लेखक आनंद साधले यांचा जन्म ५ जुलै १९२० रोजी झाला.
आत्माराम नीलकंठ ऊर्फ आनंद साधले यांनी आपल्या जवळपास पंच्याहत्तर वर्षांच्या आयुष्यात साठ पुस्तकं लिहिली. ‘आनंदध्वजाच्या कथा’मधून त्यांनी धीट भाषेत, पण प्रांजळपणे, शृंगाररसपूर्ण लिखाण केलं. महाभारताचा एका वेगळ्या पद्धतीनं परामर्श घेणारं ‘हा जय नावाचा इतिहास आहे’ हे त्यांचं पुस्तक गाजलं. ‘सौतीने व्यासमुनींच्या जय नावाच्या इतिहासाचे ‘महाभारत’ बनविले तेव्हा त्यात अनेक भारूडांची भर घालून, त्याच्याच शब्दांत या ग्रंथाचे स्वरूप ‘यात सर्व काही आहे आणि यात जे नाही ते कुठेही नाही’ अशा प्रकारचे केले आहे. सौतीचा हा प्रयत्न ‘महाभारतपूर्वकालीन ज्ञानसंग्रह’ या दृष्टीने इष्ट असला तरी व्यासांचा मूळ हेतू लुप्त होऊन, त्याचा अजबखाना झाला हे खास’ – अशी अत्यंत परखड टीका साधले यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केली आहे. आपल्या रोखठोक शैलीत त्यांनी महाभारतातल्या प्रमुख घटनांचं विश्लेषण केलं आहे.
त्यांचं ‘मातीची चूल’ हे आत्मचरित्रही स्पष्ट आणि रोखठोक विवेचनामुळे चर्चिलं गेलं. लहान मुलांसाठी त्यांनी ‘इसापनीती’ आणि ‘हितोपदेश’सारखी पुस्तकं लिहिली. ‘नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर’ हे नाटकही त्यांच्या नावावर आहे.
आनंद साधले यांचे निधन ४ एप्रिल १९९६ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply