अरुणा ढेरे यांचा जन्म २ फेब्रुवारी १९५७ रोजी पुण्यात झाला.
अरुणा ढेरे या जेष्ठ लेखक रा.शं.ढेरे यांच्या कन्या. त्यामुळे बालपणापासून एका उच्च दर्जाच्या वाङ्मयीन वातावरणातच त्या मोठ्या झाल्या. अरुणा ढेरे यांच्या घरात जमिनीपासून छतापर्यंत रचलेल्या पुस्तकांमुळे ग्रंथांच्या सहवासात आणि साहित्याने भारावलेल्या वातावरणात त्यांचे बालपण गेले. अरुणा रामचंद्र ढेरे या कविता, कथा, कादंबरी, ललित लेख, समीक्षा, संशोधनपर लेख असं चौफेर लेखन करणाऱ्या प्रतिभावान लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. पुराणकथा, लोककथा, दंतकथा, रामायण-महाभारतादी ग्रंथ अशा विविध स्रोतांमधून त्यांनी स्त्रीच्या विविध रूपांचा शोध घेऊन अत्यंत सुंदर आणि ओघवत्या शैलीत त्यावर लेखन केलं आहे. त्यांच्या तोंडून अत्यंत रसाळ आणि सुंदर भाषेत त्यांचे विचार ऐकणे हीदेखील वाचकांसाठी पर्वणीच असते.
संपूर्णपणे पुस्तकांनी भरलेलं घर असल्यामुळे अत्यंत समृद्ध बालपण लाभलेल्या अरुणा ढेरेंना वाचनाची आणि त्यातूनच लेखनाची गोडी लागली आणि वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासूनच त्यांनी हातात लेखणी पकडली.
‘आदिबंध आणि स्वातंत्र्योत्तर मराठी कथा-कादंबरी’ या विषयासाठी त्यांना डॉक्टरेट मिळाली आहे. पाच राज्य पुरस्कार, ‘मसाप’चे सहा पुरस्कार, बहिणाबाई प्रतिष्ठान, काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठान पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे.
प्रेमातून प्रेमाकडे, मैत्रेयी, मामाचं घर, कृष्णकिनारा, नागमंडल, अज्ञात झऱ्यावर रात्री, रूपोत्सव, अंधारातले दिवे, दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य, काळोख आणि पाणी, कवितेच्या वाटेवर, नव्या जुन्याच्या काठावरती, पावसानंतरचं ऊन, प्रकाशाचे गाणे, प्रतिष्ठेचा प्रश्न, शाश्वताची शिदोरी, स्त्री आणि संस्कृती, सुंदर जग हे, त्यांची झेप त्यांचे अवकाश, उंच वाढलेल्या गवताखाली, आठवणींतले अंगण, डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार, जावे जन्माकडे, मनातलं आभाळ, निळ्या पारदर्शक अंधारात, निरंजन, प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, विस्मृतिचित्रे, विवेक आणि विद्रोह, भगव्या वाटा, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
अरुणा ढेरे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्याही अध्यक्ष होत्या.
अरुणा ढेरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply