नवीन लेखन...

आठवणीतील शिक्षक

आपलं वय तीन वर्षे पुर्ण झालं की एक माणूस आपल्या आयुष्यात डोकावतो तो साधारणपणे पुढची सतरा वर्षे आपल्या सोबत असतोच, वेगवेगळ्या रूपांत. हा माणूस म्हणजे ‘शिक्षक’. या वेगवेगळ्या रूपांपैकी काही रूपं, रुपं म्हणण्यापेक्षा काही माणसं म्हणुया, सदैव आठवणीत रहातात. पण आपल्या आयुष्यात निव्वळ हेच शिक्षक असतात का ? मला नाही असं वाटत. या शिक्षकांव्यतिरिक्त इतर अनेक माणसं शिक्षकाच्या रुपात आपल्याला भेटत असतात, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत.

आज पाच सप्टेंबर. म्हणजे अर्थातच शिक्षक दिन. यानिमित्ताने माझं मन भुतकाळात गेलं आणि माझ्या आठवणीतील शिक्षकांचा धांडोळा घेत राहिलं. मन सर्वप्रथम पोहोचलं ते अर्थातच माझ्या आईशी. आई ही आपली पहिली शिक्षिका. ती आपल्याला जन्म देतेच. पण ती काय शिकवत नाही आपल्याला ? अगदी बोलणं, ऐकणं, उभं रहाणं, चालणं. त्यानंतर स्वतःच्या हाताने कसं जेवायचं हे देखील शिकवते आणि आणखीन बरंच काही. आईसारखा दुसरा ‘शिक्षक’ नाही. आपलं मुल कितीही मोठं झालं तरी तिचा अर्धा जीव सदैव तिच्या पिल्लाचाच विचार करत असतं.

माझ्या मनानं दुसरा हाॅल्ट घेतला तो माझ्या वडिलांशी. आमचे पिताश्री म्हणजे अगदी जमदग्नीचाच अवतार म्हणा ना ! पण तरीही मुलाबद्दल सहृदयता असतेच ना मनात. आईपेक्षा ते कमीच वाट्याला आले, त्यांच्या शिफ्ट ड्युटीमुळे. पण तरीही प्रत्येक काम नीट नेटकं करणं, वेळेपुर्वीच इप्सित स्थळी पोहोचणं, वेळच्या वेळी सर्व कामं करणं, इत्यादी चांगल्या सवयी त्यांचं अनुकरण केल्याने लागल्या असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणखी एक म्हणजे घरातलं कोणतंही खरकटं भांडं घासलं आणि विसळलं की ते कोरड्या फडक्याने पुसुनच अगदी कोरडं ठाक करूनच जागेवर गेलं पाहिजे हा त्यांचा शिरस्ता होता. तो अस्मादिकांनी पुढे सुरूच ठेवला आहे.

शालेय किंवा काॅलेज शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर एकच शिक्षक अगदी निरंतर स्मरणात राहिले आहेत, ते म्हणजे भुरके सर. माझ्या आठवणीप्रमाणे मी आठवी ते दहावी त्यांच्याकडे ट्यूशन्सला जायचो. तेव्हा ट्युशन्स फी किती होती ठाऊक आहे ? महिना वीस रूपये. पण मला आठवतंय की मी नववीत असताना माझी नववीची ट्युशन ते घ्यायचेच पण दहावीच्या बॅचला देखील हजर रहायला सांगायचे, तेही वाढीव फी न घेता. ‘पायथागोरस’ तर त्यांनी अगदी घोटवून घेतला होता आमच्याकडून. ते देखील कुडी कुटुंबीय रहायचे त्या बिल्डिंगच्या गच्चीवर अगदी एकांतात. पहाटेच आम्हा सर्व विद्यार्थ्यांना बोलावलं होतं. त्या गच्चीवर त्या दिवशी ‘पायथागोरस’ अगदी फिट्ट बसवून टाकला आमच्या डोक्यात त्यांनी.

