेत भरलं! आजवर कधीच पाहिलेलं नव्हतं असं! त्याचे रंग, त्याची चपळाई, सारंच मनोवेधक. चालण्याच्या नादात पुढे गेलेली मी, थांबून मागे वळले. ते फुलपाखरू जिथे पाहिलेलं तिथे गेले. तिथल्या फुलझाडांमध्ये त्याला शोधू लागले. सारी पोपटी झुडपं, त्यामधून डोकावणारी पांढरी-पिवळी डोंगरी फुलं.. त्यात ते अत्यंत तलम जाळीदार पंखांचं, धमक पिवळं, तरी सोनेरी झाक असलेलं, माझं फुलपाखरू! हं… त्या पाखराच्या मनात काहीही असो, जेंव्हापासून माझं मन त्यावर जडलं, तेंव्हापासून, माझ्यासाठी, ते माझं झालं.
मी शोधू लागले त्याला आसपासच्याही झुडुपांमध्ये. आसपासच्या झाडांवर जाऊन ते लपलेलं असण्याची शक्यताही मी सोडली नव्हती! कारण आता मला पहायचंच होतं, की ते खरंच मला दिसलं होतं, की तो फक्त माझा भास होता? मनातली शंका मेंदूत डोकावेपर्यंत, अचानक कुठूनसं ते पाखरूही बाहेर आलं… नि एकदम माझ्या समोर गिरकी घेऊन पुन्हा कुठेतरी गायब झालं! असं अचानक समोर येऊन मनभर आनंद देऊन गेलं ते. पण आता मला त्याला अजून पाहायचं होतं… एकदा नाही दोनदा नाही, खूपवेळा… माझं मन भरेतोवर… आणि ते पुन्हा एकदा दिसलं. माझ्या आनंदाला आता पारावर नव्हता! त्या पाखरालाही माझ्याशी खेळण्यात रस दिसतोय, असं समजू लागले मी! असा लपंडाव थोडावेळ चालू राहिला. मी भान हरपून त्याच्या मागे धावत राहीले… नि मग अचानकपणे ते गायबच झालं! मला वाटलं, की ते मुद्दाम लपून राहिलंय, खेळतंय माझ्याशी… त्यामुळे बराच वेळ शोधत राहिले त्याला… मग एके ठिकाणी थांबून वाट पाहात बसले. वाटलं आता येईल… अजून थोड्या वेळाने येईल… अवचित… कुठूनसा माझ्या खांद्यावर, हातावर, बोटांवर येऊन बसेल… आणि पुन्हा माझी कळी खुलेल.. पण..
पण खरंच… खरंच त्या पाखराने माझ्याकडे पाहिलं तरी असेल का! नाहीतर ते असेल बागडत, त्याच्याच मस्तीत, त्याच्याच रंगीबेरंगी दुनियेत… समोर जो कुणी येईल त्याच्याशी ते असंच दोन क्षण मनमुराद बागडत असेल… आणि मी मात्र उगाच इथे, तर्क-वितर्क करून वेडी… ठार वेडी… होता होता वाचले!
— प्रज्ञा वझे घारपुरे
Leave a Reply