नवीन लेखन...

विडा घ्या हो नारायणा – भाग ५ 

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ८६ ; आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ४३

चुन्याबरोबर सहजपणे मिसळला जाणारा आणि आपला रंग चुन्याला देणारा कात हे आयुर्वेदातील एक अप्रतिम “लाईफसेव्हींग ड्रग” आहे. खैराच्या झाडाच्या जून सालींचा काढा करून खैराच्याच लाकडाने ढवळत त्या काढ्याचा केलेला खवा म्हणजे कात होय. पूर्णतः नैसर्गिक. उत्तम रक्तस्तंभक. रक्तशुद्धी करणारा. अनेक त्वचारोगांवर वापरला जाणारा हा कात. पानात वापरताना त्याचे जाड पाणी करून वापरण्याची पद्धत टपरीवर आहे. पण घरामधे वापरताना उडदाएवढा तुकडा पानात टाकून वापरता येतो. काताने दात आणि ओठ रंगतात. लिपस्टीक नसलेल्या काळात, केवळ पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे ओठ लालचुटूक दिसावेत, म्हणून फक्त कात पानामधे वापरला जात नसावा, तर त्याच्या अन्य औषधी गुणांचा फायदा केवळ ओठापुरता मर्यादीत न राहाता संपूर्ण शरीराला आतून आणि बाहेरून व्हावा. यासाठीच त्याची योजना पानामधे केली आहे.

पोटात जाऊन औषधी गुण दाखवण्यापूर्वीच त्याची “सबलिंग्युयल अॅक्शन” म्हणजे त्याचे तोंडातील लाळेमार्फत थेट पचन सुरू होऊन कार्य सुरू होते.

कषाय म्हणजे तुरट चवीचे हे औषध वाताला थोडे वाढवते, पण पित्ताला कमी करते. रक्तवाहिन्यांचा संकोच करण्यात एक नंबर आहे. म्हणजेच कुठुनही होणारा रक्तस्राव त्वरीत थांबविण्यासाठी कात उपयोगी ठरतो. विशेषतः हिरड्यांमधून येणारे रक्त थांबवणे, घसा, जीभ, गाल, टाॅन्सिल्स याना आलेले फोड कमी करणे, किंवा यातून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी काताची होणारी लोकल अॅक्शन म्हणजे स्थानिक उपयोगीता, महत्त्वाची आहे.

त्वचेच्या आश्रयाने होणारे पित्ताचे व्याधी कातामुळे कमी होतात. रूक्षपणा हा काताचा गुण आहे. वाहाणाऱ्या जखमा भरून आणण्यासाठी, जखमा सुकविण्यासाठी, स्राव कमी करण्यासाठी, पूय निर्मिती थांबवण्यासाठी, शरीरात आतून आणि बाहेरून वापर करण्यासाठी या रूक्ष आणि स्तंभक गुणाचा वापर वैद्यांकरवी होतो.

क्लेद म्हणजे पचनातील अवशेष राहिलेला आम, जो रक्तामधे, वा अन्य अवयवांमधे जाऊन तिथे मधुमेहासारखे व्याधी निर्माण करतो, अशा क्लेदाला आणि मेदाला आपल्या शोषक गुणाने कमी करणे, हे काम कात करतो. यासाठीच कात सुपारी आणि चुना हे मिश्रण यांच्या अंगभूत गुणांमुळे चरबी कमी करणारे, प्रमेह कमी करणारे जाडी कमी करणारे ठरते.
( वैद्यांसाठी संदर्भ – गुरूअस्रविशोधनःरोपणः क्लेदमेदोविशोषणः रूक्षोऽतित्वकप्रसादनः)

जसा कात पानातून वापरता येतो, तसाच तो पाण्यातूनही वापरता येतो. मुखामधील आजारांमधे जिथे गुळण्या सांगितलेल्या आहेत, त्यात हळद, मीठ या औषधाइतकाच कात महत्त्वाचा आहे. कपभर कोमट पाण्यात चिमूटभर कात पावडर टाकून गुळण्या करण्यासाठी वापरली असता, तोंडातील सर्व अवयवांचे व्रण, आवळून येण्यास मदत होते. केवळ तोंडातीलच नव्हे तर शरीरातून कुठुनही बाहेर पडणारे रक्त थांबवण्यासाठी जशी हळद लावली जाते, तशी काताची पूड किंवा कात उगाळून लावला जातो. कात कोमट पाण्यात टाकून त्या पाण्यात बसले असता, गुदमार्ग, योनीमार्ग, या ठिकाणातून होणारा अनैसर्गिक रक्तस्राव थांबविण्यास मदत होते. याला अवगाह असे म्हणतात. अर्थात हा पूर्ण उपचार नव्हे, त्यारोगासाठी वैद्यांच्या सल्ल्यानुसार अन्य औषधे पण घ्यावीच लागतात. पण इमर्जन्सी मधे रक्तस्राव थांबवण्यासाठी हमखास उपयोगी पडणारे औषध, अगदी आपल्या जवळ असावे, म्हणून या काताला कनवटीला असणाऱ्या पानाच्या चंचीत मानाचे स्थान आहे.

खैरापासून बनवलेले हे औषध प्रत्येकाच्या जवळ असावेच. नायतर खैर नाही.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

02362-223423.
06.07.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..