जगण्याची साधी सोप्पी तत्वे – ; आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ४२
पान जरूर खावे. आजचा तंबाखू सोडला तर पान हे व्यसन नक्कीच नाही. त्यातील घटक किती प्रमाणात असावेत अशी काही लिखित संहिता नाही. जसं आजकाल सांगितले जाते, दररोज तांदुळ अमुक ग्रॅम, अमुक ग्रॅम वजनाची भाजी भाकरी, एवढे मिली आमटी, एवढी मिग्रॅम चटणी. वगैरे. आपल्या इथे प्रत्येकाचे नियम वेगळे….. आणि आपण पहिलाच नियम बघितला की, कोणताच नियम, नियम म्हणून पाळायचा नसतो ! काही जणांना अर्धेच पान पुरते, काहींना दोन दोन पाने लागतात. काहींना ओली सुपारी पचवता येते, तर काहींना भाजलेली सुपारी सुद्धा लागते. (सुपारी लागणे म्हणजे खाल्ल्यानंतर गरगरल्यासारखे वाटणे. लागणे हा असाच खास पानपट्टीतला शब्द !)
शिंपल्यापासून बनवला गेलेला चुना पूर्णतः नैसर्गिक असतो. त्यात कोणतेही रसायन नाही. संपूर्णपणे शाकाहारी. डबीत अंगठा किंवा बोट दाबले असता बोटाला लागेल एवढा चुना पानाला लावण्यासाठी वापरावा. अगदी प्रमाणात सांगायचे झाले तर चुना उडदाएवढा.
हा चुना तयार करण्याची पद्धत फार देखणी आहे. शिंपले व्यवस्थित धुवुन, कोळशाच्या भट्टीमधे पिचवून घेऊन, गार झाले की चुन्याचा “बेस” तयार होतो. हे भाजलेले शिंपल्यांचे तुकडे एका पातेल्यात घेऊन फक्त त्यात शिंपले बुडतील एवढे पाणी ओतायचे आणि पुढील दहा मिनीटे फक्त बघत रहायचं. चुल नको, अग्नि नको. आपोआपच त्या शिंपल्यामधून वाफा यायला सुरवात होते. आणि हळुहळू मिश्रण उकळायला लागते. अगदी रटामटा ! पाणी आणि भाजलेल्या शिंपल्या यामधे जी रंजक रासायनिक प्रक्रिया सुरू असते, ती पहाण्यासारखी असते. (अस्मादिकांनी असा चुना घरी करून पाहिला आहे.) साधारणपणे अर्ध्या तासात हे मिश्रण आपोआप थंड होऊ लागते. शिवाचे तांडव थांबल्यानंतर, शिवाला जी समाधीची अवस्था येईल, तसा अनुभव येतो. एकदम शांत, एकदम थंड, एकदम अल्कलाईन ! स्पर्शाने गार. मऊ. त्यावर उरलेले पाणी म्हणजेच आपली चुन्याची निवळी ! कॅल्शियमचा उत्तम नैसर्गिक स्रोत. चमचाभर निवळी अथवा उडदाएवढा चुना सहजपणे आपली दिवसभराची गरज पूर्ण करतो. कोणत्याही साईड इफेक्ट शिवाय. कृत्रिम कॅल्शियम घेतले की होणारे मूतखडे किंवा पित्ताशयातील खडे या नैसर्गिक चुन्याने होत नाहीत. हे लक्षात घ्यावे.
चुना उत्तम कृमीनाशक, उत्तम संरक्षक, उत्तम अॅण्टासीड, उत्तम वेदनाशामक. युक्ती वापरली की उत्तम औषध तयार होते. आणि किंमत ? एक रूपयात चक्क एक ते दोन महिने. कोणती कंपनी एवढं स्वस्त आणि मस्त औषध देईल ? फक्त भारतमाता. पण याचा ब्रॅण्ड अॅम्बेसीटर कोणी नाही ना, म्हणून हा चुना फक्त पानटपरीतील एका डबीत बंदिस्त होऊन राहिला. त्याला फायुस्टार रूप कधी मिळालंच नाही.
असो !
पानाला हा चुना प्रमाणातच लावावा. पानाला चुना लावल्यानंतर खालील पानाचा हिरवा रंग वरून सहजपणे दिसला पाहिजे एवढाच लावावा, म्हणजे तो उष्ण होत नाही. तोंड फुलत नाही. असं झालंच तर काय करायचं. त्याचा अॅण्टीडोट आहे, नारळ. खोबरे भरपूर खायचं. की चुन्यामुळे आलेलं तोंड कमी होतं. कदाचित यासाठीच घट्ट झालेला चुना पुनः मऊ होण्यासाठी त्यात साध्या पाण्याऐवजी पक्व नारळाचे पाणी घालून ठेवतात.
चुना हा स्वतः कधीही नासत नाही, त्यात कधीही किड पडत नाही. जसं मीठ तसाच हा चुना. आजच्या भाषेत उत्तम प्रिझर्वेटीव्ह ! चुन्यातील जंतुनाशक या गुणामुळे पोटातील कृमीदेखील या चुन्याने मरतात. जसे पोटातील तसेच दातातील. पान खाणाऱ्या मंडळींचे दात कधी किडत नाहीत, ते या चुन्यामुळेच ! अल्पमोली आणि बहुगुणी.
जेवणानंतर जे अम्ल किंवा पित्त पोटात जास्ती प्रमाणात आलेले असते, त्याला संतुलीत करण्यासाठी हा अल्कलाईन चुना, जेवणानंतर पानातून खाल्ला असता, अॅण्टासिडप्रमाणेच काम करतो. म्हणजे हा पण फायदाच.
अर्थात समजून घेणाऱ्यांना, नाहीतर वर म्हणायला तय्यार, “गया चुना लगाके !”
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
05.07.2017
Leave a Reply