लेखिका रोहिणी निनावे यांचा जन्म ३० जूनला झाला.
अनेक मराठी वाहिन्यांवरुन सर्व परिचित झालेलं एक नाव, हस-या चेह-याची अभिनेत्री म्हणून आणि नंतर पटकथाकार म्हणून सर्वश्रुत झालेल्या रोहिणी निनावे.
दामिनी, अवंतिका, अक्कासाहेब, राधिका असो की राजश्री प्रॉडक्श्नच्या गाजलेल्या हिंदी मालिका. रोहिणी निनावेंच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली प्रत्येक व्यक्तिरेखा आणि मालिका लोकप्रिय होतेच. मालिकांच्या विश्वात आपल्या लेखणीने यशस्वी मालिकांची गुढी उभारणाऱ्या प्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या मालिका लेखनाला २५ वर्षे ऑक्टोबर मध्ये पूर्ण होतील. रोहिणी निनावे यांचे वडील प्रसिद्ध लेखक -कवी वसंत निनावे. त्यामुळे त्या लहान असल्यापासून घरामध्ये साहित्यिक वातावरण होतं.. तुलाही लेखक व्हायचं असेल तर आधी तुझी भाषा चांगली असायला हवी.. वाचन हवं ..आणि व्यावसायिक लेखन कसं करतात हे शिकायला हवं… हा कानमंत्र वडिलांनी त्यांना सुरवातीलाच दिला होता. त्यांनी मराठी आणि हिंदी साहित्यात मी एम. ए.केलं आणि त्यांना साहित्याची अधिक गोडी लागली. रोहिणी निनावे या सरकारी नोकरीत, माहिती आणि जनसंपर्क खात्यात गॅझेटेड अधिकारी म्हणुन काम करत असताना मालिकांमध्ये काम करायच्या. सुरवातीला त्यांनी प्रतिबिंब, संघर्ष, गिनीपिग, घरोघरी, अशा मालिकांमधून अभीनय केला. रोहिणी निनावे यांनी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेसाठी लेखन करत असताना त्यात अभिनयही केला आहे.
त्यांच्या लिखाणाला सुरूवात झाली ती खरी शीर्षक गीतांनी. गौतम अधिकारी यांनी रोहिणी निनावे यांना पत्रकारिता या विषयावर कथा लिहून मागितली ती कथा म्हणजेच दामिनी.. त्या काळी तेव्हा फक्त दूरदर्शन होतं. व ती पहिलीच दैनंदिन मालिका होती. दामिनीची कथा लिहिल्यावर तब्बल ५ वर्षांनी टीव्ही वर आली.
अवंतिका हे त्यांच्या लेखन प्रवासातलं महत्त्वाचं वळण ठरलं… ही मालिका अतिशय लोकप्रिय ठरली. यात काम करणारे सगळेच कलाकार दिग्गज होते.. स्मिता तळवलकर यांसारखी हुशार , अनुभवी, बहुश्रुत निर्माती आणि संजय सुरकर यांच्यासारखा निष्णात दिग्दर्शक अशी सगळी छान भट्टी जमून आली होती… या मालिकेने त्यांना खूप काही शिकवलं ..!
अवंतिका नंतर अवघाची संसार, ऊन पाऊस , अधुरी एक कहाणी, कळत नकळत अशा अनेक मालिका लिहिल्या.. पण बरेच वेळा मतभेद झाल्यामुळे त्यांनी मालिका अर्धवट सोडल्या. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे, पुढचं पाऊल , वचन दिले तू मला , एका लग्नाची गोष्ट, वेग, काटा रुते कुणाला, अर्धांगिनी, अनुपमा अशा अनेक मालिका लिहिल्या.
याच दरम्यान त्यांना हिंदी मालिकाही लिहायला मिळाल्या .. याची सुरुवात बालाजी च्या कुसुम मालिकेच्याच्या संवादांपासून झाली . … त्यानंतर संजीवनी, दिलसे दिया वचन, तुम्हारी दिशा या मालिकांच्या साठी लेखन केले.
राजश्री प्रोडक्शन साठी त्यांनी यहाँ मैं घर घर खेली , प्यार का दर्द है , मेरे रंग में रंगनेवाली या मालिका लिहिल्या.
सूरज बडजात्या यांच्या बरोबर मं केल्यावर रोहिणी यांना ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका लिहायला मिळाली. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेला खूप लोकप्रियता मिळाली.
त्या नंतर ‘मोलकरीण बाई’ ही एका वेगळ्या विषयावरची मालिका त्यांना लिहायला मिळाली, तसेच ‘मुलगी झाली हो’ या बाप लेकीच्या नात्यावरच्या त्यांच्या मालिकेला ही खूप लोकप्रियता मिळाली. जुलै मध्ये त्यांची ‘अजूनही बरसात आहे’ ही एक एक नवीन मालिका येत आहे.
तसेच त्यांनी “क्षण एक पुरे” सारखं नाटकही लिहीले आहे. पूर्वी त्या कविता ही करत असत. त्यांचा ‘इंतजार’ नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झालाय. त्याला गुलजार यांनी प्रस्तावना दिलीय. अभिनेत्री शमा निनावे या त्यांच्या वहिनी होत.
रोहिणी निनावे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply