रेहमानपाडा हा मुंबईतला मिश्र लोकवस्तीचा भाग.रेल्वेलाईनच्या कडेकडेने अजगरासारखा पसरलेला.
नोकरी मिळेल,रोजगार मिळेल,पोटाची टिचभर खळगी भरेल ह्या आशेने भारतातल्या अनेक भागातून कामसू, जिद्दी माणसं मुंबईत येतात. आणि मग, अगदी अडचणीच्या ठिकाणी पण झोपडी बांधून राहतात.दिवस-रात्र कष्ट उपसतात. थकल्यावर अंग टाकायला घराचा सहारा घेतात. रेहमानपाडा पण असाच वाढत गेलेला.
इथे अनेक वाकडे तिकडे गल्लीबोळ.त्यात दाटीवाटीने झोपड्या,बैठी घरं, दवाखाने, दुकानं,पानाच्या-चहाच्या टपऱ्या,वेगवेगळी देवळं,गोदामं आणि छोटे-छोटे कारखाने.त्यातूनच वाहणारी उघडी गटारं. घरात, दुकानात जायचं म्हणजे,गटार ओलांडूनच जावं लागतं. रेहमानपाड्यात एका कोपऱ्यात एका बाजूला एक मोठी कचरा कुंडी आहे.त्याच्या बाजूलाच एका रांगेत,सतरा सार्वजनिक संडास.विशेषत: बायका, मुलं, आजारी आणि वृध्द माणसं ह्याचा वापर करतात. पुरुषमंडळी दिवस उजाडण्या आधीच रेल्वे लाईनचा आसरा घेतात.
रेहमानपाड्यात हिंदू, मुसलमान, बौध्द, शीख, मल्याळी, कानडी, बंगाली असली अनेक जाती, जमाती, धर्माची विविध माणसं एकत्र राहातात. अधे-मधे छोटी मोठी भांडणं होतात, पाण्यावरून तंटे होतात,पण ते तेव्हढ्यापूरतंच. दुसऱ्या दिवशी पुन्हा सारे एक!. रेहमानपाडा म्हणजे कष्टकरी लोकांचं एक विशाल कुटूंबच आहे! त्यांच्यात एकोपा आहे. त्यांचा एकमेकांवर विश्वास आहे आणि म्हणूनच ते गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात. आपला धर्म आणि आपला देव आपापल्या घरातच ठेवतात.
ही गोष्ट आहे 1993 सालातली.
मुंबईत पेटलेल्या दंगली नुकत्याच थंडावल्या होत्या.
रेहमान पाड्यातील सर्वधर्मीयांनी मिळून,एक शांतता समिती बनविली होती. त्यामुळे रेहमानपाड्यात अजून तरी काही अनुचित प्रकार घडला नव्हता. पण तरीही सगळेच घाबरलेले. मनातून धास्तावलेले.
रेल्वे लाईनच्या पलीकडे जी वस्ती होती,त्याठिकाणी विशिष्ट जमातीची माणसे अधिक प्रमाणात राहात होती. आणि तिथे ही शांतता होती.काही गडबड नव्हती.
इकडच्या वस्तीत रोज निरनिराळ्या अफवा ऐकू येत. कधी,’काही माणसं आपल्या वस्तीवर हल्ला करणार.’ तर कधी,’समोरच्या म्हणजे रेल्वे लाईन पलीकडच्या वस्तीतली माणसं,आपल्या घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकून आपली घरे जाळून टाकणार. आपली वस्ती बेचिराख करणार!’ काही अफवा ह्याहूनही भयंकर!!
त्यामुळे,कधीही काहीही होईल ही प्रत्येकालाच धास्ती!
मुलांचा आरडाओरडा, दंगामस्ती, खेळणं, बायकांची भांडणं, चहा टपरीवर सदासर्वकाळ चालणारा कल्ला, गोदामातील-कारखान्यातील धावपळ हे सगळं आपोआप बंद झालेलं.
जो तो भेदरलेला. जबरदस्त घाबरलेला. संध्याकाळी सहा वाजले की दुकानं, कारखाने,चहाच्या टपऱ्या बंद होत. सर्वजण आपापल्या घरात दारं खिडक्या बंद करून चिडीचूप! संध्याकाळी सहा वाजताच सगळीकडे शांतता! रस्त्यावर शुकशुकाट. जणू काही,संचारबंदीच जारी केली आहे. घराघरात प्रचंड तणाव आणि रस्त्यावर भितीदायक सन्नाटा!!
ह्याच दिवसातली ही गोष्ट आहे.
रात्रीची वेळ होती.
आकाश ढगाळ झालं होतं. गार झोंबरा वारा भणाणत होता.
रेल्वे लाईन जवळच्या पिंपळाची सळसळ ऐकू येत होती. रस्त्यावर सामसूम होती. म्युनसिपालटीच्या दिव्यातून फिकट पिवळा प्रकाश झिरपत होता.सगळीकडे भयाण शांतता; आणि ही शांतता कापत जाणारा, धडाडत जाणाऱ्या रेल्वेचा आवाज. त्याचवेळी एका घरातले दिवे बंद झाले.
दार उघडलं.
एक मुलगा घरातून बाहेर आला.
दाराला कुलूप लावलं. किल्ली खिशात टाकली. अंधारातून लपतछपत, घरांचा आडोसा घेत, तो मुलगा, कचरा कुंडीच्या दिशेने निघाला.
चालताना पायाचा आवाज होऊ नये म्हणून तो झपाझप चवड्यावर चालत होता. उड्या मारत, उघडी गटारं ओलांडत होता. चार-पाच वळणं घेत, तो एका घराजवळ आला.
त्याने दारावर हलकेच तीन टिचक्या मारल्या. हळू आवाजात त्याने हाक मारली, “अम्मीऽऽऽऽ,अम्मीऽऽ”
अमिन आणि अमिनची आई अम्मी,अशोकची वाटच पाहात होते.
दार उघडत अम्मी म्हणाली, “आ,अशोक अंदर आ. अशोक बेटे खाना खाया?”
अशोकने फक्त होकारार्थी मान हलवली.
अमिनच्या खिडकीतून ती कचरा कुंडी आणि ते संडास दिसायचे. दिवे बंद करुन, अशोक आणि अमिन खिडकीला डोळे लावून बसले.
अम्मी अंधारात जपमाळ घेऊन बसली. अशोक आणि अमिन आता घरातच असल्याने ती आता निश्चिंत होती.
Leave a Reply