अमिन रडवेला होऊन तसाच भिंतीजवळ उभा होता.
अशोकचं बोलणं ऐकून तो सुन्नं झाला होता!
गुंडांचं काम जोरात सुरू होतं.
बाटलीत पेट्रोल भरुन,बुचात वात बसवून त्यांनी पेट्रोल बॉम्ब तयार केले.
काचेच्या नळकांड्यात अॅसीड आणि इतर विषारी रसायनं ओतून, त्यांनी अॅसीड बॉम्ब तयार केले.
हे बॉम्ब त्यांनी व्यवस्थित पेटीत ठेवले.
एका पोत्यात अत्याधुनिक स्वयंचलित रायफली होत्या.
दोघा गुंडांनी दोन रायफली खांद्यावर लटकवल्या. काहींच्या हातात तलवारी आणि चॉपर होते.
अॅसीड बॉम्ब तयार करून ते पेटीत व्यवस्थित ठेवण्याचे काम,जोरात सुरू होते. अॅसीड आणि पेट्रोल मुळे तयार झालेला विचित्र चरचरीत-जळजळीत वास सगळीकडे पसरला होता.
अमिन श्वास रोखून हे सारं पाहात होता. अशोकचं बोलणं त्याच्या डोक्यात घुमत होतं. अम्मीची काळजी वाटत होती.
त्याची छाती धडधडत होती.
भितीने त्याच्या पोटात गोळा आला होता.
पाय लटलटू लागले होते.
नाकाला झोंबणाऱ्या अॅसीडच्या वासाने तो अस्वस्थ झाला.
त्याच्या घशाला कोरड पडली.
आवंढा गिळताना त्रास होऊ लागला.
त्याचे तळहात गारठले. घामाने चिप्प भिजले आणि………….
आणि जे होऊ नये तेच झाले!!
अमिनच्या हातातली बॅटरी धपकन जमिनीवर पडली.
बॅटरी सुरू झाली…!
आणि…..
बॅटरीचा झगझगीत प्रकाश झोत गुंडांच्या अंगावर पडला!!!
क्षणभर गुंड घाबरले!
त्यांना वाटलं पोलीसच आले.
त्यांनी वळून पाहिलं तर…… अमिन थरथरत भिंती जवळ उभा होता.
अमिनने प्रसंगावधान राखले. त्याने भीत-भीत डाव्या हाताची मूठ बंद करून, करंगळी वर केली. त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता.
तरीपण एका गुंडाने त्याला दरडावले.
हातातल्या तलवारीनेच त्याने अमिनला घरी जाण्याची खूण केली.
बॅटरीच्या झोतात,ती तळपणारी तलवार आणि तोंडावर बांधलेल्या रुमालामागून डोकावणारे त्या गुंडाचे तांबरलेले डोळे पाहून अमिन भीतीने गारठलाच.
बॅटरी बंद करून अमिन निमूटपणे घरी गेला.
अम्मी घरी वाटच पाहात होती. अमिन एकटाच आलेला पाहून,अम्मीचे डोळे मोठे झाले. ‘अशोक किधर है?’ असं तिने खुणेनेच विचारलं.
अम्मीला काय सांगावं हेच त्याला सूचेना.
भितीने त्याची बोबडी वळली. अमिन काही बोलूच शकला नाही.
त्याने तोंड फिरवलं आणि उगाचच हवेत हात फिरवला.
अम्मीला निटसं काही कळलंच नाही. अमिन घाबरलाय हे ही तिला समजलं नाही.
अमिनने बॅटरी गादीवर फेकली आणि तो अम्मीला बिलगला.
अम्मी अमिनला थोपटत विचार करू लागली.
अशोक येण्याचा कानोसा घेऊ लागली.
गुंडांचं खूपसं काम आटोपलं होतं.
आता त्यांना, त्यातल्या दोन पेट्या आणि काही हत्यारे घेऊन, रेल्वे लाईनच्या पलीकडे असणाऱ्या वस्तीवर हल्ला करण्यासाठी जायचं होतं.
पेट्रोल बॉम्ब फेकून आगी लावणं आणि अॅसिड बॉम्बने माणसांना जखमी करणं, असा त्यांचा बेत होता.
ते पूर्ण तयारीनिशी, सावधपणे दगडी भिंतीच्या दिशेने सरकत होते.
काही जण मागे राहून, हातात तलवारी, चॅापर घेऊन पहारा करत होते.
काहीजण बंद संडासाच्या पायरीवर बसून होते.
समोरच्या वस्तीत आगी लागल्या की पुढच्या गोष्टींचा पुरवठा करण्याची जवाबदारी ह्यांच्यावर होती.
अशोक पोलीस चौकीत गेला तेव्हा इन्स्पेक्टर प्रधान तिथे होते. त्यांनी अशोकचं बोलणं काळजीपूर्वक ऐकलं.
अशोकचं धाडस आणि धडाडी पाहून इन्स.प्रधान क्षणभर चकित झाले!
इन्स.प्रधानांनी ताबडतोब राज्य राखीव पोलीस दलाशी संपर्क साधला. आणि…“आतापासून फक्त पंधरा मिनिटात आम्ही तेथे पोहोचतो. संपूर्ण रेहमानपाड्याला आम्ही वेढा घालतो.
आमच्या सोबत आठशे बंदूकधारी जवान आहेत. ओव्हर.” असा संदेश त्यांना बिनतारी संदेशवाहकावर मिळाला.
त्याबरोबर इन्स.प्रधान जीप मधे बसले.
एक हवालदार अशोकला शोधू लागला.
‘अम्मी काळजी करतेय, मला गेलंच पाहिजे’ असं म्हणत एक मुलगा आत्ताच पळाला, असं दारावरचा हवालदार म्हणाला.
इन्सपेक्टर प्रधानांनी सोबत चार हवालदार घेतले.
अंधार कापत जीप रेहमानपाड्याच्या दिशेने सुसाट निघाली.
इन्स.प्रधान विचार करू लागले की, “अशोक तसा हुशार चुणचुणीत मुलगा वाटला. पण मग तो, खबर देऊन पळाला का?
अम्मी काळजी करेल म्हणजे काय?
ही अम्मी म्हणजे अमिनची आई असू शकेल का?
अशोकने सांगितल्याप्रमाणे, अमिन अजून तिथेच उभा असेल? की त्याच्यावरच हल्ला झाला असेल?
आपण राज्य राखीव दलाशी संपर्क तर साधला आहेच,
पण……… ही खबरच जर खोटी निघाली तर…?”
असे एक ना अनेक प्रश्न इन्स.प्रधानांच्या डोक्यात थैमान घालू लागले.
रेहमानपाड्यापासून थोड्या अंतरावर जीप थांबली.
काळोखातून लपत-छपत इन्स.प्रधान आणि हवालदार कचरा कुंडीच्या जवळ आले. तिथेच अंधारात आडोशाला दबा धरून बसले.
इन्स.प्रधान अस्वस्थपणे हातातल्या पिस्तुलाशी चाळा करत होते.पंधरा मिनिटात येणाऱ्या मदतीची ते वाट पाहात होते.
वेळ संपता संपत नव्हता.
Leave a Reply