अस्मादिकांचं शिक्षण संपलं आणि चिकटले एकदाचे सरकारी नोकरीत. तेथे दुसर्‍याच महिन्यात गाठ पडली ती श्री. गिरीश कोचरेकर यांच्याशी. एकदम मस्त माणूस. प्रदीप भिडे यांची आठवण होईल असा तोंडावळा. अगदी तरूण होते ते. बहुतांशी समवयस्कच. आमच्या सेक्शनचं काम होतं नेमकं नोटिंग आणि ड्राफ्टिंगचं. म्हणजे टिप्पणी सादर करणं आणि उत्तराचं पत्र तयार करणं. मला लिहिण्याची आवड होतीच आणि नोटिंग, ड्राफ्टिंगमधल्या गुरूशी गाठ पडलेली. त्यांचं डिक्टेशन आणि नोटिंग, ड्राफ्टिंग बघून बघून माझी लेखनशैली आणखी विकसीत होत गेली. त्यांनी मी केलेल्या कामाचं चीजही केलं, अत्युत्कृष्ट सी. आर. देऊन.

ऑफिसमध्ये आणखी एका माणसाशी गाठ पडली. श्री. श्रीकांत शाळिग्राम. वयाने माझ्यापेक्षा थोडं लहानच पण बुध्दी किंवा ज्ञानाने खुप मोठं व्यक्तीमत्व. ऑफिसमधील कामाबाबत काही क्वेरीज असतील तर या मित्राला गाठलं की चुटकीसरशी सोल्युशन मिळायचं. त्यामुळे तो नेहमी दीपस्तंभासारखाच भासायचा.

आणखी एक शिक्षक मला लाभला तो माझ्या पत्नीच्या रूपात. प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच येतच असतात. आमच्या बॅड पॅचच्या काळात [ अगोदर आणि नंतरही ] ज्या दृढतेने तिने समोर आलेल्या परिस्थितीचा सामना केला ती तिच्याकडून मिळालेली बहुमोल शिकवणीच होती. एवढंच नव्हे तर त्याच बॅड पॅचच्या काळात आमच्या लहान मुलाचं सर्व पालनपोषण करून नोकरी मिळवून व जिद्दीने पुढे अभ्यास करून व दोन परीक्षा देऊन अधिकारी पद मिळवून दाखवलं तिनं. आईनंतर मला भेटलेली आणखी एक उत्तम शिक्षिका.

एक छोटा शिक्षक देखील भेटला आयुष्यात, माझ्या मुलाच्या रूपात. माझ्याकडे स्मार्ट फोन नव्हता. तेव्हा स्मार्ट फोन कोणता घ्यायचा, तो कसा ऑपरेट करायचा, WhatsApp आणि Facebook डाऊनलोड करून घेणं, त्यांची functions समजावून घेऊन टेक्नोसॅव्ही कसं व्हायचं याचं मार्गदर्शन त्याच्याकडून मिळतंच आहे. वेगवेगळी पुस्तकं वाचण्यासाठी आणि वेगवेगळ्या सिरीज बघण्यासाठी सुचवणं, इत्यादी तो करत असतो, सातासमुद्रापार असूनही. पण तो अगदी घरातच आहे असं वाटत असतं नेहमी. मी काळाबरोबर रहावे यासाठी त्याची मला शिकवणी सुरू असते असं म्हंटलं तर ते वावगं ठरणार नाही.

आणखी एका शिक्षकाचा उल्लेख केला नाही तर हा लेख अपूर्ण राहील. ते शिक्षक म्हणजे माझे साडू श्री. स्वप्निल साठे. सेल्स टॅक्स आणि इनकम टॅक्सबाबत काही विचारणा करायची असेल तर किंवा जीवनात काही वेळा एखाद्या वळणावर निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा माझ्याकडुन यांच्याच मोबाईलवर रिंग जाते आणि त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनानंतर मी निर्धास्त होतो.

इतरही काही माणसं मला भेटली, की ज्यांच्याकडून मला काही ना काही शिकायला मिळत गेलं. पण सर्वांचाच इथे उल्लेख करणे शक्य नाही. माझं शिक्षण असंच सुरू रहाणार आहे आणि वेगवेगळे शिक्षक मला भेटत रहाणारच आहेत, अगदी अखेरपर्यंत. कारण मी विद्यार्थीच असेन कायम. शिक्षण कधीच संपत नाही ना !

— शरद दिवेकर
कल्याण
70457 30570

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..