ओमप्रकाश यांचा जन्म १९/१२/१९१९ रोजी लाहोर येथे एका घरंदाज घरात झाला. त्यांचे संपूर्ण नाव ओमप्रकाश छीबर. ती एकूण ४ भावंडे. ओम प्रकाशना नाटक, चित्रपट, व शास्त्रीय गायनाची अतिशय आवड होती. वयाच्या बाराव्या वर्षांपासून त्यांनी भाईलाल यांच्या कडे शास्त्रीय शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आणि त्यामध्ये निपुण झाले.त्यानंतर त्यांनी दिवाण मंदिर नाटक समाज या संस्थेत काम करण्यास सुरुवात केली.त्याकाळी स्त्रिया नाटकात काम करत नसत म्हणून ओमप्रकाश यांनी कमला या पात्राचे व रामलीला मध्ये सीतेचे काम करण्यास सुरुवात केली.लाहोर आकाशवाणीवर १९३७ साली महिना ३५ रुपयांवर नोकरी सुरू केली व फतेहदिन या नावाने कार्यक्रम सुरू केला. तो अतिशय गाजला.त्याच सुमारास त्यांचे एका शीख मुलीवर प्रेम जडले. पण तिच्या घरच्या लोकाना मुलगा हिंदू असल्यामुळे पसंत नव्हते. एकदा ओमप्रकाश यांच्या आईकडे एक विधवा आली व म्हणाली की माझ्या पदरात ४ मुली आहेत तुमच्या मुलाने जर मोठ्या मुलीशी लग्न केले. तर मी बाकीच्या मुलींची लग्न करू शकेन. ओमप्रकाश व त्यांची आई भावुक झाली. त्यांनी तिच्याशी लग्न केले. आकाशवाणीचा पगार कमी वाटला म्हणून ते जम्मूला काकाकडे गेले. लाहोरला एका लग्नात त्यांची ओळख प्रसिद्ध निर्माते दल सुख पंचोली यांच्याशी झाली. हेच पंचोली ज्यांनी प्राणना ब्रेक दिला होता. ओम प्रकाशनी फतेहदिन या नावाने कार्यक्रमात धमाल उडवून दिली.
काही दिवसांनी ओमप्रकाश यांना पंचोली कडून तार आली व भेटण्यास बोलावले. तिथे गेल्यावर पंचोलीनी सांगितले की मी कोणत्याही ओमप्रकाशला ओळखत नाही. त्यांना आश्चर्य व दु:ख वाटले. काही दिवसानी त्यांना एका पानाच्या दुकानावर प्राण भेटले. ओमप्रकाश यांनी सगळं प्राणना सांगितले. त्यांच्या लक्षात आले की काय झाले असेल त्यांनी ओमप्रकाश यांना पंचोलीना भेटावयास सांगितले. भेटल्यावर ते म्हणाले मी ओमप्रकाश म्हणजेच फतेहदिन . त्यांनी ओमप्रकाश यांना दासी चित्रपटात खलनायकांचे काम दिले व महिना ८० रुपये पगार देऊ केला. पण नंतर तुझी गरज नाही असे सांगितले. त्यानंतर त्यांना शरीफ बदमाश चित्रपटात महिना १००० रुपायवर काम मिळाले सगळे व्यवस्थित चालू होते. पण दुर्दैव आड आले देशाची फाळणी झाली. लाहोर मध्ये दंगे सुरू झाले. हॉकी खेळाडू नूर मोहमदने त्याना भारतात येणाऱ्या गाडीत बसवून दिले . नंतर सगळे कुटुंब भारतात आले. ओंम प्रकाश अमृतसर,तिथून वृंदावन,असे करत जालनधर आकाशवाणीवर कामाला लागले . तिथून ते नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आले. पण काम मिळेना. ओम प्रकाश खूप हताश झाले. त्यांनी व मित्र खुशीरामनी खोली भाड्याने घेतली. एक दिवस त्यांनी घरातल्या मारुतीच्या मूर्तीला सांगितले की उद्या मला काम मिळाले नाही तर मी तुझी मूर्ती फोडून टाकीन. दुसऱ्याच दिवशी बॉम्बे टॉकीज मधून माणूस आला व म्हणाला गांधीजीवर डॉक्युमेंटरी करायची आहे. ओंम प्रकाशनी स्वत: स्क्रिप्ट लिहिले व ४५ मीनिटाची डॉक्युमेंटरी बनवली. घरी आल्यावर त्यांनी मारुतीची माफी मागितली. त्यानंतर स्वता:ची खोली घेतली. त्यात त्यांचे सगळे पैसे खर्च झाले. ते तीन दिवस उपाशी होते. खोदादाद सर्कल येथे त्यांना भोवळ आली.ते एका हॉटेलात गेले व भरपूर जेवले. त्यांचे बिल १६ रुपये झाले. खिशात पैसे नव्हते. त्यांनी मॅनेजर मेहरा यांना वस्तुस्थिती सांगितली व पैसे मिळताच परत करण्याचे आश्वासन दिले मॅनेजरने त्यांना जाऊ दिले.
१९४८ साली निर्माता जयंत देसाईनी त्यांना लखपति चित्रपटात खालनायकांचे काम दिले व ५००० रुपये महिनावर कामावर ठेवले. पैसे मिळताच प्रथम ते खोदादाद सर्कल येथील हॉटेलात गेले व बिल चुकते केले. नंतर त्यांनी सगळ्या नातेवाईकांना मुंबईला बोलावले. ओमप्रकाश यांनी सुमारे ३०७ चित्रपटात काम केले . पाहुणा कलाकार हा प्रकार ओमप्रकाश यांनी सुरू केला. त्यांनी घरकुल या मराठी चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून काम केले. स्वत: चित्रपट निर्मिती केली गेट वे ऑफ इंडिया, संजोग, जहाआरा, चित्रपटाची निर्मिती केली. त्यांचा अभिनय इतका सशक्त होता की त्यांना भूमिकेची लांबी बघायची गरज भासली नाही. चरित्र भूमिकेचे ते बादशाह होते. त्यांच्या काही चरित्र भूमिका इतक्या ताकदीच्या होत्या की त्या चित्रपटांचे तेच हीरो होते. अन्नदाता, बुढा मिल गया हि त्याची उदाहरणे, साधू और शैतान मधील खजानजी,गोलमाल मधील इन्स्पेक्टर, पडोसन मधील मामा,चमेली की शादी मधील कुस्ती वस्ताद, नामक हलाल मधील ददु,शराबी मधील मुनशी जंजीर मधील अमिताभला निनावी टीप देणारा डि सीलव्हा,आणि चुपके चुपके मधील जिजाजी कोण विसरेल.भूमिकांच्या इतक्या छटा फार कमी जणांनी साकारल्या . जवळ जवळ ५० वर्षे ओमप्रकाश फिल्म इंडस्ट्री मध्ये होते. २१ फेब्रुवारी १९९८ त्यांचे निधन झाले.
— रवींद्र शरद वाळिंबे.
Leave a Reply