वैद्यकशास्त्रज्ञ डॉ.वसंत रामजी खानोलकर
कर्करोग्यांना योग्य तऱ्हेचा व वेळीच उपचार मिळावा या हेतूने संशोधनाचा पाया घातला. विकृतिशास्त्र या विषयाची उंची वाढविण्यासाठी त्यांनी ‘टीचिंग पॅथॉलॉजिस्ट’ ही चळवळ उभी केली. यात त्या-त्या विभागातील तज्ज्ञांच्या अनुभवावर चर्चा, वादविवाद होत असत व शोधनिबंध वाचले जात. तसेच भारतातील सर्व विकृतिशास्त्रज्ञांना एकत्रित करण्यासाठी ‘इंडियन असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट्स’ हे व्यासपीठ तयार केले. मानवाच्या सवयी, राहणीमान यांमुळे कर्करोग उद्भवतो, हे त्यांनी दाखवून दिले. स्वत:च्या निरीक्षणातून त्यांनी अनुमान काढले, की तंबाखूच्या व्यसनाने मुखाचा कर्करोग होतो, वर्षानुवर्षे धोतराची घट्ट गाठ बांधलेल्या जागी त्वचेला इजा पोहोचून त्या ठिकाणी त्वचेचा कर्करोग होतो, तसेच काश्मीरमध्ये थंडीपासून रक्षण करण्यासाठी बाहेरील डगल्याच्या आत कांगरी नावाची निखाऱ्यांनी भरलेली शेगडी सतत ठेवल्यानेदेखील त्वचेचा कर्करोग होतो. जीवनशैली व कर्करोग यांचा घनिष्ठ संबंध पुढील काळात जगभरातील वैज्ञानिकांनी दाखवून दिला असला, तरी या क्षेत्रात खानोलकर अग्रेसर होते. […]