माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो,
मला बरेचदा व्यवसायाच्या संदर्भात ट्रेनिंग प्रोग्राम अथवा इतर सामाजिक कार्यक्रमांत तरुणाई बरोबर संवाद साधण्याचा योग येतो. मलादेखील अशा संवादाच्या प्रसंगाची ओढ असते. कारण ही तरुणाई काय विचार करते, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, अडचणी काय आहेत आणि भविष्याबद्दलच्या त्यांच्या आकांक्षा काय आहेत ह्याचा वेध ह्या निमित्ताने मला घेता येतो. गेल्या सुमारे चार दशकांच्या काळात नोकरीसंदर्भात मी हजारो तरुणांचे इंटरव्यू घेतले आहेत माझ्या संस्थेसाठी योग्य उमेदवार निवडणे हा जरी हेतू असला तरी त्या प्रोसेसमध्ये मला उमेदवार असलेल्या तरुण-तरुणींची मानसिकता समजण्यासाठी त्याचा उपयोग झाला. ह्या माझ्या प्रदीर्घ अशा काळात मला काय अनुभव आले आणि त्यातून आजच्या पिढीला स्वतःच्या उत्कर्षासाठी काय करता येईल, ह्याचा लेखाजोखा इथे मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हे करताना आपली प्रगती का होत नाही, ह्याबद्दल ही तरुणाई काय कारणे देते, ते आधी बघू या.
- हल्लीच्या काळात लाच दिल्याशिवाय कुठेही काहीही मिळत नाही.
- वशिला लावण्यासाठी माझ्या किंवा माझ्या कुटुंबीयांच्या कुठल्याही उच्चपदस्थांशी ओळखी नाहीत.
- मी अभ्यासात साधारण आहे.
- कुटुंबाची पर्यायाने माझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही.
- कौटुंबिक परिस्थितीने मला उच्च शिक्षण घेण्याची संधी दिसत नाही.
वरील सर्व किंवा काही कारणे देऊन आपल्या आयुष्यातल्या प्रगतीचा मार्ग किती अडथळ्याचा अथवा किती अशक्य आहे अशी मनोधारणा करून घेणाऱ्यांसाठी मी उदाहरणासह मार्ग सुचवणार आहे.
सर्वात प्रथम, मी पुढे जाऊ शकणार नाही ही पराभूत विचारसरणी मनातून काढून टाका. जगात प्रत्येकाला अडचणी असतात. त्यामुळे पुढे जाण्याचा मार्ग अवघड असू शकतो पण अशक्य नक्कीच नसतो. दुसरे असे की, जगात पूर्णपणे निरुपयोगी अथवा टाकाऊ काहीही नसते. असे उदाहरण देता येईल की, पूर्णपणे बंद पडलेले घड्याळ चोवीस तासात दोनदा तरी बरोबर वेळ दाखवते. ह्यातला विनोदाचा भाग सोडून द्या. पण तात्पर्य असे की, स्वत:मध्ये काही गुण नाही त्यामुळे मला आयुष्यात घवघवीत यश मिळणार नाही, ही भ्रामक समजूत काढून टाका.
शैक्षणिक क्षेत्रात मिळणारे देदीप्यमान यशच केवळ प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाते ही कल्पनासुद्धा भ्रामक आहे. तुम्हाला माहीत आहे काय की, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईन्स्टाईन, दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडला विजय मिळवून देणारे चर्चिल, प्रसिद्ध कवी गुलजार आणि असे किती तरी जण शिक्षण घेत असताना नापास झालेले होते. पण ते हिंमत हरले नाहीत. नंतर ते किती उंचीवर पोहचले ते सगळ्या जगाने पाहिले आहे.
सांगण्याचे तात्पर्य, आयुष्यातल्या अवघड परिस्थितीत छोट्या मोठ्या अपयशाने निराश होऊन, खचून जाऊ नका. तुम्हांला प्रारंभिक सूचनांनंतर हलाखीच्या परिस्थितीतून उच्चपदी पोहचलेल्या एका व्यक्तीची मी एक सत्य यशोगाथा सांगणार आहे. ती लक्षपूर्वक वाचा. त्यामुळे तुमच्या मनातली निराशा दूर होऊन मोठ्या आत्मविश्वासाने तुम्ही यशाच्या वाटेकडे वाटचाल करू लागाल ह्याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.
नासिक जिल्ह्यातील एका तालुक्याच्या गावी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील यशा नावाच्या मुलाची ही गोष्ट. वडिलांची पेन्शन तुटपुंजी. शेतीचं उत्पन्न जेमतेम. पाच जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यात कसाबसा चाले. घरात खायला पुरेसे असले तरी पैशाची चणचण नेहमीच असे. महिनाअखेरीस पेन्शन मिळण्यासाठी रेव्हेन्यू स्टॅपसाठी दहा नवे पैसे सांभाळून बाजूला काढून ठेवावे लागत. यशा आणि त्याच्या भावंडांचे शिक्षण नादारीत चालले होते. शाळेतर्फे कधी तरी आयोजित केलेल्या सहलींसाठी द्यायला पैसे नसल्याने अशा सहलींना त्यांना कधीच जाता आले नाही. वह्या-पुस्तकांचा खर्च कसाबसा होत असे. आर्थिक अडचणींमुळे बरोबरच्या सुखवस्तु घरातल्या मुलांकडून बरेचदा अपमानाच्या प्रसंगांना यशाला सामोरे जावे लागले.
शालान्त परीक्षा पास झाल्यावर पुढे काय करावे, हा त्याच्यासमोर प्रश्नच होता. कारण गावात कॉलेज नव्हते. जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे पैशाअभावी अशक्य होते. पंचवीस किलोमीटरवरच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी लागणारा दररोजचा एसटीचा खर्चदेखील कुटुंबाला परवडणारा नव्हता. बरोबरीच्या मित्रांचे कॉलेजचे सत्र सुरू झाले. पण यशा तसाच रिकामा राहिला. भविष्याबद्दल काही विचार तरी कसा करणार? सगळी सोंगे करता येतात पण पैशाचे सोंग कसे करणार? डोळ्यांसमोर अंधकार दिसत असला तरी यशा निराश झाला नाही. आज जरी आपल्याला पुढची वाट दिसत नसली तरी उद्या नक्कीच ह्यातून मार्ग निघेल अशी सर्व कुटुंबाची अपेक्षा होती. गावात राहून काही करण्याचा मार्ग दिसत नसल्याने यशाला लग्न झालेल्या मुंबईतल्या बहिणीकडे पाठवण्याचे ठरले. वडिलांनी घरातली पायलीभर करडई अंबादास तेल्याच्या घाण्यावर नेऊन विकली आणि यशाला मुंबईपर्यंत पाठवण्याचे पैसे कसेबसे उभे राहिले. यशा मायानगरीत पोहचला त्यावेळेस बहिणीच्या चाळीतल्या घरामुळे डोके टेकायला जागा मिळाली. मनात दुर्दम्य इच्छाशक्ती, कुठलेही काम करण्याची मानसिकता आणि घरातले चांगले संस्कार ह्याचीच फक्त शिदोरी यशाकडे होती. बहिणीवर-मेहुण्यांवर आपला बोजा पडू नये म्हणून मिळेल ती नोकरी पत्करण्याच्या हेतूने यशा मेहुण्यांच्या ओळखीने भांडुपच्या एका छोट्या वर्कशॉपमध्ये इंटरव्यू द्यायला गेला. इंटरव्यू घेणाऱ्या साहेबांनी विचारले, ‘मुलुंडच्या घरापासून कुठल्या बसने आलास? बसचा नंबर काय होता?’ यशाला सांगता आले नाही. तेव्हा त्यांनी ‘उद्या नोकरीला लागलास तर काय तुझ्या मेहुण्यांना घेऊन येणार काय?’ असे खडसावून विचारले. ‘तुझ्याकडे सामान्य ज्ञान नाही, चांगली तब्येत कमावली नाहीस’ असे शेरे मारले. यशा अपमानित झाला. खचला मात्र नाही. उलट त्याच्यातली सुप्त महत्त्वाकांक्षा ज्वालामुखीसारखी उफाळून आली. त्याने मनोमन ठरवले, आजपासून मी अथक कष्ट करीन. दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास घेईन.
त्याच कंपनीत हेल्पर म्हणून कामाला लागल्यावर यशा झपाटल्यासारखा कामाला लागला. त्याने कधी शारीरिक कष्ट केले नव्हते. पण पडेल ते काम तो करीत असे. आपल्या कामाव्यतिरिक्त सहकाऱ्यांना त्यांच्या कामात मदत करून दीड वर्षांच्या कालावधीत फिटरचेही काम त्याने शिकून घेतले. प्रयत्नाने त्याला इंजिनीअरिंग ड्रॉइंगपण समजायला लागले. त्यासाठी त्याने रस्त्यावर रद्दीत मिळणारी त्या विषयावरची पुस्तके विकत घेतली. मोठ्या कंपनीत तांत्रिक काम करणाऱ्या मेहुण्यांची मदत घेतली. नियमित फिटरच्या अनुपस्थितीत तो फिटरचे काम करू लागला. वर्कशॉपपासून तीन किलो मीटरवर असणाऱ्या भांडुपस्टेशनपासून रेडिएटरसाठी लागणारा कच्चा माल हातगाडीवरून ढकलत आणण्याचे काम यशाने न लाजता, न कंटाळता केले. आयुष्यात पहिल्यांदाच कष्टाची कामे करूनही संध्याकाळ त्याने वाया घालवली नाही. त्याने पी.डब्ल्यू.डी.वायरमनचा कोर्स केला. राहायला मुलुंडला, वर्कशॉप भांडुपला आणि कोर्स ठाण्याला. अशी त्रिस्थळी यात्रा रोजची सुरू झाली. पगार म्हणून रोज साडेतीन रुपये मिळत. रेल्वेपासाव्यतिरिक्त एकही पैसा खर्च करणे यशाला परवडणारे नव्हते. त्यामुळे रेल्वेखेरीज त्याचा इतर प्रवास पदयात्रेने होत असे.
यशाला पी. डब्ल्यू डी. चे वायरमनचे लायसेन्स मिळाले आणि त्याच सुमारास त्याच्याच ओळखीच्या एकाच्या सल्ल्यावरून तो क्रॉम्प्टन ह्या मोठ्या कंपनीत टेम्पररी म्हणून नोकरीस लागला. तिथे त्याला फिटरच्या कामाचीही संधी मिळाली. आयुष्यात पहिल्यांदाच तिन्ही पाळ्यांमध्ये काम करायची सवय लागली. काही महिन्यांतच त्या कंपनीत संप झाला आणि यशा पुन्हा बेरोजगार झाला. ह्या काळातही तो स्वस्थ मात्र बसला नाही. त्याच्या गावात तयार होणाऱ्या हिमरू शाली मुंबईत आणून त्याने त्या ठाणे, मुलुंड भागात घरोघरी जाऊन विकल्या. त्यात त्याला थोडीफार कमाई झाली.
ह्याच काळात यशाने वर्तमानपत्रात स्मॉल स्केल इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियनच्या तीन महिन्यांच्या कोर्सची जाहिरात वाचून तिथे प्रवेश घेतला. दिवसा कोर्स आणि संध्याकाळी, सुट्टीच्या दिवशी हिमरू शाली विकणे ह्यात तीन महिने गेले. तळोजा इथल्या इंडियन अल्युमिनियम कंपनीत भर्ती चालू असल्याचे कोर्सच्या सहाध्यायी मित्राकडून कळताच त्याने अर्ज केला. तिथे त्याला फर्नेस ऑपरेटर म्हणून नोकरी मिळाली.
इंडाल कंपनीची ही नोकरी सहाशे डिग्री तापमानाच्या भट्टीवर काम करण्याची होती. वर्षभरात यशा परमनंट झाला. आयुष्यात स्थैर्य आल्यासारखे यशाला वाटले पण पुढे शिकण्याची त्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. इथूनच सरस्वतीच्या तपस्येचा त्याचा एक दीर्घ प्रवास सुरू झाला. यशाने कंपनीव्यवस्थापनाला आपले शिक्षण पूर्ण करू देण्यासाठी सहकार्याची विनंती करून कायम रात्रपाळी मागून घेतली. मुलुंड कॉमर्स कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली. रात्रभर भट्टीवर काम, दिवसा कॉलेज. मुंब्रा ते तळोजा ह्या कंपनीच्या बसप्रवासात, कामातून सवड मिळाली तर यशा तो वेळ अभ्यासात घालवी. अशी चार वर्षे काढल्यावर तो उत्तम मार्कांनी बी. कॉम. उत्तीर्ण झाला. ह्याच सुमारास पर्सोनेल डिपार्टमेंटमध्ये क्लार्कची जागा निघाली आणि बाहेरच्या उमेदवारांबरोबर इंटरव्यू देऊन यशा निवडला गेला. दोन वर्षांनंतर ठाणा कॉलेजमध्ये संध्याकाळचे शिक्षण घेऊन एल.एल.बी. ही पदवी मिळवली. ह्या दोन वर्षांत कामगारांसाठी वाचनालय सुरू करण्याची कंपनीला सूचना करून त्याने त्यात पुढाकार घेतला. ‘तलोजादर्शन’ ह्या मासिकात कामगारविषयक कायदे, सुरक्षेसंबंधी लेखन आणि शब्दकोडी असे नियमित लेखन केले. ‘कायझन’ ह्या कामात सुधारणा करण्यासंबंधात असलेल्या योजनेत भाग घेऊन बक्षिसे मिळवली. खरे तर, जिथून सुरुवात केली तिथून आत्तापर्यंत बऱ्यापैकी प्रगती झाली होती. तिथेच काम करून यशा निवृत्त होऊ शकला असता. आता तर त्याचे लग्नही झाले होते. पण यशाला पुढच्या वाटा खुणावत होत्या.
यशाने मुंबई विद्यापीठाचे पर्सोनेल मॅनेजमेंटमधले पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचे ठरवले. पण त्यात अनंत अडचणी होत्या. एक तर हा कोर्स पूर्ण वेळ होता. घरच्या जबाबदारीने नोकरी सोडणे शक्य नव्हते. यशाने ह्यातून सुवर्णमध्य काढला. व्यवस्थापनाला विनंती करून परत एकदा सहाशे डिग्री तापमान असणाऱ्या भट्टीवर फर्नेस ऑपरेटर म्हणून काम सुरू केले. दिवसा परेल येथील कॉलेजमध्ये शिक्षण सुरू झाले. शिक्षणाचा हा टप्पा आतापर्यंतच्या प्रवासातला सर्वात खडतर टप्पा होता. राहायला मुलुंड कॉलनीत, स्टेशनपासून सहा किलोमीटर दूर. कॉलेज परेलला. रात्री नोकरी तळोजाला. त्या काळात दररोज साडेसहा तास प्रवास, साडेपाच तास कॉलेजमध्ये आणि रात्री आठ तास सहाशे डिग्री तापमान असणाऱ्या भट्टीवर नोकरी. घरी संध्याकाळचे फक्त चार तास मिळत. पण ध्येयावर अभेद्य निष्ठा, कठोर परिश्रमाची तयारी ह्या बळावर यशाने परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले!
गेली सुमारे तीस वर्षे यशा वेगवेगळ्या कंपन्यांत पर्सोनेल डिपार्टमेंटच्या विविध पदांवर यशस्वीरीत्या काम करत आहे. गेली सुमारे २१ वर्षे तो एका प्रसिद्ध अमेरिकन कंपनीत कार्यरत असून गेल्या पंधरा वर्षांत डायरेक्टर प्लँट पर्सोनेल ह्या पदावर कार्यरत आहे.
वाचक मित्रांनो, यशाच्या जीवनप्रवासाची, त्यातल्या चढउतारांची ही इतकी समग्र माहिती मला कशी, असा प्रश्न तुम्हांला पडला असेल ना? तो यशा दुसरा-तिसरा कोणी नसून मीच आहे!
माझ्याविषयी तुम्हांला आणखी थोडे सांगायचे आहे. ह्या प्रदीर्घ प्रवासात मी माझ्यासाठी काही नियम ठरवले, ते तुम्हांला सांगावेसे वाटतात. ते कदाचित तुम्हांला मागदर्शक ठरू शकतील.
- स्वतःवर आणि चांगल्या कामावर पूर्णपणे भरवसा ठेवा. यश कदाचित थोडे उशिरा मिळेल पण नक्की मिळेल.
- ‘पी हळद नि हो गोरी’ हे केवळ जाहिरातींमध्येच दिसते. वास्तवात कठोर परिश्रमाला पर्याय नसतो.
- ‘थांबला तो संपला, धावे त्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे’ ह्यावर विश्वास ठेवा. त्याप्रमाणे वागा.
- लबाडीने मिळवलेले यश आणि धन शाश्वत नसते. ज्या वेगाने ते येते त्याच्या दुप्पट वेगाने ते नाहीसे होते.
- सामाजिक नियम पाळून तुम्ही करत असलेल्या कुठल्याही कामाची लाज बाळगू नका.
मित्रांनो, ह्या यशाच्या वाटेवरच्या प्रवासासाठी तुम्हांला माझ्या हार्दिक शुभेच्छा.
-माधव सावरगांवकर
Leave a Reply