नुकताच लोणावळा येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची आणि नंतर तिचा नराधमांनी केलेल्या खुनाची बातमी वाचून मन सुन्न झाले. आज राज्यात आणि देशात असे कित्येक गुन्हे घडत आहेत. अल्पवयीन मुलींना सहजरीत्या जाळ्यात ओढता येत असल्याने त्यांच्यावरील बलात्काराच्या प्रमाण वाढ झाली आहे, असे मुंबई पोलिसांकडे वारंवार दाखल झालेल्या तक्रारीतून स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही वर्षात पोलिसांनी बलात्काराचे जे गुन्हे दाखल केले त्यातील २३ प्रकरणे अल्पवयीन मुलींवरील बलात्काराशी निगडीत आहेत. २००९ मध्ये बलात्काराच्या एकूण १८२ घटना घडल्या. त्यातील १२८ मुली अल्पवयीन होत्या. तर, २००८ मध्ये नोंदविल्या गेलेल्या २१६ बलात्कारांपैकी १४७ बलात्कार अल्पवयीन मुलींवरील झाले होते.
सध्या अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवर अनेकवेळा विविध प्रकारचे लैंगिक अत्याचार आणि बलात्कार घडण्याच्या घटना घडताना आपणा ऐकतो. त्यात सामूहिक बलात्कार हा एक हिंसक लैंगिकतेचा प्रकार आहे. ज्या व्यक्तींनी आयुष्यात लहानपणापासून हिंसाचार पाहिलेला आहे, जे अशा वातावरणात वाढलेले आहेत, अशा व्यक्तींना त्याचे भान राहत नाही. स्त्रियांच्या बाबतीत बाह्य आकर्षण जास्त असते. मात्र मनात उचंबळून आलेल्या भावना जोपर्यंत शांत होत नाहीत तो पर्यंत त्याचा तिरस्कार केला जातो. अशांच्या मनात स्त्रियांबाबत राग निर्माण होतो. लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे कदाचित असे प्रकार घडताना आपण ऐकतो. अशा कृत्यानंतर ते नराधम स्वत:च्या चुकीची कबुली देतात. कश्याचीही भीडभाड न बाळगता घोळक्याच्या मानसिकतेने आपण हे कृत्य केले, असेही सांगण्यास लाजत नाहीत.
एखाद्या असह्य अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि नंतर बलात्कार करणे ही मानसिक विकृती आहे. बलात्कारामुळे अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवर शारिरिक आणि मानसिक आघात होतात आणि त्या त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात. आजही आपल्याकडे लैगिंक शिक्षणाबाबत खुल्या मनाने चर्चा होत नाही. योग्य वयात लैंगिक शिक्षणाबरोबर त्याचे फायदे आणि तोटे समजावून सांगितल्यास त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. हिंसक वृत्तीमुळे असे प्रकार वारंवार घडताना दिसतात. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे नाहीतर अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या मनात भीतीचे वातावरण तयार होईल.
बऱ्याच वेळा कलियुगात अश्या गोष्टी घडणारच असे म्हणून माणूस गप्प बसतो. आजच्या घडीला कोण कोणावर, कुठे, केव्हां, कश्यासाठी लैंगिक, मानसिक अत्याचार करतील हे सांगता येणार नाही. बलात्कार करणा-यांना जरी फासावर लटकवले तरी बलात्कार घडण्याचे प्रमाण कमी होणार नाही किंवा थांबणार नाही. अल्पवयीन मुली आणि स्त्रिया म्हणजे कामोपोभोग पुरे करण्याची साधने आहेत हा अहंकारी पुरुषातला दृष्टीकोन बदलला तरच बलात्काराच्या घटना कमी किंवा बंद होतील असे वाटते.
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवरील बलात्काराने समाजातल्या चांगल्या संस्कारांचे एकाच वेळी अवमुल्यन आणि अध:पतन झाल्यासारखे वाटते. माणसाकडून साक्षात देवीचा अंश असणाऱ्या अल्पवयीन मुली आणि स्त्रियांवर अत्याचार होताना आपणा बघतो/वाचतो. पोटातील मुलीचा गर्भ काढून टाका असे कुठली लग्न झालेली स्त्री म्हणेल का? तो गुन्हाही पुरुषाचाच असतो. माणूस स्त्रीच्या पोटातील काही महिन्यांच्या जीवाची भ्रूणहत्या करून तो नष्ट करताना दिसतो. का? तर तो मुलीचा जीव आहे म्हणून ! केवढा विरोधाभास आणि विसंगती ! स्त्रीत्वाचा केवढा अपमान ! मानवाच्या भावनाशून्यतेचे हे जिवंत उदाहरणच !
जगण्यातला भाव कुठेतरी हरवत चालला आहे असे वाटते. बहुतेक मानसशास्त्रज्ञ असं मानतात की बलात्काराची प्रेरणा लैंगिक नसून त्यात पुरुषत्वाचा, अहंकाराचा, श्रेष्ठत्वाचा आणि वर्चस्वाचा भाग आहे. दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊन त्यावर अधिराज्य गाजवण्याचा विचार आणि मी सांगेन तसचं वागणं या अत्याचारींच्या केंद्रस्थानी असतो. ती बिचाऱ्या निरागस अल्पवयीन मुलगी/स्त्री नराधमांचा प्रतिकार कसा करणार? या विचारानेच अंगावर काटा उभा राहतो. तर्काच्या आणि बुद्धीच्या आकलनशक्तीच्या पलीकडचं हे कृत्य आहे आणि त्यामुळे त्याला खात्रीने विकृतीच म्हणावं लागेल.
स्त्रियांवरील गुन्हे दखलपात्रही वाटत नाहीत कारण गुन्हा न नोंदवता दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीलादेखील विकृतीच म्हणावी लागेल आणि ही विकृती प्रत्यक्ष गुन्हेगाराच्या विकृतीइतकीच भयावह आहे असे आतापर्यंतच्या अत्याचारी/बलात्कारी व्यक्तींच्या तक्रारी आणि अक्रोषावरून वाटते.
असो. केवळ कायदा करून स्त्रीला तिचा आत्मसन्मान परत मिळेल? आजच्या गुन्हेगारांना फासावर लटकावून उद्याचा बळी टळणार आहे? शिक्षेची अंमलबजावणी कडक करून आणि लवकरात लवकर शिक्षा देऊन स्त्रीला तिचा आत्मसन्मान परत मिळणार आहे? पोटातला गर्भापासून ते मृत्युच्या शय्येवरील स्त्रीत्वाची चाललेली अखंड अवहेलना थांबणार आहे का? कायदे करून समाजातील मूल्ये सुधारतील का? तर नाही त्यासाठी त्यांची कडक अमलबजावणी केली तरच काही सुधारणा होईल असे काही तज्ञांचे मत आहे.
स्त्रीला तिचा सन्मान परत मिळवून दिला पाहिजे. तोकड्या कपड्यांमुळे किंवा रात्री-अपरात्री बाहेर फिरण्यामुळे बलात्कार वाढले आहेत, असं म्हणणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो तेव्हां त्यांनी कसले कपडे घातले होते? ती कुठे रात्री-अपरात्री फिरायला गेली होती? मुळात स्त्रीवरील अत्याचाराचा दोष स्त्रीलाचा देणे हेच सामाजिक विकृतीचे लक्षण आहे. स्त्रीने कसे वागावे हे स्त्रीच ठरवेल. तिने कसे वागावे, याचा अधिकार समाजातील पुरुषांना कसा देता येईल? आपण महाभारतातील उदाहरण घेऊ – द्रौपदीने तोकडे कपडे घातले होते म्हणून तिच्या पदराला भर सभेत हजर असलेल्यांनी हात घातला होता का? नव्हता, ती रात्री-अपरात्री एकटी फिरत होती म्हणून तिचा विनयभंग करण्याचा प्रत्यन झाला होता का? नव्हता. मग कोण जबाबदार होते? त्यावेळी निदान श्रीकृष्णाने तिची लाज राखली….! अशी अपेक्षा आपण किंवा अल्पवयीन मुली-स्त्रिया असे अपराध घडल्यास कोणाकडून करू शकतील?
हा राष्ट्रीय चारित्र्याचा प्रश्न ठरत आहे. कायदा करून आणि त्यांची अंमलबजावणी करून गुन्हेगारांवर वचक बसेल का? दूरगामी दृष्टीकोनातून सामाजिक प्रबोधन आणि समुपदेशनावर भर द्यावाच लागेल. शाळांमधून तसेच शिक्षणाच्या आणि संवादाच्या इतर माध्यमातून स्त्रीविषयीचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. प्रत्येक बलात्कारी हा कधीतरी लहान मुलगा असतो. मग जगण्याच्या प्रक्रियेत त्या निष्पाप बाळाचा निर्ढावलेला गुन्हेगार कधी झाला? समाजाच्या कोणत्या घटकांनी त्याला गुन्हेगारी वृत्ती शिकवली/ढकलले? कोणत्या घटकांनी त्याच्यात स्त्री ही फक्त एक उपभोगाची वस्तू आहे अशी भावना निर्माण केली? आयुष्याच्या कुठल्या वळणावर त्या माणसाचा पशू झाला? कोणत्या प्रसंगांनी त्याच्यामधली सहिष्णूता नष्ट झाली? त्याच्यातील भावनाशून्यता कशाने निर्माण झाली? या प्रश्नांचा आपल्या सर्वांनी आत्मचिंतनाने विचार करावाच लागेल. आज जे गुन्हेगार आहेत, त्यांच्याबाबत कसलाही दयाभाव न दाखवता त्यांचे बेमुर्वत पारिपत्य करावेच लगेल. पण ते करत असताना नवे गुन्हेगार निर्माण कसे होणार नाहीत, याचाही प्रकर्षाने विचार केला पाहिजे. तसे केले नाही, तर येणाऱ्या काळात तुरुंगातली गर्दी वाढत राहील आणि समाजाची भावनाशून्यताही !
समाजाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे बलात्कारी अल्पवयीन मुलीला/स्त्रीला तिचे समाजातील स्थान आणि तिचा आत्मसन्मान मिळवून देणे. आजच्या जमान्यातील बहुतेक स्त्रिया सुशिक्षित, सुजाण आणि अभ्यासू आहेत तर काही कायद्याच्या पदवीधर आहेत. अशिक्षित स्त्रियांना नवीन कायदे कशी सुरक्षितता मिळवून देतात हे समुपदेशाने सांगणे गरजेचे आहे. त्याच बरोबर एखाद्या शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषणात पोलिसात तक्रार करण्याच्या पध्दती समजावून सांगितल्या पाहिजेत. समाजातील रूढी-परंपरा, चाली-रिती ज्यांचा म्हणून स्त्रीच्या प्रतिष्ठेला धोका आहे, त्या सर्व गोष्टी या समाजाच्या सकारात्मक प्रभावातून मोडून काढल्या पाहिजेत. आणि पश्चातापाने बलात्कर्त्याला असे गुन्हे परत न करण्याची मनापासून प्रबळ/तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे तरच त्याच्याकडून असे कृत्य भविष्यात घडणार नाही. तो इतरांना फसवू शकतो पण स्वत:च्या मनाला आणि देवाला फसवू शकत नाही. यासाठी प्रथम त्याचा देवावर आणि स्वत:वर पूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे.
जगदीश पटवर्धन
Leave a Reply