नवीन लेखन...

आत्मपूजा उपनिषद : २ : कर्मशून्य चित्त हेच आवाहन !

                                          सर्व कर्म निराकारणं आवाहनं ॥ २ ॥ 
                                          संपूर्ण कर्मरहित होणं हेच आवाहन !
 
हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. कामानं माणसाचं संपूर्ण चित्त वेधून घेतलं आहे.  भगद्वगीतेत तर कर्मयोगावर एक स्वतंत्र अध्याय आहे. त्यातल्या कर्मण्येवाधीकारस्ते या श्लोकानं तर गेली हजारो वर्ष पौर्वात्य विचारसरणीत कमालीचा गोंधळ घातला आहे.  कर्माचं महत्त्व असं की त्यापासून सुटका नाही आणि प्रत्येकाची मनिषा अशी की कर्मबंधनातून मोकळीक मिळावी.  प्रस्थापित अध्यात्मात तर संन्यास ही सांसारिक धावपळीतून सुटकेची पूर्व अट मानली गेली आहे आणि त्यामुळे सामान्य व्यक्ती सहसा अध्यात्माच्या वाटेला जात नाही.  शक्यतो कार्यनिवृती नंतर आणि इतर काहीही करण्यासारखं न उरल्यावर, लोक अध्यात्माकडे वळतात. अशाप्रकारे कर्म हा रोजच्या जगण्यातला केंद्रबिंदू आहे आणि त्याचं नक्की काय करायचं हा प्रश्न कुणालाही सोडवता आलेला नाही.
याशिवाय कर्माची महत्ता अशी की ते अर्थार्जनाचं साधन आहे त्यामुळे कर्माचा संबंध थेट जगण्याशी जोडला गेला आहे. निरर्थक म्हणजे ज्यातून अर्थार्जन नाही असं काम;  तस्मात, व्यक्ती ज्यात रमू शकेल असा स्वच्छंद निरर्थक ठरतो . त्यामुळे अर्थरहित कामाचे काही क्षणच व्यक्ती आनंदात घालवू शकते; हा कालावधी वाढला तर व्यक्ती स्वतःलाच निरर्थक समजायला लागते !
आत्मपूजा उपनिषदाचं हे सूत्र सांगतं की निराकारला आवाहन करणासाठी कर्मशून्य चित्तदशा हवी ! पण कर्मबद्धतेची इतकी सवय झाली आहे की स्वस्थ असताना सुद्धा मनानं काम केलं जातं; काही नाही तर किमान पुढच्या कामाचं नियोजन तरी हमखास चालू असतं.  काय होतं अशा चित्तदशेमुळे ? तर जाणीवेचा रोख कायम कुठे तरी वेधलेला राहतो, ती निर्वेध होऊ शकत नाही. अष्टावक्र म्हणतो त्या अनावधानस्य सर्वत्र या चित्तदशेला आपण येऊ शकत नाही.
 
सर्व कर्म निराकारणं ही चित्तदशा प्राप्त होण्यासाठी  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनानं कृत्य करण्याची सवय या क्षणापासनं सोडायला हवी. मनानं कोणतंही कृत्य असंभव आहे; खरं तर मनानं काम करणंच व्यर्थ आहे. जे काही काम होतं ते शरीरानं होतं आणि मनाशी त्याचा मेळ असतो;  केवळ मनानं काम हा निव्वळ कालापव्यय आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे कर्मशून्य चित्तदशा उपलब्ध झाली तरी तिचा कालावधी अत्यल्प असतो, त्यामुळे इतक्या अल्पावधीत निराकाराला आवाहन करणं अशक्य आहे. म्हणजे कर्मविरहित चित्तदशा उपलब्ध होणं दुरापास्त आणि झाली तरी तिचा उपयोग करून घेता येत नाही असा दुहेरी पेच आहे.  त्यात व्यक्ती कर्मरत असण्याचा कालावधीच जागेपणीचा सर्व वेळ व्यापून आहे.  काय उपाय आहे यावर ?
१) एकच काम करायचं निश्चित करा; काम काय आहे ही गोष्ट नगण्य आहे. थोडक्यात, शरीरानं एक काम आणि त्याच वेळी  मनानं  इतर कामं ही सवय कायमची बंद व्हायला हवी; कारण शरीर करतंय ते एकच काम एका वेळी होऊ शकतं.
समजा तुम्ही सिग्रेट ओढायची ठरवली तर आता त्यावर ठाम राहा.  धुम्रपानाचे अपाय, सकाळपासनं किती सिग्रेटी झाल्या, सिग्रेट ओढली नाही तर मरणारे का, सिग्रेट संपल्यावर आलेल्या उत्साहात पुढे काय करायचं, सकाळी व्यायाम केला का किंवा धुम्रपानाच्या दुष्परिणामापासून बचावासाठी संध्याकाळी नक्की टेकडीवर जायचं असले विचार करू नका. हे जमत नसेल तर सिग्रेट ओढायचा विचार सध्या  तरी सोडून द्या !
२) काम करतांना डोळ्यांना फक्त कर्मरत देहच दिसायला हवा हे भान कायम ठेवा.
सिग्रेट ओढतांना बायकोचा चेहेरा, कितीही आनंदाचे वाटले तरी स्मृतीतले आनंदाचे क्षण, सिग्रेट संपल्यावर पुढे करायची कामं; अशा कोणत्याही गोष्टी नजरेसमोर तरळायला नकोत.
३) पहिलं सूत्र साधलं की मनाचा वाक हा पैलू निष्प्रभ होईल;  याचाच परिणाम म्हणजे तुमचा श्राव्य हा पैलू कार्यरत होईल. आतापर्यंत जी मनाची अविरत बडबड ऐकू येत होती त्याऐवजी आजूबाजूला चाललेलं स्पष्ट ऐकू यायला लागेल.
दुसरी गोष्ट साधली की मनाचा दृक हा पैलू निष्प्रभ होईल;  निष्कारण दिसणारे चेहेरे, पुढच्या कामाची दृश्यं, याऐवजी फक्त सिग्रेट ओढणाऱ्या देहाची जाणीव राहील. सिग्रेटच्या कागदाचा स्पर्श, त्यातली उष्णता, धुराचा कंठाला होणारा स्पर्श, त्याचं तिथून खाली उतरणं, डोळ्यांना धुरामुळे होणारी सूक्ष्म जळजळ , स्वतःचा चेहरा आणि बसलेल्या किंवा उभं असलेल्या संपूर्ण देहाची स्थिती जाणवायला लागेल.
४) अशाप्रकारे एक आणि एकच काम करतांना, एका क्षणी तुम्हाला एका स्थिर स्थितीचं भान येईल जी सर्व कार्याला अंतर्बाह्य व्यापून आहे. ही कर्मशून्य स्थिती हेच आपलं मूळ स्वरुप आहे, कारण स्वरूप कायम अकर्ता आहे.
   
 
हे साधलं की तुम्हाला ‘सर्व कर्म निराकारणं आवाहनं’ ची गरजच उरणार नाही.  कर्मविहीन होऊन निराकाराला आवाहन करण्याची वाट पाहण्याऐवजी कर्मरत असतांनाच तुम्ही कर्मशून्य व्हाल; कारण जी सर्व कार्यापासून अलिप्त आहे ती कायमची स्थिर स्थिती किंवा आपलं स्वरुप तुम्हाला गवसलेलं असेल.
Avatar
About संजय क्षीरसागर 5 Articles
Chartered Accountant in Practise. Spiritual Writer.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..