आता कुठल्या क्षणी काय होईल ते सांगता येत नव्हतं!!
त्या गुंडांना, नव्हे, त्या जनावरांना लहान मुलाच्या रक्ताची तहान लागली होती. त्यांच्या हातातल्या तलवारी, चॉपर, सुरे रक्तासाठी आसुसले होते.
खून…. आणि केवळ खून!! इतकंच त्यांना त्यावेळी समजत होतं.
अशोक आणि अमिन,अम्मीच्या मागे घाबरून न लपता, हातात हात धरून ते ताठपणे, त्या गुंडांसमोर उभे राहीले.
त्या गुंडांच्या बॉसने तर तलवार हवेत उगारून धरली होती.
अमिन त्या बॉसला ठणकावून म्हणाला, “एक पाऊल मागे व्हा. हा माझ्या आजोबांचा फोटो आहे.”
अमिनचे आजोबा म्हणजे अम्मीचे वडील.
ते स्वातंत्र्य सैनिक होते.
भारतासाठी लढताना त्यांना प्राण गमवावा लागला होता.
त्या खतरनाक गुंडांचा तो बॉस गुरकावला, “चूप्प बस बे. हमे उनसे क्या मतलब? ये लडका कौन है? ये तुम्हारे धरम का नही है! छोड दो उसका हाथ, वरना…, तुम भी उसके साथ मरोगे. हा हा हाऽऽऽ़”
दुसरा गुंड मधेच केकाटला, “तुम्हारा भी फोटो लगेगा उधर. ही ही हीऽऽ…”
त्यांच बोलणं ऐकून अम्मी संतापली, भयंकर चिडली. मुलांना मागे ढकलत, त्वेशाने बोलली, “उसकाही क्या,हम तिनोंका फोटो भी उधर लगने दो! हमे कोई दिक्कत नही!!
याद रखो, वो फोटो कोई फालतू फिल्म स्टार का फोटो नही.
ते माझे वडील आहेत.
गांधीजींच्या दांडी यात्रेत असताना त्यांनी आनंदाने, अभिमानाने डोक्यावर लाठ्या झेलल्यात!
स्वातंत्र्य युध्दात भाग घेऊन, त्यांनी हसत-हसत इंग्रजांच्या गोळ्या खाल्यात!!
मी त्यांची मुलगी आहे; आणि ही दोन माझी मुले आहेत.
मरणाला भिणारी भेकड माणसं, आम्ही नाही!
खुशाल तुमच्या तलवारी आमच्यावर चालवा; पण…. ….
पण, तुम्ही धर्माचं बोललात म्हणून एक सांगते, माझे वडील देशासाठी लढले, ते भारतीय होते म्हणून! फळणी नंतर आम्ही इथेच राहीलो, कारण आम्ही भारतीय आहोत म्हणून!
निळ्या, भगव्या किंवा हिरव्या झेंड्यापेक्षा आम्हाला प्रिय आहे तिरंगा झेंडा! कारण आम्ही भारतीय आहोत म्हणून!!
आणि,
आम्हा तिघांचाच काय पण सर्व राष्ट्रप्रेमींचा धर्म एकच आहे, तो म्हणजे भारतीय आणि भारतीयच!!
करा….. करा तुकडे आमचे! करून टाका खांडोळी.
ह्या तुमच्या तलवारी,चॉपरना आमचं भारतीय रक्त लागू दे.
तुमच्यासारख्या चक्रम गुंडांना भिऊन पळणारा, भारतीय नाही, हे ही तुम्हाला समजू दे.
आणि…… …….
नि:शस्त्रावर तलवारी घेऊन हल्ला करणाऱ्या तुझा…. आणि ह्या जमावाचा धर्म तरी कुठला आहे, हे मला समजू दे…..
अशोक आणि अमिन पुढे येत म्हणाले, “हे शुरांनो, आम्ही भारतीय असणं हा जर गुन्हा असेल, तर आम्ही आनंदाने मरायला तयार आहोत.”
अम्मी रागाने,त्वेषाने थरथरत होती.
तिचे डोळे आग ओकत होते.
दोन मुलांच्या ”खांद्याव आपले दोन हात ठेवून ती निर्भीडपणे ताठ उभी होती.
तिचा हा चंडीका अवतार पाहून, ते आक्रमक बेभान गुंड थिजून गेले. वार करण्याचं बळ त्यांच्यात राहीलं नाही.
आपला धर्म कुठला? हे सांगण्याचं साहस त्यांना झालं नाही.
ते अवाक होऊन पुतळ्यासारखे उभेच होते.
बॉस अस्वस्थपणे अम्मीची नजर चुकवू लागला.
नकळत त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत होता. त्यांच्यातली माणूसकी जागी होत होती.
अम्मी मृदू आवाजात, त्या गुंडांना आणि हातात तलवार घेतलेल्या त्या गुंडांच्या बॉसला म्हणाली, “मुलांनो,एक लक्षात ठेवा; शस्त्र उगारून कधी प्रश्न सुटत नाही. तुम्ही मुळात चांगली माणसं आहात.
कुणीतरी तुमच्या डोक्यात भलतं-सलतं भरवलंय. आणि तुम्ही आपल्या मातृभूमीशी बेईमानी करत आहात.
तुम्ही चांगले असूनही, फार वाईट वागत आहात.
पण, तुम्हाला भडकवणारे मात्र समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत. तुम्हाला पायदळी तुडवून,तुम्हाला बदनाम करून ते मजा करत आहेत.
एक सांगते,
आज सारा समाज तुम्हाला गुंड म्हणून, मवाली म्हणून ओळखतो. तुमची नफरत करतो.
इतकंच काय……. ………..
तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सुध्दा नकोसे वाटता!!
“माझे वडील खूनी आहेत! माझे वडील गुंड आहेत,राष्ट्राशी गद्दारी करणारे आहेत” असं तुमच्या मुलांनी इतरांना सांगताना, त्यांची मान शरमेने खाली जाते! रागाने त्यांचा चेहरा लाल होतो.
त्यांना लाऽऽऽज वाटते तुमची!!
अरे, आम्ही घरी आलो की, मायेने-प्रेमाने मुलं आम्हाला धावत येऊन बिलगतात. पण, तुमची मुलं?….
…… तुमची मुलं तुम्हाला भिऊन दूर पळतात!
हो ना? काऽऽय.”
एक क्षणभरच अम्मी बोलायची थांबली.
दोन पावलं पुढे सरकली.
त्या गुंडांच्या बॉसच्या पाठीवर थोपटत म्हणाली, “तुम्हाला पटतंय की तुमचं चुकतंय. चूक कबूल करायला लाजू नका.
चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा.
मी तुम्हाला मदत करीन. आपण सारे मिळून प्रयत्न करू.”
एक भयाण शांतता त्या खोलीत पसरली.
‘त्या तिघांची खांडोळी करून तिथून पळणं…
अशोकचा खून करणं…
पेट्रोल ओतून ते घरंच पेटवून देणं…
किंवा… …
शरण येणं….’
ह्यापैकी काहीही घडणं आता शक्यं होतं.
होय! काहीही घडणं!!
ते गुंड चुळबूळ करू लागले.
माना खाली घालून ते एकमेकांशी नजरेनेच बोलू लागले.
कमालीचे बेचैन झाले ते.
आता नेमकं काय करावं, हेच त्यांना कळेना.
Leave a Reply