अप्पा पेंडसे म्हणजे गोविंद मोरेश्वर पेंडसे यांचा जन्म १७ नोव्हेबर १९१० रोजी बडोद्याजवळील व्यास या गावी झाला. त्यामुळे त्यांचे शिक्षण गुजराथीमधून झाले. घरातली आर्थिक प्रसिथिती बिकट असल्यामुळे त्यांना पुढचे शिक्षण गेहता आले नाही. नोकरी करावी म्ह्णून ते मुंबईला आले . मुंबईमध्ये आल्यावर ते वृत्तपत्रातून लिहू लागले. ‘ विविधवृत्त ‘, सिनेसाप्ताहिक तारकांमध्ये उपसंपादक , संपादक अशी कामे त्यांनी केली. त्याशिवाय निर्माते दादासाहेब तोरणे , बाबुराव पै, पांडुरंग नाईक , मा. विनायक , बाबुराव पेंढारकर यांच्यासारख्या नामवंत कलाकारांच्या प्रदीर्घ मुलाखती त्यांनाही घेतल्या आणि त्या प्रसिद्ध केल्या. त्यांची लिहिण्याची पद्धत अत्यंत वेगळी होती ते नर्मविनोदी लिहीत परंतु ते तिरकसही असायचे परंतु कोणी दुखावू नये अशी त्यांची भूमिका असे अर्थात त्यात परखडपणाही असे.
विविधवृत्त मासिकांमधून त्यांनी चित्रपटांची परीक्षणे लिहिली. ते जे परीक्षण करत त्यात त्यांचा स्वतःचा ठसा उमटत असे म्हणजे त्यांनी केलेले परिक्षण अभ्यासू तर असेच परंतु ते तितकेच वास्तव असे. त्यामुळे त्यांची परीक्षणे खूप गाजली आणि त्यांना महत्व निर्माण झाले . अप्पा पेंडसे यांनी चांगले परीक्षण केले आहे म्हटल्यावर वाचक ती कलाकृती बघण्यास जात असे , त्यांच्या शब्दांना किंमत होती आणि रसिक परीक्षण वाचून आपले मत ठरवत असत .
त्यांनी काही प्रमुख वृत्तपत्रातून लोकप्रिय लेखमाला लिहिल्या , पुढे त्या लेखांचे पुस्तकही झाले.
अप्पा पेंडसे हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवरचे नेते आणि पत्रकार होते.
अप्पा पेंडसे १९५८ साली मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडूनही गेले. त्याचप्रमाणे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय , मुबई मराठी पत्रकार संघ यांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता.
अप्पा पेंडसे यांनी बाबुराव पै यांच्या ‘ चूल आणि मूल ‘ या चित्रपटात नायक म्ह्णून काम केले होते. त्याचप्रमाणे ‘ झंझावात ‘आणि ‘ जन्माची गाठ ‘ या चित्रपटातही ते प्रमुख भूमिकेत होते. अप्पा पेंडसे यांचे व्यक्तीमत्व एखाद्या चित्रपटाच्या नायकाला शोभेल असेच होते. मला आठवतंय मी त्यांना वरळीला दूरदर्शन सेंटरमध्ये पाहिले होते. त्या दिवशी ते दत्तो वामन पोतदार यांच्या मुलाखतीसाठी तेथे आले होते. त्याकाळात ते दूरदर्शनच्या ‘ प्रतिभा आणि प्रतिमा ‘ आणि अन्य कार्यक्रमात कलाकार , लेखक , दिग्दर्शक यांच्या मुलाखती घेत असत. यांनी घेतलेल्या काही मुलाखती मी आधीच टी. व्ही. वर पाहिलेल्या असल्यामुळे त्यांना ओळखता आले. त्याबरोबर उपरणे -कोट -धोतर आणि डोक्याला पुणेरी पगडी घातलेले दत्तो वामन पोतदार आहेत हे मला मागाहून कळले. त्यांनी दूरदर्शनवरून दादा साळवी , वनमाला, स्नेहप्रभा प्रधान आणि अनेकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. विशेष म्हणजे त्या मुलाखती इतक्या उच्च दर्जाच्या होत्या की त्या माझ्यासकट अनेकांना आजही आठवतात. ते मुंबईच्या खेतवाडीत राहत असत .
अप्पा पेंडसे यांची मुलगी वसुंधरा पेंडसे-नाईक ह्या देखील उत्तम पत्रकार, संपादक आणि स्तंभकलेखिका होत्या. त्यांचा लोकसंग्रह अफाट होता. महाराष्ट्र आणि देशातल्या ख्यातनाम नेत्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या होत्या. त्यांची लेखनशैली स्वतंत्र आणि प्रवाही होती. पत्रकारांनी उथळ लेखन न करता सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत जागरूकपणे लेखन करायला हवे, असा त्यांचा आग्रह असे. लेखनासाठी कोणताही विषय त्यांनी व्यर्ज्य मानला नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रातून बाहेर पडल्यावरही काही वृत्तपत्रात त्यांनी चौफेर स्तंभलेखनही केले होते.
अप्पा पेंडसे यांचे २६ जून १९८० रोजी वृध्दापकाळामुळे मुंबईत निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply