जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ९१ ; आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ४८
पानामधे अनेक प्रकार पहायला मिळतात. देशी, पुणा, कलकत्ता, बनारस, मघई, बंगाली, रामटेक,मांडवा,तिखा, लबाड इ.इ. ही त्या त्या भागावरून पानाना पडलेली नावे आहेत. आयुर्वेदाचा एक नियम वापरायचा ठरवला तर जिथे जे पिकते तिथेच ते मानवते, या नियमानुसार आपल्या जवळपास ज्या पानवेली लावल्या जातात, तीच पाने खाण्यासाठी वापरावीत.
शक्यतो फार जुन नकोत वा फार पिकलेले पान पण नको. बनारस पान साधारण पिवळसर झाल्यानंतर वापरले जाते. तर कोकणात जे पान मिळते ते पोपटी हिरवट असते. तर पूना पान गर्द हिरवे असते.
पान कोणतेही असो, मग ते कळीदार कपूरी पान असो, वा अन्य कोणतेही ! नियम तोच. देठ आणि शेंडा खुडुन त्याला केशरयुक्त चुना लावावा. काश्मिरी केशर हा पानातील एक शाही घटक. तसा ऑप्शनल, पण महत्त्वाचा ! अत्यंत गुणवान औषध. फक्त खरे केशर ओळखता यायला हवे. भारतातील हीच एक मोठी समस्या आहे, की, डुप्लीकेट हे ओरीजिनलपेक्षा भारी असते. असो.
जायफळाला बाहेरून जाळीदार कपडे घातलेली ही जायफळाची जणु काही मोठी बहिण म्हणजे ही जायपत्री ! या पानाचा कधीकाळी एक घटक होती. जायफळाप्रमाणेच थोडासा मद निर्माण करून दातातील वेदना कमी करणारी ही जायपत्री मोठे औषध आहे.
जायफळाचाही उडदाएवढा तुकडा पानात घालावा. ज्यांना ग्रहणी सारखे आजार आहेत, म्हणजे जेवल्या जेवल्या शौच्याला धावावे लागते, अशांनी जायफळ आणि जायपत्री घातलेले पान अवश्य खावे. स्तंभन या गुणाने आतड्यांच्या अन्न सेवनामुळे वाढलेल्या हालचाली (पेरीस्टालसीस) कमी करण्यासाठी या भावाबहिणींचा उपयोग होतो. त्याच्याजोडीला सुपारी देखील छान स्तंभक आहे.
केवळ अन्नाचेच नव्हे तर शुक्राचेही स्तंभन करीत असल्याने हा विडा रतीसुख वाढीला लावतो. शीघ्रपतनाचा त्रास असलेल्यांसाठी हा विडा हे वरदानच आहे. जुन्या मराठी चित्रपटांमधे हनीमुनचा नाजूक प्रसंग दाखवताना उतावळ्या नवऱ्याला संयम यावा, यासाठी नवविवाहिता, आपल्या नवऱ्याला विडा देतानाचे प्रसंग आपण पाहिले असतीलच.
आणि कामसुखाशी निगडीत असल्याने कदाचित उपवासाला विडा निषिध्द मानला गेला असेल.
एकंदरीत पानामधे चुना, कात, सुपारी, लवंग, वेलची, बडिशेप, केशर, जायपत्री, जायफळ घातले की विडा पूर्ण होतो. असे एका आह्निक संग्रह ग्रंथामधे वर्णीलेले आहे.
धार्मिक कार्यापासून लावणीच्या फडापर्यंत, हा विडा पोचलेला दिसतो. विडा घ्या हो नारायणा या आरतीनंतर म्हणण्याच्या आळवणी पद्यापासून ते अगदी कळीदार कपूरी पान कोवळं छान, घ्या हो मनरमणा, या लावणीपर्यंत या विड्याची रंगत गाजत होती, गाजत आहे, आणि गाजत राहणार आहे.
कुणी काहीही म्हणा,
विडा घ्या हो नारायणा,
किंवा
घ्या हो मनरमणा, मनऽरमणाऽऽ
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
11.07.2017
Leave a Reply