माझी सहा वर्षाची कन्या नेहेमी माझ्यासोबत ATM मध्ये येत असे, मशीन मध्ये कार्ड सरकवण्याची तसेच पैसे निघाले कि पटकन बाहेर ओढून माझ्या हातात देण्याची तिला भारी हौस.
काही दिवसांनी तिने प्रश्न विचारला, बाबा जर ATM मधून पैसे मिळतात, तर तुम्ही काम करायला कशाला जाता? पैसे संपले कि आपण मशीन मधून काढायचे व खर्च करायचे. अर्थात, त्या बाल मनाला काय ठाऊक कष्ट करूनच पैसे बँकेत जमा करता येतात आणि मग ATM मधून काढता येतात.
माझ्यासारख्या सर्वच लोकांची विचारसरणी माझ्या लेकी सारखीच आहे. आज प्रदूषणाचा राक्षस आपला प्रभाव अक्राळ विक्राळ स्वरूपात सर्व ठिकाणी दर्शवू लागला आहे. हजारो टन कार्बन डाय ऑक्सिइड दररोज हवेत सोडला जातो, आणि त्याच्या दुप्पट अमूल्य ऑक्सिजन हवेतून नष्ट केला जातो. हा वायू लाखो वर्षापासून या ग्रहावर असणाऱ्या लहान मोठया वनस्पती रूपातील जीवांनी फोटोसिंथसीस द्वारे तयार करून आपल्यासाठी ठेवला आहे.
आज आपण हाच प्राणवायू किव्वा ऑक्सिजन येणाऱ्या पिढ्यांचा विचार न करता संपवू लागलो आहोत. यात अग्रक्रम औष्णिक वीज प्रकल्प ज्यात जमिनीतून मिळणारा कोळसा, व तेल यांचा वाटा सर्वात जास्त आहेे. या नंतर सर्व इंजिनातून निघणारा धूर, ज्यात इंधन म्हणून पेट्रोल, डिझल, केरोसीन आदी द्रवरूप इंधने जी फक्त भूगर्भातून मिळतात, याचा वापर करण्यात येतो. जगातील 95 टक्के प्रदूषण वरील दोन प्रकारे होते. याचा दुसरा अर्थ आज जगात जो प्राणवायू उपलब्ध आहे तो आपण संपवित चाललो आहोत, आणि CO2 जो समस्त प्राणी मात्रांसाठी घातक आहे त्याची उत्पत्ती करत आहोत.
पृथ्वीचे वातावरण हि ऑक्सिजन बँक आहे, वरती सांगितलेले इंजिन व औष्णिक प्रकल्प ATM मानुया, ज्यातून प्राणवायू काढल्यामुळे कमी होत चालला आहे. आज काळाची गरज आहे कि जितका ऑक्सिजन आपण यातून काढत आहे, तितका बँकेत परत भरला गेला पाहिजे, जे आज तरी होत नाही हि दुर्दैवाची गोष्ट आहे. शहरातील व जंगलातील झाडे कापून जगाला प्राणवायू देणाऱ्या एकमात्र यंत्राचा नाश करून, आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहोत.
झाडांच्या रुपात आपण गुंतवणूक केल्यास, ज्याला व्यवसाय म्हणू ऑक्सिजन रुपी नफा मिळेल, जो परत वातावरण रुपी बँकेत जमा करून, ATM रुपी औष्णिक व इंजिना मधून परत खर्च करता येईल. आज तरी सर्वांची वैचारिक अवस्था माझ्या कन्येसारखी आहे, आपल्याला हे लक्षातच येत नाही कि ऑक्सिजन रुपी पैसे देखील कधीतरी संपणार आहेत, आणि आपली बँक डुबणार आहे.
विश्वात भूतान हा एकमेव असा देश आहे, जो ऑक्सिजन जितका खर्च करतो त्या पेक्ष्या जास्त तयार करतो. खऱ्या अर्थाने नफ्यात असलेला देश आहे, बाकी सर्व जग हे व्ययात आहे, ज्याची फार मोठी किंमत येणाऱ्या पिढ्यांना मोजावी लागणार आहे.
विजय लिमये
(9326040204)
Leave a Reply