लहानपणी शाळेत /गल्लीत कोणाला माझा वाढदिवस माहीत असण्याचे कारण नव्हते.नवीन कपडे वगैरे नसायचे. गोड म्हणून क्वचित शिरा किंवा केळीचे शिकरण ! आई औक्षण करायची. आई- आजींना नमस्कार करायचा. वडील बहुदा परगावी असत. एकुणातच या दिवसाची फार अपूर्वाई नसे आणि आतुरतेने वाट पाहणेही नसे.
प्राथमिक शाळेत चौथीत असताना या परंपरेत खंड पडला. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका गाडगीळ बाईंनी एक नवा पायंडा पाडला- प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाढदिवसाला त्याच्या/तिच्या वर्गशिक्षिकेने औक्षण करण्याचा ! तसं औक्षण सहस्रबुद्धे बाईंनी मला चौथीत केले होते हे आठवतंय.
पुढे माध्यमिक शाळेत किंवा महाविद्यालयात सेलिब्रेशन वगैरे नव्हतं.
व्यक्तिगत पातळीवर मी कुटुंबातच वाढदिवस साजरा न केल्याचे दोन प्रसंग आठवतात- एकदा महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता तेव्हा आणि दुसऱ्यांदा माझ्या चुलत बहिणीचे अपघाती निधन माझ्या वाढदिवसाच्या आसपास झाले होते म्हणून !
नोकरीतही त्याकाळच्या HR विभागाला प्रत्येक कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करणे अजून सुचायचे होते. के एस बी त आम्ही शुभेच्छा पत्राची सुरुवात केली. सिएटमध्ये ” बॉर्न टफ ” या गृहपत्रिकेत वाढदिवसाचे उल्लेख सुरु केले. गरवारे मध्ये असताना वाढदिवसाला शुभेच्छा पत्र आणि पाच हजाराचा चेक ( प्रत्यक्षात हा अलाउन्स CTC चा भाग होता) ही प्रथा होती.
नंतरच्या MBA संस्थांतील काळात स्मार्ट मॅनेजर्स तयार करण्याच्या प्रक्रियेत मग प्रत्येकासाठी केक (विद्यार्थी+ शिक्षक), मेणबत्त्या, चेहेऱ्याला केक फासणे, काहीवेळा हॉटेलात पार्टी ( precious liquid च्या सान्निध्यात) असं सुरु झालं.
आजकाल सर्वप्रकारच्या समाजमाध्यमांवरून शुभेच्छा, व्यक्तिगत फोन, लघु संदेश ( नशीब मी इन्स्टा आणि ट्विटर वर नाही), क्वचित घरी येऊन प्रत्यक्ष सदिच्छा अशाप्रकारे वाढदिवस साजरा होतो. घरी नातीच्या हट्टासाठी केकही येतो. यच्चयावत बँका, विमा कंपन्या, क्रेडिट कार्ड कंपन्या सकाळी सकाळी वाढदिवसाचा ठराविक संदेश पाठवितात. अनेक दुकाने, रेस्टॉरंट्स आणि सोसायट्या खरेदीच्या वेळी घेतलेल्या वाढदिवसाच्या माहितीच्या आधारे शुभेच्छा पाठवितात.
खूप छान वाटते. शक्यतो सगळ्यांना उत्तर देताना !
खरंतर या आणि अशा खूप वाढदिवसांच्या आठवणी आहेत, पण दरवर्षी एक पान जोडताना नकळत या आठवणींचे वाढदिवस मनात साजरे होऊ लागतात.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply