महाभारतातील एक गोष्ट आहे. एक गरीब वृद्ध हस्तिनापूरला गेला आणि धर्मराजाला भेटून त्याने दानाची याचना केली. मात्र सूर्यास्त झाल्यामुळे नियमानुसार धर्मराजाने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तो बिचारा माघारी फिरला. हे भीम पहात होता. तो धर्मराजाला म्हणाला, ‘दादा, एक विचारू का? तुम्ही त्या याचकाला उद्या दान देण्याचं कबूल केले आहे, मात्र त्याच्या उद्याच्या आयुष्याची तुम्ही खात्री देऊ शकता का?’ धर्मराजाला आपली चूक कळून आली. त्यांनी त्या वृद्धाला बोलावून घेतले व भरघोस दान दिले.
भीमानं विचारलेला प्रश्न तसा छोटा असला तरी अस्वस्थ करणारा आहे. हा प्रश्र्न जो स्वतःला विचारतो, त्याला आयुष्याचं खरं महत्त्व कळतं.
जो मला काल भेटला होता, तो आज नाहीये. जो काल माझ्याशी फोनवर भरभरुन बोलला, तो आत्ता नाहीये. असे अनेक प्रसंग आजूबाजूला नेहमीच घडत असतात.
हा क्षण माझा आहे,
पुढचा क्षण माझा नाही…
हे कटू सत्य एकदा का आपल्या लक्षात नक्की ठेवलं की, संताप, चीड, द्वेष, मत्सर या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहते सूर, ताल, लय, ठेका घेऊन आलेलं, आयुष्याचं रंगेबेरंगी सुंदर गाणं!
जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात, ती गेल्यानंतर त्यांचे चौकात पुतळे उभारले जातात.
जे शास्त्रज्ञ, विचारवंत असतात त्यांचे विचार ते गेल्यानंतरही पुस्तकातून भेटतात.
मोठे कलावंत, गायक त्यांच्या मागे राहिलेल्या कलेतून, कृतीतून आपल्याला आठवतात.
पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं काय? शरीरातून जीव गेल्यावर कुठे असतो आपण? कुठल्या रुपात मागे उरतो आपण?…
माझ्या घरात आज मी आहे, कदाचित उद्या नसेन. माझ्या जागी मिणमिणता दिवा असेल.
दहा दिवसांनी तो विझेल. त्या जागी माझा एक फोटो असेल. लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम, हसरा फोटो.
काही दिवसांनी लटकलेल्या फोटोवर धूळ साचलेली असेल. किंवा त्या फोटोची पातळ काच तडकलेली असेल.
काही वर्षांनंतर माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल.
आणि मग… त्यानंतर पिढ्यानपिढ्या माझ्याच घरात माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल…
आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या ह्या श्र्वासांचं रूपांतर आपण उत्सवात करायचं का?
तसं करायचं असेल तर….
कुणालाही दुखवू नका,
कुणालाही कमी लेखू नका,
कुणाचाही अपमान करु नका..
कारण, तुम्ही केलेले कर्म तुमच्याकडेच फिरुन येणार असते… म्हणून जगा आणि जगू द्या….
सदरची पोस्ट मला फेसबुकवरच मिळाली. ती वाचल्यावर मनाला भावली. म्हणूनच आपणासाठी पुनश्च लिहिली…
– सुरेश नावडकर
२०-२-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.
Leave a Reply