नवीन लेखन...

आत्मपूजा उपनिषद : ४ – ५ : उन्मनी भाव हेच जल आणि मनरहितता हाच अर्घ्य!

                                                   उन्मनी भावः पाद्यं ॥ ४ ॥
                                                     उन्मनी भाव हेच जल !
 
                                                     सदाअमन्स्कं अर्घ्यं ॥ ५ ॥
                                                     मनरहितता हाच अर्घ्य !
 
 
प्रथम मन म्हणजे काय ते पाहू. मेंदूत सतत चालू असलेला; डोळ्यासमोरच्या निराकार पडद्यावर दिसणारा आणि कानात अविरत ऐकू येणारा दृकश्राव्य चलतपट म्हणजे मन. हा चलतपट डोळ्यासमोर असलेल्या सर्व गोष्टींना आच्छादित करून असतो आणि कानांना आजूबाजूला चाललेलं स्पष्ट ऐकू देत नाही. हा चलतपट अहोरात्र चालू असतो आणि सिनेगृहातल्या दाराचे पडदे बंद झाल्यावर जसा चित्रपट स्पष्ट दिसायला लागतो तसा रात्री आपल्याला दृग्गोचर होतो; त्याला आपण स्वप्न म्हणतो.  थोडक्यात, रात्री दिसणारा चलतपट म्हणजे स्वप्न आणि दिवसा पकडीत न येणारा चलतपट म्हणजे मन. ही मनाची दृक-श्राव्य प्रक्रिया आपल्याला समोरचा निराकार दिसू देत नाही आणि आपल्याला अंतर्बाह्य व्यापून असलेल्या सार्वभौम शांततेचं अस्तित्व जाणू देत नाही. त्यामुळे मनाची प्रक्रिया थांबणं, ही अध्यात्मात सत्याचा उलगडा होण्यासाठी पूर्व अट मानली गेली  आहे.
मनाच्या अविरत प्रक्रियेनं आपलं जवळजवळ सर्व अवधान वेधून घेतलं आहे. तशात स्मृती ही नित्योपयोगी सुविधा मनाच्या सक्रियतेमुळेच शक्य असल्यानं;  योग्य वेळी मनानं मेंदूच्या हार्डडिस्कवर संग्रहित केलेली स्मृती वारंवार जागृत करावी लागते. एखादी व्यक्ती समोर आल्यावर तिचा चेहरा आणि नांव यांची स्मृती जागृत झाली तरच तिची ओळख पटते.  तस्मात, मनाची प्रक्रिया स्मृती संचय आणि तीचा उपयोग यासाठी सतत आवश्यक असते.  या भानगडीतून सुटका मिळवण्यासाठी एका ठिकाणी शांत बसून विविध साधना कराव्या लागतात, उदाहरणार्थ नामस्मरण, जप, विपश्यना इत्यादी !  पण अशा साधना  दीर्घकाल करून सुद्धा मनापासून सुटका होत नाही; म्हणजे मनाची प्रक्रिया कायम अवाक्या बाहेर आणि अनैच्छिक राहते आणि त्याचं कारण म्हणजे एकाही सिद्धाला मनाच्या संपूर्ण प्रक्रियेचा उलगडा झालेला नाही. प्रत्येकानं मनाच्या एकाच पैलूवर काम करून वेगवेगळ्या साधना शोधल्या आणि सांगितल्या आहेत; ज्या कालौघात निरुपयोगी झाल्या आहेत (उदाहरणार्थ, विपश्यना, मंत्रजप, नामस्मरण किंवा मनाला नियंत्रणात आणण्यासाठी केलेली कोणतीही साधना ). अर्थात, त्या वेळी कंप्युटर्सचा शोध लागला नव्हता म्हणून अशी परिस्थिती आहे.
मन हा  बायोकंप्युटर आहे. कंप्युटरचा शोध बव्हंशी, मनाची जागा घेण्यासाठी लागला, त्यामुळे एकदा संगणकप्रणाली कसं काम करते हे लक्षात आलं की मनाची कार्यपद्धती कळते.  गंध, स्पर्श आणि स्वाद यांच्या स्मृती चित्ताचा विक्षेप व्हायला फारश्या कारणीभूत होत नाहीत, शिवाय दृक-श्राव्य स्मृतींच्या मानानं त्यांनी मेंदूचा नगण्य भाग व्यापलेला आहे. तस्मात, मनाचा बहुविक्षेपी दृक-श्राव्य भाग कसं काम करतो हे लक्षात आलं की विक्षेप संपतो आणि मन बायो-कंप्युटरसारखं वापरता येतं.
मनाची प्रक्रिया थांबणं आवश्यक आहे याचं दुसरं पण कारण आहे. मनाची गती कायम क्षैतिजीक (हॉरिझाँटल) आहे. नजरेसमोरून जे निघून गेलं तो भूतकाळ, जे समोर आहे तो वर्तमानकाळ आणि जे येण्याची प्रतीक्षा आहे तो भविष्यकाळ अशा आभासी जगात आपण जगतो. त्यात सर्व घटनांची स्मृती मेंदूत संग्रहित झाल्यानं आणि ती वेळीअवेळी जागृत होत असल्यानं भूतकाळ वास्तविक आहे असंच प्रत्येकाला वाटतं. खरं तर स्मृतीचा उपयोग फक्त जगण्याची सुविधा म्हणून व्हायला हवा पण मनाची क्रिया संपूर्णतः अनैच्छिक असल्यानं भूतकाळातल्या, विशेषतः नकोशा आणि विसराव्याश्या वाटणाऱ्या स्मृती; केव्हाही जागृत होतात. त्यात आपल्याला कल्पनाशक्ती दिली आहे तीच उपयोग विधायक कारणासाठी होण्याऐवजी भूतकाळाचं प्रक्षेपण करून भीतिदायक आणि अडचणीत आणणाऱ्या कल्पना करण्यासाठी केला जातो; त्यामुळे भविष्यकाळ आहेच आणि त्यासाठी आताच आणि तातडीची उपाय योजना करायला हवी असं प्रत्येकाला वाटतं. अशा प्रकारे मनाची प्रक्रिया कालाचा आभास निर्माण करून सतत विक्षेप निर्माण करते; त्यामुळे कायम समोर असलेला निराकार दिसत नाही आणि सर्वव्यापी शांततेचा अनुभव येत नाही.
वास्तविक वर्तमानकाळ ही एकमेव वस्तुस्थिती आहे आणि सर्व आयुष्य हे कॅलिडोस्कोप सारखं आहे. या कॅलिडोस्कोपमध्ये नवनवीन घटना अविरतपणे घडतायत पण त्या सर्व फक्त एकाच कालात घडतायत, तो म्हणजे वर्तमानकाळ !  ज्या घटना घडून गेल्यात त्यांचा व्यक्तिगत स्मृतीपलीकडे कुठेही लवलेश नाही आणि ज्या घटना घडायच्या आहेत त्या सुद्धा; कल्पना कितीही जोरदार केली तरी, वर्तमानकाळाशिवाय घडू शकत नाहीत.  थोडक्यात, प्रत्येक घटना ही जाणिवेच्या कक्षेतच घडायला लागते आणि जाणीव सदैव वर्तमानातच असल्यानं प्रत्येक वास्तविक घटना केवळ वर्तमानातच घडते.
आता या श्लोकाचा उलगडा होईल,  उन्मनी भावः पाद्यं,  मनाचं चलन क्षैतिजीक (हॉरिझाँटल) आहे आणि ते सतत उजव्या कानाकडून डाव्या कानाकडे प्रवाहित आहे; त्यामुळेच आपल्या डोळ्यांसमोर दृश्य तरळतात आणि कानात वाक्य ऐकू येतात. त्यामुळे हा प्रवाह आपल्या जाणिवेचा रोख पण कायम  क्षैतिजीक ठेवतो. जर जाणिवेचा रोख उर्ध्वस्थ (व्हर्टिकल) झाला तर मनाच्या प्रक्रियेचा निरास होईल; म्हणजे मन एक क्षमता म्हणून उपलब्ध राहील; पण त्याचं सतत अनैच्छिक आणि अनिर्बंध वाहणं थांबेल.  अशा प्रकारे जाणीव उर्ध्वस्थ होणं हा अर्घ्य आहे !
काय आहे ही जाणीव उर्ध्वस्स्थ करण्याची साधना ? शांत, निर्वेध मनानं, पाठ उशीला टेकून बसा. डोळे बंद करून नजर डाव्या कानाकडून उजव्या कानाकडे फिरवा; मग तोच रोख डोक्याच्या मागच्या बाजूनं पुन्हा डाव्या कानापाशी आणा. अशा प्रकारे, नजरेची डाव्या कानाकडून उजव्या कानाकडे आणि डोक्यामागून पुन्हा डाव्या कानाकडे अशी वर्तुळाकार गती तयार होईल. फक्त दोन-तीन प्रयत्नातच तुमच्या नजरेची ही डावीकडून उजवीकडे फिरणारी वर्तुळाकार गती सुरू होईल. मन नेमकं विरुद्ध दिशेनं, म्हणजे उजवीकडून डावीकडे आणि एक मार्गी वाहतं. या साधनेची केवळ सात-आठ गोलाकार आवर्तनं झाल्यावर मनाची क्रिया पूर्णपणे थांबेल. तुम्हाला कमालीची शांतता जाणवेल आणि त्या स्थितीत स्थिर राहिल्यावर अचानक तुमची जाणीव उर्ध्वस्थ होईल, म्हणजे नजरेचा रोख ब्रह्मरंध्रातून आकाशाकडे रोखला जाईल.  ब्रह्मरंध्र हा देह आणि आकाश यातला सिमांत बिंदू आहे. या स्थितीत तुम्ही वर्तमानात स्थिर व्हाल; सिद्धत्वाची एक झलक तुम्हाला मिळेल; तुम्ही व्यक्तिमत्त्वातून मुक्त होऊन, केवळ वर्तमान स्थिती होण्याची शक्यता निर्माण होईल. ही कायम उपस्थित असलेली निराकार वर्तमान स्थिती म्हणजेच सिद्धत्व !
नजरेच्या डावीकडून उजवीकडे, वर्तुलाकार फिरण्याच्या साधनेतून आलेली मनरहित अवस्था हाच अर्घ्य. कारण अहोरात्र डोळ्यांसमोर चाललेला चलतपट, स्वतःची इच्छा असो किंवा नसो, पहावा लागल्यानं डोळे बंद स्थितीत सुद्धा विश्राम अनभवू शकत नव्हते;  ते आता शांत डोहासारखे होतील. तद्वत, कान सुद्धा अविरत चाललेली मनाची बडबड ऐकण्यापासून मुक्त होऊन, शांतता अनुभवतील. तस्मात,  मनरहितता हाच अर्घ्य ! हा तुमचा अनुभव होईल. 
उपरोक्त साधनेचा आणखी एक फायदा आहे, ती व्यक्तीला निद्रानाशापासून मुक्त करते ! निद्रानाशाचं कारण मनाची प्रक्रिया न थांबणं हे आहे. औषध योजनेनं केवळ मनाची प्रक्रिया थांबवली जाते आणि तदनंतर झोप येते.  या साधनेनं, कोणत्याही औषधाशिवाय, नैसर्गिकपणे मनाची क्रिया थांबते, मग ती निर्मन स्थिती साधक जाणीवेच्या उर्ध्वीकरणासाठी वापरू शकतो किंवा  साधना करायची नसेल, तर आलेल्या निद्रेचा आनंद घेऊ शकतो.
— संजय क्षीरसागर
Avatar
About संजय क्षीरसागर 5 Articles
Chartered Accountant in Practise. Spiritual Writer.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..