आठवणींचा डोह भासतो वरकरणी शांत नि:संग
मात्र डुचमळता उठतात भावकल्लोळाचे अनंत तरंग
वरवर वाटतात साऱ्या एका कुळीच्या एक जशा
होतात बोलक्या जेव्हा, जाणवे एकमेकींचा अलग ठसा
काहींचा केवळ नुसताच भास
जवळून काहींचे जाणवतात श्वास
काही रांगत्या काही रांगड्या
मुकाट काही, काही अखंड बडबड्या
काही गोड बोबड्या दुडदुडताना
रुणझुणतात मनोपटलावर पुन:पुन्हा
काही नव्हाळ, गव्हाळ रंगसाजिऱ्या
कुजबुजती अस्पष्ट लाजऱ्याबुजऱ्या
काही वृध्द, रुध्द काही विद्ध
काहीच सुसंगत बाकी असंबद्ध
लावून पंख काही जाती उडून
काही शांत करिती संथ रवंथ
काही निद्रिस्त काही सतत भयग्रस्त
आनंदमयी मस्त काही संत्रस्त त्रस्त
नुसतेच काही अवशेष, खंड
काही धगधगती, तेवती अग्निकुंड
काही दटावणाऱ्या काही दाटलेल्या
काही शुष्क, कोरड्या आटलेल्या
एकलेपणात गुंग शापित काही
अतिआवेगाने उरी फुटलेल्या
काही बिचाऱ्या दुखऱ्या हळव्या
अश्वत्थामाच्या भाळी मिळाव्या
काही त्रोटक, तुटक हवेत विराव्या
ऋणबंधाईत काही उरी उराव्या
काही लाजाळू असतात काही मायाळू
काही ठुसठुसतात सदैव बनून गळू
काहींचा सल सतत रुततो मना
शिकवि काही पोरक्या बापुड्या केविलवाण्या
काही मानी त्यांचा ताठर बाणा
लपविती चेहेरा काही लाजिरवाण्या
चालूनही काळासोबत नाही कालबाह्य
येऊनही वयात त्या नाही होत वयस्क
आठवणींच्या वाढतात केवळ सावल्या
मनाच्या मेणावरच्या अस्पष्ट पाऊलखुणा
आठवणीच्या पक्ष्याची पिसे विस्कटावी किती
काहीच पसरतात, विखुरतात, काही गळती
झाडून पंख, पुन्हा सावरुन झेपावतो जेव्हा
हाती न आपल्या काही, केवळ गळक्या वेणा
– यतीन सामंत
Leave a Reply