नवीन लेखन...

आत्मपूजा उपनिषद : ३ : निःसंशय जाणणं हेच आसन !

                                              निश्चलं ज्ञानं आसनं ॥ ३ ॥
                                              अकंप ज्ञान हेच आसन !

 
सत्याचा उलगडा शेवटापर्यंत न होण्याचं कारण साधनेतला कसूर नाही, तर  आपण व्यक्ती आहोत ही  मनात खोलवर रुजलेली धारणा आहे. कोणतीही साधना कितीही वर्ष आणि कितीही निगुतीनं केली तरी सत्याचा उलगडा असंभव आहे कारण सत्य तर आपण आताच आहोत; मुळातच आहोत; कोणत्याही पूर्व शर्तीशिवाय आहोत.  तस्मात, साधना निवडताना ती कोणत्या गुरुनं दिली यापेक्षा ती, आपल्या मनात रुजलेली, आपण व्यक्ती आहोत ही धारणा दूर करतेय का ? हा खरा निकष आहे.
अज्ञानी लोकांनी अध्यात्मात इतका गोंधळ घालून ठेवला आहे की बोलता सोय नाही. सर्वच्या सर्व साधना व्यक्तिमत्त्वात बदल घडवण्याचे प्रयोग आहेत; राग दूर करा, कामेच्छा थोपवा, मोह हटवा असे सगळे प्रकार वर्षानुवर्ष चालतात. दीर्घकाल साधनेत व्यतीत केल्यावर, व्यक्तीला एकतर  झक मारत राग आवरावा तरी लागतो किंवा मग राग आला की गहन अपराधभाव दाटून येतो.  थोडक्यात, साधनेनं आपण वरकरणी व्यक्ती भासलो तरी मुळात निराकार आहोत हा उलगडा होण्याऐवजी; आपण राग-लोभावर (काही प्रमाणात का होईना ) विजय मिळवलेली इतरांपेक्षा वेगळी व्यक्ती आहोत; अशी नवी भ्रामक समजूत गहन होण्यापलीकडे, साधनांची फारशी फलनिष्पत्ती होत नाही.
आत्मपूजा उपनिषदाचं हे सूत्र सांगतं की नि:संशय जाणणं  हेच आसन !  फक्त तीन शब्दात पातंजलीच्या संपूर्ण अष्टांग योगाला, हे एकच सूत्र पार करून जातं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी; असा उभा जन्म जाईल इतका आणि क्लेशदायी प्रवास करण्यापेक्षा; फक्त ठामपणे स्वतःला जाणलं आणि त्यावर स्थिर राहिलं की विषय संपला !

स्वतःला निःसंशय जाणण्यात येणारी एकमेव अडचण म्हणजे आत्मविश्वासाबद्दल पौर्वात्यांच्या असलेल्या चुकीच्या कल्पना; ज्या त्यांनी पाश्चिमात्यांकडे पाहून आणि त्यांच्याशी तुलना करून ठरवल्या आहेत.  बुद्धी, रूप आणि संपत्ती या तीन गोष्टींवर आपला आत्मविश्वास बेतलेला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडे यातल्या  किमान दोन किंवा (बहुदा) सर्वच गोष्टी कमी आहेत. जन्मभर व्यक्ती याच गोष्टींच्या मागे लागून आत्मविश्वास मिळवण्याच्या प्रयत्नात असते किंवा मग मनाची काही तरी आध्यात्मिक  समजूत काढून (उदा. पूर्वसंचित, नियती किंवा नशीब ); ती सल लपवली जाते. त्यात तू बावळट आहेस ही जन्मगुटी बालपणापासून आई, वडील, जवळचे नातेवाईक, शाळेतले गुरुजन, वडिलांची मित्रमंडळी या सर्वांनी; नेमकी वेळ आणि प्रसंग बघून हक्कानं पाजलेली असते; त्यामुळे पौर्वात्य व्यक्तिमत्त्वाची घडण मुळातच बचावात्मक झालेली असते.  या उलट पाश्चात्त्यांनी मुलांच्या मनावर तू इतरांपेक्षा वेगळा आणि विशेष आहेस हे बिंबवलेलं असतं.  तस्मात, आपल्यातल्या एखाद्यानं तशातही कर्तबगारी दाखवली आणि पार सीईओ पदाला पोहोचला तरी पाश्चिमात्य कॅब ड्रायवर सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त  वस्तुनिष्ठ, तरतरीत आणि ठाम  वाटतो ! कारण सीईओ पद हा बावळटपणाला वरून चढवलेला बुरखा असतो पण कॅब ड्रायवर ही सामान्य श्रेणी असली तरी त्याचं आतलं व्यक्तिमत्त्व ठशीव असतं आणि त्याला कर्मकनिष्ठतेचा जरा सुद्धा लवलेश नसतो.

