२००८ या वर्षाची सुरवातच कार्यक्रमाने झाली. १ जानेवारी २००८ रोजी कस्तुरी कॉलेज, शिक्रापूर येथे कार्यक्रम केला. या कार्यक्रमाचे निवेदन अभिनेता विघ्नेश जोशी याने केले. पुढील कार्यक्रम इंडियन ऑईल अँड नॅचरल गॅस कॉन्फरन्समध्ये झाला. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री उपस्थित होते. एप्रिलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त ठाणे शहरात भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. या रथयात्रेत ठाण्यातील कलाकारांचा कलाकार रथ समाविष्ट करण्यात आला. या रथावर बसून ठाणेकरांचा उत्साह पाहताना आगळीच मजा आली. यानिमित्त ‘चित्ररथ नांदी’ ही सीडी प्रकाशित करण्यात आली. यातही माझे गाणे होते. या वर्षाच्या सुरवातीलाच झालेल्या शिक्रापूर येथील कार्यक्रमाला चांगलीच लोकप्रियता लाभली. म्हणूनच श्रीस्वामी समर्थ मठ, शिक्रापूरसाठी ७ एप्रिल २००८ रोजी मी आणखी एक कार्यक्रम सादर केला. हाच माझा ८०० वा जाहीर कार्यक्रम होता. म्हणजेच फक्त एका वर्षात मी ७५० वरून ८०० कार्यक्रमांपर्यंत पोहोचलो होतो. गणिताच्या दृष्टीने अजून चार वर्षातच मी १००० कार्यक्रमांपर्यंत जाऊ शकत होतो. पण कार्यक्रमांची ही गती कायम ठेवणे बिलकूल सोपे नव्हते. कधी कधी एका कार्यक्रमासाठी देखील बराच वेळ वाट पहावी लागते. अनेक ठरलेले कार्यक्रम आयत्या वेळी रद्द होतात. अर्थात या सर्व अडचणींना तोंड देतच येथपर्यंत पोहोचलो होतो. यानंतर सत्कर्म प्रतिष्ठानसाठी ‘फर्माईश’ हा कार्यक्रम केला, तर ‘गझल त्रिवेणी’ हा गझलवरील खास कार्यक्रम डॉ. अश्विन जावडेकर आणि विनय राजवाडे यांच्याबरोबर डेंटल असोसिएशनसाठी केला.
संगीतकार प्रभाकर पंडित यांच्या शिष्या वैशालीताई सोनाळकर आता माझ्याकडे गाणे शिकत होत्या. त्यांचा हिंदी गाण्यांचा अल्बम आम्ही रेकॉर्ड केला. त्यात माझेही एक गाणे होते. या अल्बमचे संगीत संयोजन सागर टेमघरे याने केले. स्प्रिंग्ज कंट्री क्लबसाठी चिंतामणी सोहनीबरोबर एक गझलचा कार्यक्रम केला. माझे थोरले बंधू मकरंद केतकर यांच्यासाठी पुणे येथे ‘गीत गझल उत्सव’ हा कार्यक्रम केला.
सह्याद्री चॅनेलवरील ‘वा रे वा’च्या दिवाळी स्पेशल कार्यक्रमामध्ये माझी दोन गाणी झाली. या कार्यक्रमाचे निर्माते शरण बिराजदार होते. या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग १४ ऑक्टोबर या माझ्या वाढदिवशी झाले. शरणजींना माझा वाढदिवस माहीत असल्याने मुंबई दूरदर्शनच्या रेकॉर्डिंग स्टुडिओतच मला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला. मी आवाक्च झालो. माझे डोळे आनंदाने भरून आले. अशा मित्रांचे प्रेम ही माझी फार मोठी शिदोरी आहे.
आरोग्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टरांची एक कॉन्फरन्स येऊर येथे आयोजित केली होती. त्यासाठी माझा गझलचा कार्यक्रम आयोजित केला होता. आमदार राजन किणे यांच्यासाठीही गझलचा कार्यक्रम मुंब्रा येथे केला.
संगीतकार चिनार-महेश या काळात ‘मानसन्मान’ या मराठी चित्रपटाचे संगीत करत होते. या चित्रपटासाठी मी दोन गाणी गायली. सावनी रवींद्र आणि सचीन मुळे तसेच सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांची कन्या अनन्या वाडकर असे इतर कलाकारही या चित्रपटात गायले. या चित्रपटाचे रेकॉर्डिंग पंधरा दिवस सुरू होते. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांच्यासाठी मी पार्श्वगायन केले.
माझा पुढील गझलचा कार्यक्रम हॉटेल फरियाज, लोणावळा येथे झाला. आयोजक डी. जे. वर्दे यांच्या एनडीई- २००८च्या कॉन्फरन्ससाठी हा कार्यक्रम झाला. त्यानंतर पुण्याला गेलो. तेथील टिळक स्मारक मंदिरच्या सभागृहात गझलचा कार्यक्रम करून २९ डिसेंबर २००८ रोजी ठाण्याला परतलो. यावर्षी मी ८०० जाहीर कार्यक्रम पूर्ण केले. पण कार्यक्रमांपेक्षा रेकॉर्डिंग्ज या वर्षात जास्त झाली.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply