नारायण सीताराम फडके हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १८९४ साली झाला. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. इ.स. १९४९ मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना आणि भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे , रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणार्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. त्यामुळे अत्रे – फडके यांचे नेहमी होणारे वाद हे त्यावेळी महाराष्ट्राला नवीन नव्हते. कारण अत्र्यांप्रमाणे अनेकांचे मत असे होते की ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्या म्हणजे निवळ मनोरंजन करणाऱ्या आणि दिवा-स्वप्न दाखवणाऱ्या होत्या , असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या देत वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते. अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. लेखिका कमला फडके (माहेरच्या कमल दीक्षित) या ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्नी.
त्यांच्या कलंकशोभा या कादंबरीवरून त्याच नावाचा एक चित्रपट निघाला होता . ना.सी.फडके यांचे पंचवीस हुन अधिक कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या काही कथांचे आणि कादंबऱ्यांचे इंग्रजी आणि इतर भाषांतूनही अनुवाद झाले आहेत.
अखेरचे बंड , अटकेपार , अल्ला हो अकबर ! , असाही एक त्रिकोण !, उद्धार , कलंकशोभा , कलंदर , कुलाब्याची दांडी, भोवरा , जादूगार, दौलत, झंझावात , अशा अनेक कादंबऱ्या गाजलेल्या आहेत . तर धुमवालये, नव्या गुजगोष्टी ,निबंध सुगंध असे लघुनिबंध संग्रह लिहिलेले आहेत. त्यांची ‘ अधीर मन बावरे , घेई विहंगासम भरारि ,पदपंकजाते प्रभूच्या आणि ललना दिसे सुप्रभाती ही गीतेही आहेत.
रत्नागिरी येथे १९४० साली भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता. १९६२ साली त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता. त्यांचा नावाचा पुरस्कार दरवर्षी एका उत्तम साहित्यकृतीला देण्यात येतो.
ना. सी. फडके यांचे २२ ऑक्टोबर १९७८ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply