सगळे वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमले होते …. मंगळवेढयाच्या चोखोबा या तरुणाला देखील आता चंद्रभागेच्या वाळवंटात चालणाऱ्या भजनांची … कीर्तनांची आणि अर्थातच पंढरीरायाची अनामिक ओढ लागली होती …. मन सारखं तिथेच धावू लागे … … ज्ञानदेवाच्या … नामदेवाच्या वाणीने त्याच्यासारख्या असंख्य माळकऱ्यांना वेड लावलं होतं श्रीकृष्णाचा … मी सर्वांसाठीच आहे .. हा संदेश आणि त्यांचं कीर्तन ऐकायला सहस्रावधी माळकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमत होते … वेडं होऊन नाचत होते … श्रीकृष्णाचा हा संदेश होताच तसा … मी सगळ्यांसाठी आहे … तिथे मग कसलाही .. अगदी लहानसा देखील भेद नाही … साहजिकच चोखोबा आतून थरालला … आनंदला … तो देखील …. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल हा जयघोष करायला लागला … नामदेवाच्या .. नामे तरू अवघे जन, यमपुरी धाडू वाण … करू हरिनामकीर्तन, तोडू देहाचे बंधन … करू हरिनामाचा घोष, कुंभपाक पाडू ओस … बोला ….पुंडलीक वरदा हरी विठ्ठल…. या शब्दांनी भारावला …. सद्गत होऊन ओल्या अंतःकरणाने त्याने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं …. नामदेवांनी त्याला गुरुमंत्र दिला …. माळकरी हे अपूर्व दृश्य बघून हळवे झाले …. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले …. शेकडो भक्तांनी चोखोबांना आलिंगन दिलं …. ज्ञानेश्वरांनी त्याला आपल्या मिठीत घेतलं … चोखोबा या मांदियाळीत येता झाला … गळ्यात माळ … गोपीचंदनाचा टिळा आणि गळ्यात एकतारी घेऊन भिवरेच्या तीरावर भजन करता झाला ….
चोखोबा घरी आला वेगळ्याच धुंदीत …. सोयराबाईला … त्याच्या बायकोला आपल्या नवऱ्याची चित्तवृत्ती वेगळी भासली .. काहीतरी निराळे झाले आहे, हे तिला मनोमन कळलं … चोखोबा रोज घरी भजन करू लागला ….वेगळाच प्रेमळपणा तिला जाणवू लागला .. मग ती एकदा त्याला म्हणाली .. तुम्ही एवढी भक्ती करताय .. मला पण भजन करावंसं वाटू लागलंय …मी बी येईन पुढच्या खेपेला … पंढरीला … सोयराचे हे शब्द ऐकून अगोदरच मृदू झालेलं त्याचं मन आनंदित झालं … मी अभंग म्हणेन … तू साथ दे …. आणि तू गाऊ लागलीस की मी साथ करीन … आणि मग दोघं विठुरायाच्या भक्तीत पार रमून गेली …. चोखोबांना अभंग सुचत गेले …. त्यांचे अभंग … कीर्तनं माळकरी परिवारात नाव कमावती झाली … चोखोबांना मोठा मान मिळत गेला … चोखोबांची गणना श्रेष्ठ संतमंडळीत होऊ लागली … अवती भवती सगळा संतमेळा आनंदित होता झाला … भक्तांचे मोठे कडे दंग होऊन नाचू लागले …. मग अगदी शेतात काम करतांना सुद्धा ती दोघं भजन करत … सोयराबाई गोफण फिरवत राही … आणि चोखोबा भजन गुणगुणत शेतावर काम करे …. सोयराबाईला देखील आतून खूप काही वाटू लागलं …तिच्या हृदयात विठुरायाच्या भक्तीने शब्द फेर धरू लागले …. नामाचे चिंतन करा सर्व काळ …. नाही काळवेळ नामालागी … सुलभ हे सोपे नाव आठविता .. हरीहरी म्हणता मोक्ष मुक्ती … सायासाचे नाही येथे ये साधन … नामाचे चिंतन करा सुखे .. नामाचे सामर्थ्य जपता श्रीहरी …. म्हणतसे महारी चोखियाची …. हळूहळू चोखोबांबरोबर सोयरा देखील आपले अभंग म्हणू लागली …. नाचू लागली … श्रीकृष्णाला …. विठुरायाला आळवू लागली ….
इकडे इंद्रलोकी मोठा हाहाकार उडाला … इंद्राच्या राजवाडयावर जेवावयास जमलेले सारे पुण्यवंत आत्मे आपापसात कुजबुजू लागले … अमृताला वास येत होता … अमृत नासलं होतं … अमरपुरी हवालदिल झाली … एवढयात नेहेमीप्रमाणे नारद तिथे आले … सगळं ऐकल्यावर म्हणाले घाबरू नका … याला एक इलाज आहे … भिवरा नदीच्या काठी पंढरी क्षेत्रात प्रत्येक्ष देव भक्तांच्या समवेत नाचतो … असे हे वैभव दुसरीकडे कुठे नाही …कैवल्याची मूर्तिमंत पेठ तिथे आहे …. त्या ठिकाणी गेलात तर तुमचं अमृत नक्की शुद्ध होईल … इंद्राने अमृताचा कुंभ घेतला आणि तो नारदानांबरोबर विमानाने पंढरीत आला .. एकादशी होती .. वाळवंट वारकऱ्यांनी भरलेलं होतं .. नामदेव कीर्तन करत होते … सोमवार होता … इंद्राने बघितले अमरपुरीतले अनेक मान्यवर कीर्तनात दंग झाले होते …. प्रत्यक्ष श्रीहरी देखील होता … इकडे मंगळवेढयात चोखोबा आणि सोयरा आपल्या घरीच होते … नामदेवांनी सांगितलं होतं की द्वादशीचं पारणं फेडायला ते .. विठुराया आणि हजारो वारकरी त्यांच्या घरी येणारेत … ते सगळी तयारी करता करता भजन देखील म्हणत होते … इकडे नामदेव देहभान हरपून कीर्तन करत असतांना त्यांना जाणीव झाली की चोखोबा आपली आठवण काढत आहेत … त्यांची बहुतेक तयारी झाली आहे … त्यांनी कीर्तन आटोपतं घेतलं … ते आणि सगळे वारकरी मोठया आनंदाने मंगळवेढयाला निघाले … अर्थात इंद्रही निघाला … पण त्याच्या मनात शंका घोंगावत राहिली … अरे आपलं अमृत कसं शुद्ध होणार … इकडे खरं तर चोखोबा आणि सोयराची तारांबळ उडाली होती .. प्रत्यक्ष देव आणि मोठमोठे लोक जेवायला येणार … पण पण फक्त कण्या रांधल्या आहेत .. ऋद्धीसिद्धीला हे त्वरित कळलं .. त्या आपणहून चोखोबांच्या घरी आल्या .. आपल्या सगळ्या वैपुल्यासह … आणि मग काय पक्वान्नांचा घमघमाट सुटला … श्रीहरी तर आलाच पण रुक्मिणीला घेऊन आला .. चोखोबांनी आणि सोयराने त्यांच्यासमोर लोटांगण घातलं .. श्रीहरीने त्याला उठवलं आणि मोठया प्रेमानं आलिंगन दिलं … तेवढयात नारदांनी नजरेने इंद्राला खूण केली … इंद्र मग अमृताचा कुंभ घेऊन श्रीहरीला म्हणाला …. नारायणा, हे नासलेले अमृत तुम्हीच शुद्ध करू शकता आणि अमरपुरीला वाचवू शकता …. इंद्राची ती प्रार्थना ऐकून श्रीहरीने चोखोबांना बोलावलं …. आणि सांगितलं की चोखोबा …. हे अमृत तेवढं शुद्ध करून द्या …. चोखोबांना काही कळेना … ते आपले साधेपणाने म्हणाले .. भगवंता .. अरे तुझ्या नामामृतापेक्षा याची चव खचितच चांगली नसेल … श्रीहरी म्हणाला अरे तू घे तो कुंभ … आणि मग चोखोबांनी तो मोठया पवित्र अंतःकरणाने हातात घेतला ….त्याने त्या अमृताकडे टक लावून बघायला सुरवात केली …विठ्ठलाचा धावा सुरु केला …. इकडे वारकऱ्यांनी हरिनामाचा मंजुळ गजर सुरु केला .. अमृताचे चित्त हेलावले …. ते थरथरायला लागले …. आणि मग आपल्या मूळ प्रकृतीवर आले … परत मधुर झाले …. इंद्राचा यावर विश्वास बसेना …. श्रीहरी मात्र मिश्किल नजरेने हे सगळं बघत होता …. वारकऱ्यांनी ते अपूर्व दृश्य बघून गजर केला …. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल….
पुढे मग दिवसांमागे दिवस गेले …. चोखोबांबरोबरच सोयराबाई देखील हरिभक्तीत दंग होत गेली ….नवऱ्याबरोबरच जीवाचा विसावा म्हणून अहोरात्र गोड गळ्याने अभंग म्हणू लागली … श्रीहरीला आळवू लागली .. जन्मोजन्मी तुझी सेवा करायच्येय … तुझ्याशी एकरूप होण्याची आस बळावत आहे ….तिच्या भक्तीतल्या समर्पणाने सगुणात निर्गुण दिसायला लागलं …. आणि निर्गुणाकडे सगुणाच्या वाटेनेही ती चालायला लागली … आणि तिला शब्द स्फुरले …. अवघा रंग एक झाला …. रंगी रंगला श्रीरंग…. तिचे हे शब्द अमर होते झाले .. आपल्यातल्या प्रत्येकालाच ते आतून भावले .. आपल्या सगळ्यांनाच अशी कोणाशीतरी एकरूप होण्याची आतून आस असते … समाजातसुद्धा अशी अतिशय सच्ची एकरूपता त्यावेळी या वारकऱ्यांमध्ये होती … आजही ती वारीत बघायला मिळते … सोयराबाईंचे हे शब्द जर आपण नीट ऐकले तर आजही आपलं अंतःकरण मृदू करतात … काही क्षण का होईना आपल्याला ती एकरूपतेची भावना थोडासा स्पर्श करते .. एकदम आतून …. किती सोपा पण आयुष्याचा अर्थ सोयराबाईंच्या या शब्दांनी सांगितलाय … शेकडो वर्ष होऊन गेली …. काळ आमूलाग्र बदलला … तरी हे शब्द आजही आपलं मन हळवं करतात … आजही ते शब्द आपलं मन मंगल करतात …. पंढरपूर जवळचं मंगळवेढा आजही मला हाक मारतं …जरी शहरी रूप घेतलं असलं तरी तिथे एकदा तरी जावंसं वाटत राहतं …
चोखोबांचं … सोयराबाईचं हे गाव मराठी मनात असंच रुंजी घालत राहतं …
अवघा रंग एक झाला ।
रंगि रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूंपण गेले वायां ।
पाहतां पंढरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचें तें काम ।
पळोनि गेले क्रोध काम ॥३॥
देही असोनि विदेही ।
सदा समाधिस्त पाही ॥४॥
पाहते पाहणें गेले दूरी ।
म्हणे चोखियाची महारी ॥५॥
या अभंगाची यूट्यूब लिंक खाली दिली आहे …गानसरस्वती किशोरीबाई आमोणकर यांनी सोयराबाईंच्या या दिव्य शब्दांना किती आर्ततेने गायलंय …जर एखाद्या गाफील आणि शांत क्षणी तुम्ही हा अभंग ऐकला तर नक्कीच निराळा अनुभव येईल
या गोष्टी मी खूप अगोदर वाचल्या होत्या … आज त्या आठवल्या …. याच बरोबर मी काही दिवसांपूर्वी संत चोखोबांवर एक छोटासा लेख लिहिला होता … त्याची लिंक देखील खाली दिल्येय …
श्रीकृष्ण सगळ्यानांच प्रिय असाच आहे …. अवघा रंग एक झाला सारखीच आर्तता आहे या शब्दात .. त्याची देखील आठवण हे लिहितांना झाली … हे किती प्रस्तुत आहे ते माहित नाही .. पण मनात विचार आला खरा ….मात्र त्या एकरूप होण्याच्या भावनेचा … जुईचा मंद दरवळ या गाण्यात तुम्हाला नक्की जाणवेल … त्याची देखील युट्युब लिंक दिल्येय…
“सहेला रे आ मिल जा…
सप्त सुरन की बेला सुनाए
अब के मिले
बिछुडा न जा…”
– प्रकाश पिटकर
Leave a Reply