मराठी ज्योतिर्विद, खगोलशास्त्राचे अभ्यासक व ग्रंथलेखक शं. बा. दिक्षित यांचा जन्म २१ जुलै, १८५३ रोजी मुरुड येथे झाला.
आपल्या विद्वत्तेने जगन्मान्यता मिळवणाऱ्या मराठी माणसातले एक अग्रगण्य नाव म्हणजे शंकर बाळकृष्ण दीक्षित. मुरुड येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्याच काळात त्यांनी अमरकोश पाठ करून काव्य, व्याकरण इ.संस्कृत विषयांचा प्राथमिक अभ्यास पुरा केला. १८७० ला पुण्यास येऊन त्यांनी ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८७३ ला ती परिक्षा व ७४ ला मॅट्रिक्युलेशन पास झाले. त्यांनी अध्यापन हाच व्यवसाय निवडला. त्यांचा सुरवातीचा पगार २५ रु. व निधन पावले तेंव्हा ४५ रु. या परिस्थितीतही त्यांनी अव्याहत विद्याव्यासंग चालू ठेवला व आपल्या ज्ञानाच्या दीप्तीने पाश्चिमात्य विद्वानांनाही चकित केले. लेले यांच्या सायनवादाने प्रभावित झाल्याने त्यांचे लक्ष ज्योतिषशास्त्राकडे वळले व ठाण्यास असतांना मोडक यांच्या सहवासात त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विशेष अभ्यास केला. सायनपंचांग ते प्रसिद्ध करू लागले. सूक्ष्म अध्ययनामुळे ज्योतिषक्षेत्रात दीक्षितांचा अधिकार एवढा वाढला डॉ.फ़्लीट सारख्या इतिहास तज्ञाला त्यांची मदत घ्यावी लागली. डॉ. फ़्लीट लिहतात की “यांची मदत नसते तर मला गुप्तांचा शककाल निश्चित करता आला नसता.”रॉबर्ट सेवेलने दीक्षितांच्या मदतीने “इन्डिअन कॅलेन्डर” हा ग्रंथ निर्माण केला व तो भारतीय इतिहासाच्या संशोधनास अतिशय उपयुक्त ठरला.या ग्रंथात पंचांगासंबंधीच्या व कालगणनेच्यासर्व बाबींची माहिती दिली असून भारतातील प्राचीन व अर्वाचीन शकांची चर्चा केली आहे. इ.स. ३०० ते १९०० या सोळा शतकातील तिथि-तारखांचा मेळ दाखविणारी सारणी दिली आहे. भारतातील भूवर्णन या पुस्तकात प्राचीन स्थानांची निश्चिती केली आहे.
ज्योतिर्विलास उर्फ रात्रीची चार घटका मौज आकाशस्त ग्रहतार्यांसची ओळख करून देणारे पुस्तक शास्त्रीय विषयावरचे असूनही मनोरंजक आहे.
“भारतीय ज्योतिषशास्त्र” हा त्यांचा जगप्रसिद्ध ग्रंथ होय. तो नीट समजवून घेता यावा म्हणून पाश्चिमात्य शास्त्रज्ञ मराठी शिकले ! या ग्रंथाच्या सिद्धतेसाठी त्यांनी पाचशेहून अधिक संस्कृत ग्रंथांचे अध्ययन केले.दुर्बोध बनलेल्या अनेक विषयांचा उलगडा केला. पंचांगशोधन व तत्संबद्ध मतमतांतरे यांचा परामर्श घेतला व हे शास्त्र केवळ भारतीयांनीच सुविकसित केले हे सिद्ध केले. ‘कृत्तिका पूर्वेस उगवतात ; त्या तेथून चळत नाहीत’ या शतपथ ब्राह्मणातून घेतलेल्या वाक्यावरून त्यांनी शतपथ ब्राह्मणाचा काल इ.स.पूर्व २००० वर्षे असा ठरवला. टॉलेमीपूर्वीच्या वासिष्ठ सिद्धांतात अंशाचे साथ भाग सापडतात हे त्यांनी दाखवून दिले व ” टॉलेमीपासून हिंदूंना ज्योतिशाचे सर्वस्व मिळाले ” या बर्जेच्या प्रतिपादनाला उद्ध्वस्त केले.
शं.बा.दिक्षित यांचे २७ एप्रिल १८९८ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply