अश्रू साचले पापणी आड
मोकळे हलकेच होऊ दे,
वाट तुझी पाहता मी हलकेच
डोळ्यांत थेंब सारे तप्त कोरडे..
येशील का तू कातर क्षणी भेटाया असा
घेशील मज घट्ट मिठीत वेढून तेव्हा,
स्पर्श तुझा आश्वासक अलगद व्हावा
वाट तुझी पाहून थकले मी आता..
ओढ असेल ही काही गतजन्मीची
कसले हे ऋणानुबंध तुझ्या माझ्यात,
अलगद एकाकी गुंतले तुझ्यात मी
नकळत मोहरल्या माझ्या जाणिवा..
आर्त तुझी अबोल आठवण
का रे तू असा अलिप्त कोरडा,
घे अलवार घट्ट मिठीत मज
करपल्या कितीक नाजूक भावना..
ये तू असा अवचित सख्या
वेदना अनेक मनात साचल्या,
होईल मोकळ्या मिठीत तुझ्या
अश्रुत ओल्या माझ्या अव्यक्त व्यथा..
तप्त मोहरल्या तुझ्या मिठीत चेतना
व्याकुळ सांज वेळ ही कातर केशरी,
न कळतील कधी तुला रे माझ्या
तुझ्यात गुंतलेल्या नाजूक भावना..
वाट तुझी पाहते मी रोज कातरवेळी
सांज व्याकुळल्या केशरी छटा या,
का तुझी भूल आल्हाद पडावी मनी
गतजन्मीची ओढ अंतरी निःशब्द खुणा ..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply