नवीन लेखन...

‘अस्सं माहेर’ सुरेख बाई …..

गेल्‍या चौदा वर्षात आम्‍ही आमच्‍या नातेवाईकांकडेच तळेगाव रसायनी पुणे आणि कोल्‍हापूर अशा भेटी दिल्‍या. पण आता आम्‍ही बेत करत होतो तो चिपळूणास जाण्याचा. आजोबा ज्‍या घरात राहात होते तिथे रहाण्याचा. पणजोळी रहाण्याचा. कोणाच्‍या आईने तर कोणाच्‍या वडिलांनी जुन्‍या जुन्‍या त्‍यांच्‍या लहानपणीच्‍या सांगितलेल्या आठवणीतल्‍या त्‍या दुमजली घरात त्‍या वास्‍तूत –आम्‍ही जाणार होतो. रहाणार होतो. माहेरपण उपभोगणार होतो. कोठे ‘जाणार’ म्हटलं की एक मिटींग असतेच. त्‍यावेळी सुरुवातीस आम्‍ही फक्‍त पाच-सहाजणीच तयार होतो. पण आपटे कुटुंबियांना कधीच एकटं खायला, एकटयानींच मौजमजा करायला किंवा फिरायला जायला आवडत नाही. कोल्‍हापूरला छोटया काकांकडे ४० वर्षांपूर्वी जाताना इंदू तू चल, नीला तू चल, करणाऱ्या वडिलांचेच संस्‍कार माझ्यावर.

फक्त आम्ही सात-आठ जण जायला तर मजा नाही. सर्व जणींनी सर्व कोकण पाहिलेलं मग काय, जायचं! हौशी मालतीवहिनीचे आणि माझे भावडांना फोन सुरु. ‘तू चल’, ‘तू चल’, असं करीत दादर, पार्ला, अंधेरी, ठाणे, पुणे अशा ठिकाणांहून आम्‍ही ३२-३३ माणसं चिपळूणच्‍या टुमदार घरात जमलो. चौदा वर्षांपूर्वी वडील आणि काकांबरोबर मी ते घर १० मिनिटेच पाहिले होते.

‘आमची भेट’

‘असावे घरटे अपुले छान पुढे असावा बाग-बगीचा वेमंडपी’, असे ते घर! मुंबईत छोटया छोटया फ्‍लॅटमध्ये रहात असल्‍यामुळे ‘घरच मुंबईला नेता आले तर…?’ असा विचार प्रथमच डोक्‍यात आला. १२,१३,१४ मे २००० असा तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रमच आखला होता.

‘खेडयामधले घर कौलारु’

‘खेडयामधले घर कौलारु’ अशा त्‍या चिपळूणच्‍या दुमजली कौलारु घरात आम्‍ही पहाटेच पोहोचलो. वहिनींनी चहाचं आधण ठेवलेलं होतं. हात-पाय धुवून प्रत्‍येक जण आला. आता जरा सगळ्यांनाच विरंगुळा मिळाला. ९२ वर्ष असलेल्‍या आणि आजही कृती व विचार तितकाच जागरुक परिपूर्ण प्रखर असलेल्‍या माझ्या दोन नंबरच्‍या ती. आप्पाकाकांनी (श्री. श्रीधर वामन आपटे) घराविषयी थोडी माहिती आराखडा कागदावर काढून दिला होता. त्‍यामुळे घराकडे अधिक बारकाव्‍यांसह पाहू लागलो.

गेटजवळ उभं राहिलं की समोर चांगलं लांब रुंद दुमजली टुमदार घर. पुढं अंगण. उजवीकडे विशेष लक्षात येणारं जांभळाचं झाड. फणसाची झाडे उजवीकडे पाण्याची मोठी टाकी, झाडेचझाडे वेली अनंत गुलाब मोगरा, जाई, जुई बकुळासारखी सुवासिक तर देवाला वहाण्यासाठी तांबडीभडक जास्‍वंदी. त्‍याच्‍यामागे भली मोठी विहीर व परिसर तर पाठी परस कोणत्‍याही कोकणातील घरात दिसणारं, ओसरी, पडवी,माजघर स्‍वयंपाकघर, तर पाठी परसदार.

ओसरी चांगलीच मोठी! त्‍याकाळात पणजोबा निष्णात वकील असल्‍यामुळे घरात भेटायला येणाऱ्या माणसांचा राबता भरपूर. भेटायला येणाऱ्या अशिलांना माणसांना बसण्याकरिता भले थोरले बाक. आठ-दहा माणसं सहज बसतील एवढं मोठं. पक्कं सागवानी लाकडाचं जड! ते उचलून हलविण्यासाठी सहा-सात माणसे लागत होती. सध्या आम्ही ते अंगणात आणलं होतं. तिथे पडवीत जायच्‍या पायऱ्यांच्‍या बाजूला एक गोल कडी. कशाकरता असेल बुवा हे ही वासरं जन्‍माला आल्‍यावर चार दिवस बांधून ठेवत.

ओसरीत शिरल्‍यावर दरवाजाच्‍या उजव्‍या बाजूला उभ्या पटट्यांवर एक फळी. आता फीक्‍सच करुन टाकलेय ती. पण त्याकाळी स्‍टँप चिकटवणं किंवा तत्‍सम कामाकरीता असलेली. उजव्‍या बाजूला होतं कोठार. त्‍यावेळच्‍या पणजोबांच्‍या वैभवाचं प्रतीकच. उजवीकडे भव्‍य झोपाळा. दिवसभर रिकामाच नव्‍हता. चार पायऱ्या चढून वरती पडवी. जुन्‍या हिंदी मराठी सिनेमात दाखवित त्‍याप्रमाणे मुनिमजीच्‍या जागेची आठवण करुन देणारी. ऑफिसच भासते जणू. पडवीत भिंतीवर थोडया थोडया अंतरावर आठ-दहा लाकडी खुंटया पाहून हसायलाच आले. घरातल्‍या प्रत्‍येक पुरुषाला सदरा टोपी, पगडी, पिशवी ठेवण्याकरिता एक एक खुंटी. अवजड कपाटं नाहीत. कितीतरी साधेपणा.

पडवीच्‍या आतील बाजूस माजघर प्रत्‍येक दरवाज्‍यावर एक कोनाडा तुपासारख्या किंवा इतर जपून ठेवायच्‍या वस्‍तू इथे सुरक्षित. माजघरात उजवीकडे देवघर. देवघरात ‘व्‍याडेश्वराची’ तसेच इतर देवदेवतांच्‍या तसबिरी. माजघरात दोन-तीन ठिकाणी बांधकाम करताना, भिंतीत आता पक्के बसविलेले पाण्याचे तांबे.  पडवीतच डाव्‍या बाजूला वरच्‍या माडीवर जायला जिना. तर जिन्‍याखाली बाळंतिणीची खोली. ही काळोखाचीच खोली जणू ! तिला एक छोटीसी उभे गज असलेली खिडकी. आतूनच बाहेर पहाण्याकरिता. मोठमोठया ताक घुसळण्याच्‍या रव्‍या चरवी मोठी-मोठी मडकी. उखळ मुसळ वस्‍तू-भाजीपाला सुरक्षित ठेवण्यासाठी चौकडी लाकडी माचण. आजसुद्धा १०० वर्षांपूर्वीच्या अनेक वस्‍तू सुरक्षित व व्‍यवस्‍थित आहेत. अजून थोड्या वर्षांनी त्या सर्व वस्तू ‘अँटिक पीस’ वाटतील

तेव्‍हाच्‍या घरांच्‍या सुरक्षितेतसाठी केल्या जाणाऱ्या तरतुदींची मोठी मजाच वाटली. तेव्‍हाची माणसं आजकालच्‍या माणसांसारखी सर्रास सुशिक्षित नसतीलही, पण हुशार नक्कीच. माजघर ही सर्वात सुरक्षित जागा. माजघरातील प्रत्‍येक दरवाजाला भिंतीत पूर्ण लपून रहाणारा अडसर. दारं बंद केली. ‘अडसर’ आडवे केले की भीतीच नाही. आजची कुलुप सुद्धा कुचकामी ठरतील त्‍यापुढं !

स्‍वयंपाक घरातल्‍या चुलीची जागा घेतली आहे आज गॅस आणि शेगडयांनी. पण अनिता वहिनींनी लाकडं सारुन केलेली अंगणातल्‍या भल्‍या मोठया पातेल्‍यात केलेली आठोळया गऱ्यासकटची फणसाची भाजी आजही जिभेवर रेंगाळत आहे. पाठी मोठे परसदार. तिथेही आज आजूबाजूला सिमेंटक्राँकीटच्‍या तीन-तीन मजली इमारती उठू पहात आहेत. पण आमचं परसदार तसंच आहे. परसदाराच्‍या दरवाज्‍यातून उजवीकडे विहीर दिसते.

आम्‍ही सर्वजण मुंबईची झगमगती दुनिया विसरलोच होते. रोज उठल्‍या उठल्‍या चहाची तल्लफ लगेच भागवणारी माझी बहीण विद्या चहा पिण्याच्‍या अगोदरच केसांचा अंबाडा घालून बकुळीचा गजरा माळत तर होतीच, बरोबर अनंताची पांढरी फुलंसुद्धा ! कोणालाच घाई नव्‍हती की कोणालाच सकाळची ८.१७ ची फास्‍ट लोकल गाठायची नव्‍हती. भावांनी ठेवलेली चोख व्यवस्‍था आणि वहिनीने घेतलेला स्‍वयंपाकघराचा ताबा. आम्‍ही माहेरवाशणी थोडी फार मदत करत होतो इतकचं.

फणसांच्‍या ‘गऱ्यांचा’ आनंद, चहापान, जेवण आणि विश्रांती झाल्‍यावर आम्‍ही ‘विंध्यवासिनीनि’ आणि नदीपलीकडच्या पटवर्धनांच्या ‘करंजाई’ हया कुलदेवतांचे दर्शन घेतले. रात्री गरमागरम भाकऱ्या आणि पिठलं. सर्वांच्‍या अंगतीपंगतीत चार घास जरा जास्तच जातात!. तिथे सर्वांनी एकत्र बसून गणपती ‘अथर्वशिर्ष’ म्‍हटले. तेथूनच आमच्‍या गोखल्यांचे कुलदैवत असलेल्या वेळणेश्वराचे दर्शन. चौदा वर्षांपूर्वी मी दर्शन घेतल्‍यानंतर पुन्‍हा आपण इथे येऊ असं वाटलंच नव्‍हतं. आज तेच सहज शक्‍य झालं. तिथून माहेरचं आपटयांचं कुलदैवत व्‍याडेश्वर आणि पाठचा संपूर्ण समुद्रकिनारा. एकाचं दिवसात सासर आणि माहेरच्‍या कुलदैवतांचं दर्शन. मन अगदी तृप्‍त झाले. त्‍याच्‍यानंतर परचुरे यांच्‍या उपहारगृहातील अत्‍यंत आदरातिथ्यासह असणारं श्रीखंड आणि संपूर्ण गरमागरम, घरगुती जेवण.  येताना डेरवणला भेट. तिथे  उभारण्यात  आलेल्याशिवसृष्टी’ मध्ये शिवाजी महाराजांच्या  जीवनातील  ऐतिहासिक  प्रसंगांची  शिल्पे  कोरण्यात  आली आहेत.

 

परसदार, मोठे घर, प्रशस्‍त अंगण एवढं सगळ खालच्‍या खाली हिंडायला असल्‍यावर आम्‍ही फारच कमी वेळा जिना चढून माडीवर गेलो. माडीवर पलंगासह झोपायची सोय माडीच्‍या बाहेर संपूर्ण छोटी गॅलरी.नंतर ‘परशुराम’ ला भेट. संध्याकाळी गावातील ‘बहिरीच्या’ देवळास भेट आणि जवळच बागेशेजारील चिपळूणात प्रसिद्ध असलेल्‍या ‘अनंत’ आईस्‍क्रिमचा आस्‍वाद. थोडीफार साठं, कोकम सरबत इतकीच खरेदी.

मागच्‍या पिढीतील ताई-भाऊ, काकू-बापू आणि आमच्‍या आई-वडिलांचे आदर्श संस्कार आमच्‍या सर्व बहीण भावंडांवर झालेले. रोज रात्री आम्‍ही सर्वजण बसून ‘रामरक्षा’ म्‍हटली. ‘मानसिक शांती’ हीच जमेची बाजू. माझे माहेर गिरगावांत आंग्रेवाडीत. तिथे आम्‍ही लहान असताना गाववाले विष्णू साठे, रघू आगाशे वगैरे मंडळी तासनतास येत व गप्पा मारीत. ती अशी कां येत असत? हयाच उत्तर कोकणात आल्‍यावर त्‍यांची बाजूचीच घरे पाहून मिळालं. कोकणातून मुंबईत आल्‍यावरसुद्धा एकमेकांना भेटण्याची ओढ आणि आपलेपणा.

कोकणचे सृष्टीसौंदर्य,

काळाप्रमाणे कोकण रेल्‍वेबरोबरच कोकणसुद्धा बदलताय. कोकणची घरे जाऊन काँक्रीटीकरण होताय. आज घराघरात गॅस, फ्रीज, मिक्‍सर, टीव्‍ही, फोन स्‍थिरावलेत. महिलासुद्धा नोकरी करु लागल्‍या आहेत. मे महिन्‍यातसुद्धा काश्मीरइतकं निसर्गसौंदर्य असणारं कोकण ! माझ्या भावाने –अरुणने-घराचं घरपण राखलंय. त्‍याला साथ दिली अनिता वहिनींनी आणि लग्न होऊन सासुरवाशीण झाली असूनसुद्धा चार दिवसांकरीता माहेरी येऊन कंबर करणाऱ्या जास्‍वंदी उर्फ ‘जासू’ नी.

कोकणातल्‍या हया अनेक स्‍मृती पुढील कैक भेटीत, आमच्‍या गप्पांचा विषय होतील आणि ह्याच  चाळविलेल्या स्मृति आम्हाला परत, ‘परत ‘माझ्या माहेराला’ घेऊन जातात’! माझा भाऊ, माधवने, मे २००० मध्ये काढलेल्या त्या ‘दृक्श्राव्य’ चित्रीकरणामुळे ‘माहेरपणाचा’ पुनर्प्रत्यय येतो!

— सौ. वासंती गोखले (आपटे) अंधेरी

२५ मे २०००-लिखित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..