लेखिका, आकाशवाणीच्या निवेदिका सुधा नरवणे यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३० रोजी झाला. ‘आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे,’ हा उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या आवाजाशी अनेकांच्या लहानपणीच्या आठवणी निगडीत आहेत. रेडिओ ऐकणाऱ्या कित्येक रसिकांनी त्यांना कधी पाहिलेही नसेल; पण सात पाचच्या बातम्या ऐकल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात व्हायची नाही. सुधा नरवणे या माहेरच्या सुधा पारसनीस. त्यांचे पती मुकूंद नरवणे हे हवाई दलात होते.
सुधा नरवणे या मुळात लेखिका होत्या. लिखाणाची आवड असलेल्या नरवणे यांनी कथा, कादंबरी, निबंध, नियतकालिकांमधील लेख असे विपुल लेखन केले. लेखनाची आवड त्यांनी वृद्धापकाळापर्यंत जपली. ‘इंद्रधनू’, ‘ते अठरा सेकंद’, ‘लामणदिवा’, ‘जननी : माता’, ‘कन्या’, ‘मातृत्व’, ‘इतवा मुंडाने लढाई जिंकली’ ही त्यांनी लिहिलेली आणि अनुवादित केलेली काही पुस्तके. सत्यकथा, किर्लोस्कर, हंस, स्त्री, माणूस अशा अनेक मासिकांमध्ये त्यांचे लेखन प्रसिद्ध होई. राज्य पुरस्काराबरोबरच इतरही पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला. आदिवासींच्या जीवनावर आधारलेला कथासंग्रह लिहून त्यांनी वंचित घटकांची अवस्थाही मांडली. एखादी स्त्री वेगवेगळ्या भूमिकांमधून कशी वावरते, पुरुषप्रधान संस्कृतीत जगताना तिला असंख्य वेदनांचा सामना करावा लागतो, याचे सखोल, वास्तववादी चित्रण नरवणे यांनी लेखनातून मांडले. सुधा नरवणे यांचे चिरंजीव मनोज हे भारताच्या लष्करप्रमुखपदी कार्यरत आहेत.
सुधा नरवणे यांचे निधन २२ जुलै २०१८ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply