नवीन लेखन...

आत्मनिर्भरता, शिवराय आणि अंदमान

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी  २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली रामदास खरे यांची कथा. 


‘डॅड…ममा… जाम बोअर होतंय. नुसतं आपलं घरात बस, घरात बस. असं वाटतं उचलावी ती बॅट आणि घालावी त्या कोरोनाच्या डोस्क्यात ! याने आमचा खेळ थांबवला, फिरणं थांबवलं. घर.. घर आणि फक्त घर. ममा. ते आकाशातले, झाडावरचे पक्षी किती लकी आहेत नाही? बिनधास्त फिरतायेत . हसू नकोस तू ममा. आय एम सिरीयस!’ गेले दोन-तीन महिने घरात डांबून राहिलेल्या, घुसमटलेल्या राहुलच्या कुकरची शिट्टी अधूनमधून अशी वाजायची.

गेले कित्येक दिवस घरकाम करणारी मावशी येत नसल्याने बिचाऱ्या मम्मीवर कामाचा खूप ताण येत असे. राहुलचे बाबा दिवसातले आठ-नऊ तास कॉम्पुटरसमोर. वर्क फ्रॉम होम या जंजाळात अडकून पडलेले. राहुल आणि राहुलचे आजोबा सोबतीला तेवढे! राहुलला सतत काहीना काही नवीन लागायचे. अतिशय चंचल आणि धांदरट स्वभाव. बाबांनी त्याला भरपूर पुस्तके आणून दिलेली. काही इनडोअर गेम्स देखील आणून दिलेले. लॉकडाऊनच्या काळात त्याचा स्वभाव काहीसा चिडचिडा झाला होता. आजोबांना सारं काही समजायचं

राहुलचे आजोबा अगदी रिलॅक्समध्ये आरामखुर्चीत पहुडलेले. छातीवर पुलंचे पुस्तक उपडे पडलेले. आजोबांचा छानसा डोळा लागलेला. आणि याचवेळी राहुलचा आणि मम्मीचा संवाद कानावर पडताच आजोबांनी शांतपणे डोळे उघडले. दीर्घ श्वास घेतल्यावर त्यांनी राहुलला हाक मारली,

‘राहुल…बाळा…काय झालं बेटा? इकडे ये पाहू. अशी चिडचिड बरी नव्हे. अशाने तब्येत बिघडते हो. आता तू मोठा होणार ना? बाळा, मला सगळं समजतं रे. हे बघ. अशी वळवळ करू नकोस. बस माझ्यापाशी. डोळे मीट आणि शांतपणे तुझी शाळा डोळ्यासमोर आण. तुझा क्लास, तुझे टीचर, तुझ्या स्कुलचे ग्राउंड, स्पोर्ट्स. क्रिकेट, बॉल, फोर.. सिक्स.. बघ बघ..अजून काय काय दिसतं.’

तसा राहुल खरोखरच शांत झाला. आजोबांना अगदी .खेटून बसला. आज्ञाधारक मुलासारखा.

दुपारी जेवायला राहुल, राहुलची आई आणि बाबा सगळेच एकत्र आले होते. तसा आजोबांनीच विषय काढला. ‘मिलिंद, सुनबाई.. रात्री जेवण झाल्यावर तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आणि ते तुमच्यासाठी व विशेष करून आपल्या राहुलसाठी अतिशय महत्वाचे आहे.’

त्यादिवशी रात्रीचे जेवण थोडे लवकरच झाले. आजोबांनी एक दीर्घ श्वास घेतला. आणि शांतपणे बोलू लागले.

‘मिलिंद, सुनबाई आणि राहुल बेटा. आता या कोरोना या महाभयंकर संकटाबद्दल वेगळं मी काही सांगायला नको. मला जरा वेगळंच सांगायचंय. मिलिंदा तू तर पक्का सावरकर प्रेमी ना. मग? आता नीट ऐका सर्वांनी. मिलिंद, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे दैवत कोण?’

‘अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज…’ राहुलच्या बाबांनी एका सेकंदात उत्तर दिले.

‘करेक्ट. राहुल, मिलिंदा आपण सारेच गेली काही महिने घरात बंदिस्त आहोत. आपले शिवाजी महाराज तब्बल दोन वेळा असे बंदिस्त झाले होते.’

पन्हाळगड आठवतोय ना? सिद्दी जोहरचा वेढा? इ.स. १६६० मध्ये मार्च महिन्यात सिद्दीने पन्हाळ्याला वेढा दिला. महाराज गडावर बंदिस्त. जणू हतबल झालेले. दुसरा प्रसंग. इ.स. १६६६. शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायला जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा आठवतोय का तो प्रसंग. तिसरा प्रसंग तर जबरदस्तच. इ.स. १६५९. अफझलखानाची बलाढ्य फौज महाराष्ट्राच्या दिशेने निघाली. दोन ते तीन महिने प्रतापगडावर शांतपणे बसून त्यांनी खानाला कसे संपवता येईल यासाठीची भरपूर पूर्वतयारी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व सतत डोळ्यासमोर ठेवून हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या वीर सावरकरांचे ‘काळे पाणी’ आणि ‘माझी जन्मठेप’ ही दोन पुस्तके मिलिंदा आणि सुनबाई तुम्ही दोघांनी वाचली असतीलच.

मस्तवाल आणि सत्तापिपासू इंग्रजांच्या साम्राज्याचा सूर्य समुद्रात कायमचा बुडवण्याचा निर्धार सावरकरांनी केला होता. ब्रिटिश सरकारने २४ डिसेंबर १९१० रोजी सावरकरांना तब्बल ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. त्यावेळी सावरकरांचे वय होते अवघे सत्तावीस वर्ष. म्हणजे या काळ्या पाण्याच्या शिक्षेतून फक्त आणि फक्त मृत्यूच सुटका करणार हे निश्चित. अशाही परिस्थितीमध्ये सावरकरांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची उदासी, निराशा किंवा काळजी नव्हतीच. त्यांची पक्की खात्री होती की या ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य लवकरच बुडणार आहे.’

‘आजोबा… अंदमान आपल्या इंडियापासून खूप लांब आहे का हो? सावरकर कसे गेले असतील? ‘ आता राहुलला त्या अंदमानविषयीची उत्सुकता वाटू लागली. आजोबांना राहुलच्या डोळ्यात प्रश्नांची लकाकी दिसू लागली. हे प्रश्न पडायलाच पाहिजेत. आजोबा राहुलकडे वळून बोलू लागले,

‘राहुल बाळा. एकदा हे कोरोनाचे संकट पुरते सरू दे, त्यानंतर आपण सगळ्यांनीच अंदमानला भेट द्यायची आहे. मी आजपर्यंत दोन वेळा जाऊन आलोय, एकदा बोटीने आणि एकदा विमानाने. मिलिंद देखील एकदा जाऊन आलाय. राहुल…तो महाकाय सेल्युलर जेल.. ती कोठडी… तो काळाशार समुद्र आजही बघितला ना की ते सारे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. सावरकरांनी कसे सोसले असेल, कसे राहिले असतील याचा सतत विचार करू लागतो आपण. सावरकरांना ज्या कोठडीत ठेवले होते ती कोठडी आम्हाला एखाद्या पवित्र गाभाऱ्यासारखी जाणवली. तिथे आम्ही नतमस्तक झालो. राहुल.. आपल्या भारतापासून बाराशे कि.मी. अंतरावर भर समुद्रात अंदमान निकोबारची बेटं वसली आहेत. पोर्ट ब्लेअर ही अंदमानची राजधानी. याच राजधानीत ब्रिटिशांनी तेव्हा विविध प्रांतातील कैद्यांसाठी महाकाय सेल्युलर तुरुंग बांधला. नरकयातनेचा तुरुंग. एकीकडे वेदना सहन करून देखील सावरकरांनी स्वत:मधले संवेदनशील मन जागृत ठेवले. कोठडीच्या भिंतींवर कविता रेखाटल्या. तेलाचा घाणा ओढत असताना सतत आपल्या मातृभूमीचे स्मरण, तिच्या सुटकेसाठी केलेली प्रार्थना, तेथील कैद्यांना एकत्र जमवून ब्रिटिश सरकारविरुद्ध उठवलेला आवाज. सावरकरांना ही शक्ती कोठून मिळाली असेल? मिलिंद तू सांगू शकशील?

इतका वेळ शांतपणे ऐकणारा मिलिंद भारावून बोलू लागला, ‘अप्पा. शिवाजी महाराज आणि सावरकर खरोखरच ग्रेट होते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि मृत्यूचे सावट सतत डोईवर असताना दोघांनी पेशन्स राखून, प्रसंगी दोन पावलं मागे सरून, मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन, चकवा देऊन, संकटाशी दोन हात केले होते. परंतु अप्पा मला वाटते आजची आणि तेव्हाची परिस्थिती यामध्ये मला महत्त्वाचा फरक असा जाणवतो की आपल्याला शत्रू कसा दिसतो हेच अजून, समजलेले नाहीये आणि तो कधी, केव्हा घरात घुसेल याचा नेम नाही. त्यामुळे जगणं अवघड होत चालले आहे.’

मिलिंदकडे बघत अप्पा मंद हसले आणि पुन्हा शांतपणे बोलू लागले, ‘येस. यू आर राईट मिलिंद. अरे पण त्या भीतीचे काय? ती भीती आत्ताच्या भीती पेक्षा कितीतरी पटीने प्रचंड मोठी होती. आज तू, मी, तुझी बायको, राहुल घरात सुरक्षित आहोत. सर्व काही घरबसल्या मिळते आहे. हे देशकार्य घरात बसून लढायचे आहे.’

राहुलची आई आता काही प्रश्न विचारू लागली. ‘अप्पा आणि राहुलचे बाबा तुम्हा दोघांचेही विचार मला मनापासून पटले. आज विविध पातळ्यांवरून सामान्य माणूस लढतो आहे. सारे जगच थांबले आहे, गोंधळून गेले आहे. त्याचा परिणाम आपल्या समाजावर म्हणजेच आपल्यावर पडलेला आहे. अप्पा मला वाटते निर्भयता हीच माणसाला जगायला शिकवणार.’

मिलिंद पुढे बोलू लागला, ‘आत्मनिर्भर म्हणजे कुणावरही आणि कशासाठीही अवलंबून न राहणे. हा देश माझा आहे आणि त्यासाठी मी सर्वप्रकारचे योगदान देईन. शक्यतो कुणाकडे हात पसरायचे नाहीत. कुणालाही घाबरायचे नाही, प्रसंगी सावध राहून सर्वशक्तीनिशी शत्रूला झुंजवायचे, चितपट करायचे, यासाठीच राहुल, तुझ्या आजोबांनी आपल्याला शिवाजी महाराज आणि सावरकर यांची उदाहरणे का दिली हे समजले असेलच. देशातील प्रत्येकाने स्वयंपूर्ण, स्वावलंबी राहणे ही काळाची गरज आहे. आत्मनिर्भरता ही पाच भक्कम खांबावर उभी राहणार आहे. अर्थव्यवस्था, अंतर्गत व्यवस्था, पायाभूत सुविधा, सशक्त-प्रशिक्षित मनुष्यबळ व मागणी. अप्पा .. बरोबर ना?’

‘अगदी बरोबर बोललास मिलिंदा.’ सुनबाई, राहुल. तुम्हाला काही शंका असतील तर जरूर सांगा बरं.पण आता नको. पुन्हा केव्हातरी. तेव्हा राहुल बेटा गुड नाईट. मिलिंदा, सुनबाई तुम्ही माझे लेक्चर ऐकून थकला तर नाही ना? पण हे केव्हा तरी सांगणे आवश्यक होते. उद्यापासून आपण सारेच एका वेगळ्या विचाराने आपापली कामे करू. निर्भय राहू जय हिंद.’

-रामदास खरे

(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी  २०२० च्या अंका मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..