 
त्यात पुन्हा भारतीय मानसिकतेवर अध्यात्मिक मूढ कल्पनांचा पगडा आहे. सीईओ जरा ठाम व्हायला लागला की त्याला आपण अहंकारी ठरू की काय असं वाटायला लागतं आणि तो निष्कारण विनम्रतेचं प्रदर्शन घडवायला जातो; त्या भानगडीत पुन्हा बावळटपणा उसळून येण्याची  शक्यता निर्माण होते.  अशाप्रकारे आपण व्यक्ती आहोत ही धारणा कायम राहते आणि त्यामुळे सत्याचा उलगडा  अशक्य होतो.
लेख संपन्न करतांना, व्यक्तीमत्त्वाचा निरास होण्यासाठी आणि पर्यायानं सत्याचा उलगडा होण्यासाठी एक सोपी साधना सांगतो. साधना वरकरणी अत्यंत सोपी वाटली तरी कमालीची प्रभावी आहे आणि आतापर्यंत एकाही सिद्धाकडनं किंवा कोणत्याही अपौरुष्येय ग्रंथात, तीचा उल्लेख नाही ! शिवाय साधना कर्मसंलग्न  (डायनॅमिक) आणि अत्यंत तर्कशुद्ध आहे, तुम्हाला तीच्यासाठी वेगळा वेळ काढायची किंवा कोणतही आसन साधायची गरज नाही. ही साधना काम करत असतांना, काम नसतांना, बाका प्रसंग गुदरलेला असतांना  (किंवा अशा वेळी तर हमखास करावी) अशी आहे. तुम्ही फक्त समोर पाहा आणि आजूबाजूला जे चाललंय ते ऐका !  एका क्षणात तुम्ही वर्तमानात याल, प्रसंगातली व्यक्तीसापेक्षता दूर होऊन तो वस्तुनिष्ठ होईल, त्यामुळे तुमचं व्यक्तीमत्त्व सक्रीय होण्याऐवजी त्या प्रसंगी आवश्यक असलेलं अंगभूत कौशल्य जागृत होईल.
या साधनेनं मनाचे दृक आणि वाक हे दोन्ही मुख्य पैलू निष्प्रभ होतात, त्यामुळे एखाद्या धन्य क्षणी तुम्हाला कायम समोर उभा ठाकलेला आणि सर्वस्व व्यापून असलेला निराकार दिसेल. हे दर्शन इतकं प्रत्यक्ष असेल की तुम्हाला इतर कोणत्याही पुराव्याची किंवा कोणाच्याही प्रज्ञापनाची गरज उरणार नाही.  ‘ निश्चलं ज्ञानं आसनं ‘ या सूत्राचा तुम्हाला उलगडा होईल. ‘अकंप ज्ञान हेच आसन’  हा तुमचा अनुभव होईल !
 
 मग तुमच्या हे देखिल लक्षात येईल की आत्मविश्वासाचा आपल्या रूप, बुद्धी किंवा संपत्तीशी काहीएक संबंध नाही ! आत्मविश्वास म्हणजे आपण आत्मा आहोत हा विश्वास; या उलगड्यासरशी तुम्ही कमालीचे स्वस्थ व्हाल.  हे स्वास्थ्य म्हणजे स्वतःत स्थिर होणं आहे आणि तेच तुमचं खरं आसन आहे. 
— संजय क्षीरसागर
Avatar
About संजय क्षीरसागर 5 Articles
Chartered Accountant in Practise. Spiritual Writer.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..