नवीन लेखन...

आत्मपूजा उपनिषद : १ : स्वस्मरण हेच ध्यान !

आत्मपूजा उपनिषद केवळ १५ श्लोकांचं आहे आणि त्याच्या  प्रत्येक श्लोकात स्वतःचा उलगडा घडवून आणण्याची किमया आहे; म्हणून ही लेखमाला.


सर्व प्रस्थापित अध्यात्मात मी हा एकमेव अडथळा मानला गेला आहे. या मी लाच सर्वेजन अहंकार  समजतात आणि तो हटवण्यात साधकांचं आयुष्य वेचलं जातं; तरी तो हटत नाहीच. पाश्चात्त्यांचा यत्न मी विशेष; इतरांविरुद्ध सामन्यासाठी सदैव तत्पर आणि कणखर  बनवण्याचा  असतो. वरकरणी पाहता पौर्वात्य मी हटवण्याच्या प्रयत्नात, स्वत्व गमावून बसलेले आणि पाश्चिमात्य बव्हंशी सुखात आणि समृद्धीत जगतांना दिसतात.  किमान मी कोण किंवा मी हटवणं या विवंचना त्यांच्याकडे नसल्यानं ते जास्त वस्तुनिष्ठ आणि तार्किक आयुष्य जगतांना दिसतात. अशा प्रकारे मी हा जीवनाचा केंद्रीय प्रश्न आहे.  पाश्चिमात्यांनी मी कणखर आणि विशेष करून तो सोडवला आहे आणि पौर्वात्य त्याचं नक्की काय करायचं या विवंचनेत आहेत.  दोन्ही विचारप्रणालींचं मूळ; मी  हा व्यक्तिगत समजण्यात आहे . वास्तविकात मी हा व्यक्तिगत नसून तो निर्वैयक्तिक आणि सार्वत्रिक आहे ;  आणि हे समजण्यातच सर्व प्रश्नाची उकल आहे.
पाश्चात्त्य असोत की पौर्वात्य दोन्ही विचारसरणीत एकच गफलत आहे, ती म्हणजे या मी च्या संगतीत हरेक व्यक्ती अस्वस्थ आहे. पाश्चात्त्य कर्तृत्व गाजवून मी ला नमवू पाहतात आणि पौर्वात्य मी चं काय करायचं या प्रश्नानं कायम हैराण राहतात.  हा मी हे प्रत्येकातलं आंतरिक द्वंद्व आहे आणि तो मी तुम्हाला तुच्छतेनं पाहतो. तुम्हाला तो कोणत्या प्रसंगी आणि कसा गाठेल आणि एका क्षणात तुच्छतेनं ग्रासेल हे सांगता येत नाही. अखिल मानवता केवळ या मी ला आपण तुच्छ नाही हे दाखवण्याच्या प्रयत्नात अहोरात्र कार्यरत आहे. मग कुणी पंतप्रधान होऊन त्या मी ला दाखवू पाहतो की तो तुच्छ नाही; कुणी आधीच सर्वसंपन्न असूनही बेसुमार संपत्ती गोळा करून तो प्रयास करतो ; कुणी इतरांपेक्षा वेगळं आणि अचाट काही तरी करून स्वतःला समजावण्याची धडपड करतो.
हा मी कधी उघडं पाडेल ते सांगता येत नाही;  त्यामुळे व्यक्ती मनमोकळं जगू शकत नाही. सामाजिक जीवनात तर हा मी झाकण्याचा इतका सायास करावा लागतो की व्यक्ती असहज होऊन जाते. चारचौघांसमोर बोलताना कंठ अवरुद्ध होतो आणि स्मृती दगा देते.
आणि मजा म्हणजे इतकं सगळं करण्यापेक्षा फक्त; हा मी आपल्या सर्वांचा एकच आहे. आपण स्वतःला समजत असलेली व्यक्ती हाच बंदिवास आहे.  कुणाच्या आत कुणीही नाही , फक्त इतका उलगडा झाला की एका क्षणात सगळे प्रश्न संपतात !
हा सर्व उहापोह शांतपणे समजावून घेतला की आत्मपूजा उपनिषदाची महत्ता समजते !
                                         ॐ। तस्य निश्चिंतनं ध्यानं ।। १ ॥
                                         ॐ। त्याचं  निरंतर स्मरणच ध्यान आहे !
स्वरूपाचा उलगडा होवो किंवा न होवो; मी आहे हे जगातलं एकमेव विधान आहे ज्याचा प्रतिवाद होऊ शकत नाही.  मी नाही असं कुणीही कदापिही म्हणू शकत नाही कारण मी नाही म्हणायला सुद्धा मी हवाच ! हा मी  सार्वत्रिक आहे ; म्हणजे आपण कुठेही असलो तरी हा मी एकसारखाच आहे. अगदी चंद्रावर गेलो तरी हा मी तसाच राहील.  शिवाय मी सर्वकालीन आहे ;  म्हणजे कोणत्याही वेळी हा मी तसाच असतो. मी हा  उच्चारणाशिवाय आहे ; म्हणजे तो प्रत्येकाचा शब्दरहित अनुभव आहे. सरते शेवटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा मी सर्वांचा एकच आहे !
हे स्मरण त्या निर्वैयक्तिक आणि व्यापक मी चं आहे . एका अर्थानं मी असा कुणीही नाही; तो फक्त  सनातन वर्तमान आहे. तोच सर्वांचा स्रोत आहे आणि त्याचं स्मरण हाच आनंद आहे.  त्याचं स्मरण म्हणजे कोणत्याही प्रकटीकरणा पूर्वीची शांतता आहे. हे स्मरण मनाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. एकदा का या ध्यानाची खुमारी कळली की मग आपण कायम मुक्तच होतो हा उलगडा होतो.
जगातल्या सर्व अध्यात्मिक प्रक्रिया मनानं  केल्या जातात; त्यामुळे मनानं केलेल्या कोणत्याही प्रक्रियेनं मनाचं चलन थांबणं असंभव आहे. मग ते नामस्मरण असो, सर्वश्रेष्ठ ॐ काराचा जप असो,  कोणताही मंत्रोच्चार असो; की वेदातल्या ऋचा असोत; तो आपल्याच हातानं, हात धरण्याचा अशक्य यत्न आहे.   
स्वस्मरण म्हणजे फक्त समोर पाहणं आणि आजूबाजूला चाललेलं ऐकणं. एका क्षणी तुम्हाला कायम समोर उभा असलेला निराकार दिसेल. या निराकाराशी संलग्नता म्हणजे स्वस्मरण !
— संजय क्षीरसागर 
Avatar
About संजय क्षीरसागर 5 Articles
Chartered Accountant in Practise. Spiritual Writer.

1 Comment on आत्मपूजा उपनिषद : १ : स्वस्मरण हेच ध्यान !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..