य.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) हे मराठीतील उत्तम लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या होत्या..
य.गो. जोशी यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथे झाले. आर्थिक ओढगस्तीमुळे इंग्रजी पाचवीत असतानाच त्यांनी शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांनी अनेक नोकर्याझ केल्या. शाई, सुगंधी तेले तयार करून विकण्याचा तसेच वृतपत्रे विकण्याचा व्यवसाय केला. पुढे लेखनास सुरुवात केली व १९३४ मध्ये प्रकाशन व्यवसायास आरंभ केला. हे प्रकाशन प्रामुख्याने वैचारिक वाङ्मय प्रकाशित करत असे. शिवराम महादेव परांजपे यांच्या ’काळातील निवडक निबंधां’चे १० भाग य.गो. जोशी प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते.
य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले.
जिवंत अनुभवातून प्रकटलेली जोशी यांची कथा पांढरपेशा मध्यमवर्गीय जीवनाचे, व्यक्ती–व्यक्तींतील भावसंबंधाचे जिव्हाळ्याचे चित्रण करते. परिणामाची उत्कटता, सहजसुंदर संवाद, साधी, प्रसन्न आणि अर्थपूर्ण भाषाशैली ही त्यांच्या कथालेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती. तंत्र हे कथेच्या गळ्यात अडकलेले लोढणे, अशी त्यांची ठाम समजूत होती. ‘ग्यानबा तुकाराम आणि टेक्नियक’ ह्या कथेतून त्यांनी तंत्राच्या हव्यासाचा उपहास केला आहे.
य.गो. जोशी हे पुण्यातून प्रकाशित होणार्या ’प्रसाद’ मासिकाचे संपादक होते.
७ नोव्हेंबर १९६३ रोजी य.गो. जोशीं यांचे निधन झाले. ७ नोव्हेंबर रोजी स्मृतीदिनाच्या दिवशी नामवंतांच्या उपस्थितीत ’यशवंत संध्या’ नावाचा संगीत कार्यक्रम करण्यात येतो.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply