थांबलेलं काम पुन्हा सुरू झालं.
अशोक आणि अमिनला त्या माणसांचे चेहरे दिसत नव्हते.ती माणसं ओळखीची आहेत की अनोळखी आहेत हे पण समजत नव्हतं.
पण ते सगळे गुंड आहेत, मवाली आहेत आणि त्यांचं आता जे काही चाललं आहे ते भयानक आहे,हे मात्र त्या दोघांना समजत होतं.
ह्यामुळे फक्त आपल्यालाच नव्हे तर,साऱ्या रेहमानपाड्यालाच धोका आहे,हे ही त्यांनी ओळखलं होतं.
आता काहीतरी करायलाच हवं होतं!!
अमिन अशोकला कही बोलणार, तोच……. अशोकने अमिनचा हात घट्ट धरला आणि कुजबूजला, “मला कळतंय सारं! आपण बाहेर जाऊन पोलिसांना ह्याची खबर देऊ.
आपण हा रेहमानपाडा वाचवलाच पाहिजे!
ह्या गुंडांना धडा शिकवलाच पाहिजे!!”
“खरंय तुझं! पण…. एव्हढ्या रात्री, अम्मी आपल्याला घराबाहेर एकटं पाठवणार नाही.
आणि….
आपल्याला का जायचंय त्याचं खरं कारण आपण अम्मीला सांगू पण शकत नाही.
बाहेर जाण्यासाठी काहीतरी आयडीया करावीच लागेल. मुझे जरा सोचने दो यार. “अमिन भराभर एव्हढं बोलला. पण केव्हाच त्याच्या डोक्यात विचार चक्र फिरू लागली होती.
अशोक पण आपलं डोकं चालवत होता. पण छे! अम्मीला पटेल असं कारण त्याला काहीकेल्या सूचत नव्हतं.तो अगदी अस्वस्थ झाला होता.
एकदा खिडकीतून बाहेर तर एकदा अमिनकडे तो हताशपणे पाहात होता. हाताच्या मुठी वळत तो रागाने थरतरत होता.
तोच अमिन म्हणाला, “जय भारत! मिळाली आयडीया!!
अरे यार,आपण अम्मीला सांगूया की,तू घर बंद करून येताना,घरातले दिवे बंद करायला विसरला आहेस. आपण दोघे जाऊ आणि दिवे बंद करून पटकन परत येऊ. क्या…? कैसी है ये थाप..?”
“थाप तो अच्छी ही है! लेकीन अमिन, आपल्याला अम्मीशी खोटं बोलायला लागणार रे. मला त्याचं वाईट वाटतंय.
आपण खोटं बोललो, हे कळल्यावर तिला काय वाटेल?
कुछ दुसरी आयडीया नही क्या? तुम जरा फिरसे सोचो तो…..?” अशोकने असं म्हणताच अमिन सावरला.
अशोककडे रोखून पाहात, अत्यंत विश्वासाने अमिन म्हणाला, “नही अशोक! अब वेळ खूप कमी आहे.
आता थोडा जरी उशीर झाला, तरी हा रेहमानपाडा पेटेल.
इथे दंगल उसळेल.
माणसांची कत्तल होईल.
गरीबांची घरं बेचिराख होतील.
आपण काही अम्मीला फसवत नाही. आपण आल्यावर तिला नीट समजावून सांगू की.
तिची माफी ही मागू.
पण अभी……..
अभी हम मजबूर है अशोक!!
आता एक क्षण ही वाया घालवून चालणार नाही. प्लीज मेरी बात मान जाओ अशोक.”
अशोकने मान हलवली. अम्मीला थाप मारून अमिन आणि अशोक निघाले.
“नीट जा. उगाच इकडे तिकडे जाऊ नका. मला काळजी करायला लावू नका. झटकन जा,पटकन या.” असं त्यांना पुन्हा-पुन्हा बजावत अम्मीने अशोकला बॅटरी दिली.
बाहेर परिस्थिती काय आहे? कितीशी गंभीर आहे? ह्याची नीटशी कल्पना तिला नव्हती. “आता दंगल थांबली आहे. वातावरण निवळले आहे; असाच तिचा समज होता.
नाहीतर अम्मीने ह्या दोघांना असं एकटं पाठवलंच नसतं. ती स्वत: त्या दोघांबरोबर गेली असती. अम्मी काही डरपोक नव्हती. अम्मी मोठी धीराची बाई होती!
अलगदपणे दार उघडून अमिन अशोक बाहेर आले. दार बंद केलं.
पावलांचा आवाज न करता,सावकाश चालत, त्यांनी दोन गटारं ओलांडली.
एका घराजवळ ते आडोशाला थांबले.
त्यावेळी भयाण शांतता त्रासदायक वाटत होती.
अशोक अमिनच्या कानात म्हणाला, “हे बघ अमिन,तू इथेच थांब. इथे म्हणजे, ह्या भिंतीला चिकटूनच उभा राहा. अजिबात हालचाल करायची नाहीस तू.
हे गुंडलोक त्या मोठ्या पेट्या,पोती कुठं ठेवतात? हे तू पाहायचंस. त्यांचं बोलणं ऐकू आलं तर, कान देऊन ऐकायचं,लक्षात ठेवायचं. हे गुंड जर कुठे निघाले, तर त्यांचा हळूच पाठलाग करायचा. आणि जर… …
त्या गुंडांनी, आत्ताच काही घातक प्रकार करायला, हिंसक गोष्टी करायला, आगी लावायला सुरूवात केली……..
तर…… ही बॅटरी घेऊन तू दगडी भिंती जवळ सरळ यायचंस. आणि पोलीस चौकीच्या दिशेने, बॅटरी सतत चालू-बंद करून, तू मला सिग्नल द्यायचा!
मी आता सरळ स्स्त्याने जाणार नाही.
बाजूची गटारं ओलांडून मी त्या दगडी भिंतीजवळ जाईन. भिंतीवर चढून रेल्वे लाईनमधे उडी मारीन. तिथून धावतच, रेल्वे लाईन क्रॉस करून समोरच्या पोलीस चौकीत जाईन.
तू दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ इथे थांबू नकोस. अतिशय सावध राहा. उगाच हालचाल करू नकोस.
त्या गुंडांनी चुकून जरी तुला पाहिलं, तरी ते तुला जीवंत सोडणार नाहीत!!
माझी वाट पाहू नकोस. माझ्या अम्मीला सांभाळ.
जगलोच तर पुन्हा भेटू.
खुदा हाफिज!”
अमिनला काही एक बोलू न देता, अशोकने त्याच्या डोळ्यातलं पाणी टिपलं. त्याने प्रेमाने, मायेने त्याचा हात क्षणभर गच्च धरला.
आणि क्षणांत, दगडी भिंतीच्या दिशेने अशोक सुसाट धावत सुटला.
काळोखात मिसळून गेला. दिसेनासा झाला.
Leave a Reply