संध्याकाळची दिवेलागणीची वेळ. मी खेळून घरी परतलेलो असायचो. माझी ताई आणि भाई (थोरली भावंड ) आपापली कामं आटोपून तयार असायचे. मोरीमध्ये (त्यावेळी आमच्या घराला स्वतंत्र न्हाणीघर नव्हतं) स्वच्छ हात पाय धुवून मी ही तयार व्हायचो. तात्यांनी देवासमोर दिवा लावलेला असायचा. उदबत्तीचा मंद सुगंध आणि मंद तेवणारी दिव्याची ज्योत आमच्या लहानशा घरांत सायंकाळच्या उदास वातावरणाला प्रसन्नतेचं कोंदण देऊन जायची. आम्ही भावंड देवासमोर उभं राहून शुभंकरोती म्हणू लागायचो….
“शुभंकरोती कल्याणं आरोग्यम् धनसंपदा,
शत्रुबुद्धी विनाशायं दीपज्योती नमोस्तुते.
दिव्या दिव्या दीपत्कार…….”
समईचा प्रकाश देव्हारा उजळवून टाकत असायचा. म्हणून झालं की मोठ्यांच्या पाया पडायचं. अर्थात मला सगळ्यांच्याच पाया पडायला लागायचं. लहानपणापासून झालेले हे संस्कार आज साठी पार झाली तरी तसेच घट्ट आहेत. फक्त नमस्काराला वाकण्यासाठी माझ्यापेक्षा मोठं मात्र कुणीच उरलेलं नाही घरांत.
आमच्या लहानपणी अनेक गोष्टी किती छान होत्या. जेवायला सुरवात करण्यापूर्वी,
“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रींहरीचे,
सहज हवन होते नाम घेता फुकाचे…….
मुखी घास घेता करावा विचार,
कशासाठी हे अन्न मी सेवणार……..”
हे श्लोक म्हटल्यानंतरच पहिला घास घ्यायचा. शाळेतही मधल्या सुट्टीत खूप भूक लागलेली असायची, डब्यातून मस्त वास येत असायचा, पण हा श्लोक म्हटल्याशिवाय डबा उघडायचा नाही ही सवय पक्की लागलेली होती. सकाळी जाग आल्यावर उठून आणि आपल्या दोन्ही पंजाना चेहऱ्यासमोर धरून,
“कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती,
करमुले तू गोविंद, प्रभाते कारदर्शनं.” म्हणायचं.
“समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले,
विष्णुपंत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्वमे.” म्हटल्यावर जमिनीला पाय लावायचा.
रात्री झोपताना, “शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं,
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णम शुभांगं ……” म्हणून निद्राधीन व्हायचं.
कशाला म्हणायचे हे श्लोक रोज रोज? असं आम्हीही कधी आई तात्यांना विचारलं नाही, याचं मुख्य कारण ते म्हणताना एक प्रकारचा आनंद, प्रसन्नता दाटायची. आणि शाळेत तर सगळ्यांबरोबर म्हणण्यात एक वेगळीच गंमत यायची. आणि दुसरं कारण म्हणजे आमच्या घरात पूजाअर्चा, एकादशणी, श्रावण महिन्यात दर शनिवारी उपास असायचा. तात्या ऑफिसमधून आले की आम्ही सगळे जेवायला बसायचो. तसंच एक ब्राम्हण सवाष्ण जेवायला असायचं. संकष्टी दिवशी सोवळ्याने स्वयंपाक व्हायचा, पूजा आरती होऊन चंद्रोदय झाल्यावर देवाला आणि चंद्राला नैवेद्य दाखवून आम्ही जेवायला बसायचो. केळीच्या पानावर वाढलेल्या त्या दिवशीच्या जेवणाला एक वेगळीच चव असायची. सोबत उकडीचे मोदक. त्यावेळी तोंडपाठ झालेल्या आरत्या आजही अगदी तशाच मुखोदगत आहेत. तात्या नेमक्या आरोह अवरोहासहित मंत्रपुष्पंजली म्हणायला लागले की ऐकत रहावंसं वाटायचं.
आज मुलांना काही सांगितलं की त्यांचे प्रश्न सुरु होतात,
“हे कशासाठी म्हणायचं?”,
“पण याच वेळी का?”
“देवाला चांगली बुद्धी दे कशाला म्हणायला हवं?”
“मुळात नमस्कार करताना त्याच्याकडे काही मागायचंच कशाला?” मनापासून नमस्कार करायचा, बस्स”. “तो जाणतोच की सगळं.”
हे माझी लेक एकदा मला म्हणाली आणि वाटलं, खरच काही मागण्यासाठी का नमस्कार करायचा? स्वच्छ मनाने, निरपेक्ष भावाने आणि विनम्रपणे पाया पडावं, आणि फार तर म्हणावं, “देवा तुझ्या कृपेनें आम्ही खरच खूप सुखात आहोत. फक्त आमच्या मनात सदैव सद्बुद्धी सद्विचार, सद्वासना आणि माणुसकीचा वास असुदे एवढीच मनापासून प्रार्थना.
जाता जाता एक घटना सांगतो,
माझी लेक गेली दोन वर्ष ऑफिस प्रोजेक्टसाठी ऑस्ट्रेलिया मध्ये आहे. माझ्या खूप जुन्या ओळखीतल्या एका कुटुंबातली मुलगी अनेक वर्ष आपल्या कुटुंबासहित ऑस्ट्रेलिया मध्येच स्थायिक आहे. माझ्या लेकिशी त्यांची ओळख होऊन त्यांनी हिला घरी बोलावलं. एक दिवस मुक्कामच करून आली. रात्री सगळे कुटुंबीय लेकीसह जेवायला बसले. सगळं वाढून झालं. आता जेवायचं, पण त्याआधी सगळ्यांनी हात जोडून वदनी कवळ घेता…. श्लोक म्हटला. माझ्या मुलीला इतका आनंद झाला. परदेशात हा संस्काराचा आनंद घेतला तिने. जगात कुठेही गेलं तरी आपले संस्कार जागे ठेवायचे यालाच म्हणतात सुसंस्कृत मन आणि आपली संस्कृती, मनावरचे संस्कार जपणं.
यासाठी विशेष काहीच करावं लागत नाही. असेच झिरपत झिरपत ते पुढच्या पिढीत जात रहातात.
जरा विशेषच वाटलं, म्हणून सांगितलं.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply