लेखिका प्रा. यास्मिन शेख यांचा जन्म २१ जून १९२५ रोजी नाशिक येथे झाला.
डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली. डॉ. यास्मिन शेख यांचे मूळ नाव जेरूशा जॉन रुबेन. जन्मानं बेनेइस्रायली ज्यू. लग्न भारतीय मुस्लिमाशी आणि पेशा मराठी व्याकरण व भाषाशास्त्राचं अध्यापन. जेरूशा रूबेन यांचा हा प्रवास विस्मयकारक आणि कौतुकास्पद असाच आहे. त्यांचा जन्म पॅलेस्टाइनमधला. त्या देशातल्या ज्यूंच्या अनन्वित छळाला कंटाळून अनेक कुटुंबांनी स्थलांतर केलं. त्यातील काही कुटुंबं भारतात आली. जवळजवळ अंगावरच्या कपड्यानिशी भारतात आलेल्या या ज्यू कुटुंबांनी भारतात आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. केवळ इथली भाषाच नाही तर प्रथा-परंपरा, रीतीरिवाज, सण-उत्सव सर्व काही स्वीकारलं. ती ‘भारतीय’ झाली. रुबेन यांचं कुटुंबही त्यापैकीच एक. वडील, जॉन रुबेन सार्वजनिक बांधकाम विभागात होते. त्यामुळे त्यांची ठराविक काळाने बदली व्हायची. (बदलीच्या प्रत्येक गावी काही ज्यू कुटुंबं नव्हती, मराठीच कुटुंबं होती.) त्यामुळे रुबेन यांचं शिक्षण वेगवेगळ्या गावी झालं. शालेय शिक्षण पंढरपूरला झालं, तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प.महाविद्यालयात. मराठी भाषा व साहित्य हा विषय त्यांनी घेतला. तिथं त्यांना श्री.म.माटे हे शिक्षक लाभले. माटे मास्तरांच्या उत्तम मराठी शिकवण्याचा, त्यातही मराठी व्याकरण शिकवण्याच्या पद्धतीमुळे रुबेन मराठीच्या, मराठी व्याकरणाच्या प्रेमात पडल्या. बी.ए.बी.टी.ला त्यांनी फर्स्ट क्लास मिळवला. नंतर एम.एम. केलं. त्यानंतर काही काळ औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयामध्ये अध्यापन केलं. त्यानंतर तब्बल अठ्ठावीस वर्षं त्यांनी सायन (मुंबई)च्या ए.आय.इ.एस महाविद्यालयात अध्यापन केलं. तिथं श्री.पु.भागवत हे त्यांचे सहकारी होते. निवृत्तीनंतर त्यांनी दहाएक वर्षं स्पर्धा परीक्षेच्या मुलांना भाषाशास्त्र व मराठी व्याकरण शिकवलं.
त्यांनी ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ व ‘मराठी शब्दलेखनकोश’ ही मराठी व्याकरणाविषयीची दोन नितांत सुंदर पुस्तकं लिहिली आहेत. पण या पुस्तकांवर त्यांचं नाव यास्मिन शेख असं आहे. त्याचीही एक गोष्ट आहे. जात, धर्म, वंश या पलीकडे जाणून निखळ मानवतावादी झालेल्या रुबेन यांनी अझीझ अहमद शेख यांच्याशी लग्न केलं. बाईंचा विवाह प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांच्या पुढाकाराने झाला.
‘सांस्कृतिक समृद्धीसाठी’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘अंतर्नाद’ या वाङमयीन मासिकाच्या त्या गेल्या दीड दशकाहून अधिक काळ ‘व्याकरण सल्लागार’ आहेत. ‘अंतर्नाद’ची मुद्रितं त्या अजूनही म्हणजे वयाच्या नव्वदीतही तपासतात. त्या ‘अंतर्नाद’च्या केवळ मुद्रित तपासनीस नाहीत, तर ‘व्याकरण-सल्लागार’ आहेत. आजवर मराठीमध्ये इतकी वाङमयीन नियतकालिकं प्रकाशित झाली, होत आहेत, पण कुठल्याही नियतकालिकानं असं स्वतंत्र पद निर्माण केलं नव्हतं. ते बाईंसाठी ‘अंतर्नाद’ने निर्माण केलं.
मोठी कन्या डॉ. शमा आणि धाकटी प्रा. रुकसाना या दोघीही प्रेमाने सांभाळण्यास तयार असतानाही स्वावलंबन हा गुण असलेल्या यास्मिन शेख या पुण्यातील औंध येथे एकटय़ाच राहतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply