आयुर्वेद शास्त्रात मनुष्य शरीर , त्यात उत्पन्न होणारे रोग , त्याची चिकित्सा याचा विचार फार वेगळ्या पद्धतीने केला गेला आहे . वेगळे मी एवढ्यासाठीच म्हणीन की , आताची आपली जीवन शैलीच फार बदलली आहे ; त्यामुळे आपल्याला हा विचार वेगळा वाटण्याची शक्यता आहे . नाहीतर आयुर्वेद खरंतर नैसर्गिक पद्धतीची जीवनशैली सांगतो. व्याधी म्हणजे रोग याचा फारच खोलवर विचार केला गेला आहे . जे आपल्या शरीरात दुःख निर्माण करते व जे आपल्या मनाला अस्थिर करते अशा कोणत्याही कारणास व्याधी म्हणायला पाहिजे . अर्थात याचा विचार शास्त्रीयदृष्ट्याच केला आहे
शरीराच्या स्वस्थ अवस्थेचा विचारही खूपच सूक्ष्म आहे . आपले शरीर हे त्रिदोष , सप्तधातू , तीन मल , दश इंद्रिये , मन व अनेक मर्मस्थानांनी बनले आहे . वात , पित्त व कफ हे आपल्या शरीराचा आधारस्तंभ असून त्यानेच आपल्या शरीराचा सर्व व्यवहार चालतो .
रस , रक्त , मांस , मेद , अस्थी , मज्जा व शुक्र हे सात धातू असून शरीर घडणे , टिकणे हे सर्व या धातूंवरच अवलंबून असते .
अगदी शरीरातून बाहेर टाकले जाणारे मल , मूत्र , घाम हे देखील शरीर स्वस्थ ठेवण्याचेच काम करते . रोज पोट साफ नाही झाले तरी किती त्रास होतो हे सर्वांना माहीतच आहे .
आपली कर्मेंद्रिये म्हणजे जी काम करण्यास साहाय्यक असतात जसे हात पाय ! यांनी व्यवस्थित काम करणे आवश्यकच आहे , नाही का ?
डोळे , जीभ , कान , नाक , त्वचा ही ज्ञानेंद्रिये ! म्हणजे ज्याच्यापासून ज्ञानप्राप्ती होते , ते ही नीट काम करायलाच पाहिजेत .
वरील या सर्व शरीरातील घटकांचे काम जेव्हा नीट चालत असेल तेव्हाच आपण अगदी हेल्दी आहोत असे वाटते . नाही तर शारीरिक पातळीवर अस्वास्थ्य जाणवतेच .
याचबरोबर आपले मनही ठीक असणे अतिशय महत्त्वाचे आहे . अति ताण , असमाधान , निराश वाटणे , एकाग्रता न होणे , चिडचिड या सर्व त्रासाने शारीरिक दृष्ट्या स्वस्थ माणूसही गांजून जातो . त्यामुळे आपले मन ( यातच विचारशक्ती , बुद्धी सगळे आले ) स्वस्थ असणे देखील आवश्यकच आहे .
तसेच आपला आहार , झोपणे , काम करण्याची पद्धत याचाही आपल्या शरीरावर फार मोठा परिणाम होत असतो .
यामुळेच आयुर्वेदामध्ये जेव्हा एखाद्या रोगाचा विचार केला जातो तेव्हा वरील सर्व व इतरही अनेक मुद्दे विचारात घेऊनच तो रोग ठरवणे , त्याची कारणे शोधणे व मग त्याची चिकित्सा करणे , हे सर्व केले जाते . मग चिकित्सा करताना देखील या माणसाने काय खावे , किती झोपावे , किती व्यायाम करावा , काम कसे करावे याचा सल्ला हा औषधाइतकाच महत्त्वाचा असतो . यामुळेच आयुर्वेदातील सल्ला हा त्या रोगापुरता न ठरता आपल्याला कायमचा उपयोगी पडणारा ठरतो . कारण आयुर्वेद तुम्हाला केवळ ” ताप आला , हे औषध घ्या बरे व्हाल ” असे सांगत नाही तर तो तुम्ही यापूर्वी काय चुकीची जीवनशैली होती हे सांगतो व त्याबरोबरच यापुढे तुम्ही काय केलेत तर स्वस्थ रहाल हे देखील सांगतो .
हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की , आयुर्वे द शास्त्रानुसार आपल्याला होणारे रोग , त्यांचे निदान व ते परत होऊ नयेत या सर्वाचा विचार केला जातो .
शरीरात कोणकोणत्या प्रकाराने व्याधी होतात याचा विचार केल्यास खालील मुद्दे येतात. शरीराचा आधार असणारे तिन्ही दोष , सात धातू , तीन मल यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चढ – उतार , असमानता , योग्य कार्य न घडणे या प्रकारचे बदल झाल्यास रोग निश्चित होतो .
म्हणजेच त्रिदोष बिघडल्यास शरीर अस्वास्थ निर्माण होते . यालाच आम्ही निज रोग म्हणतो . मग आपल्याला सगळेच रोग हे यामुळे होतात का ? नाही . काही रोग आगन्तुज म्हणजे बाहेरून शरीरावर आक्रमण करणारे असतात म्हणजेच infection म्हणू शकतो . पण हे रोग काही जणांमध्ये तीव्र स्वरूपात आढळतात तर काही जणामधे अगदी सौम्य लक्षणे दिसतात . असे का होते याचा विचार केला गेला पाहिजे . टीबीच्या जंतूंची संख्या हवेत भरपूर असते पण सगळ्यांना टीबी होत नाही . याचे कारण आधुनिक शास्त्रानुसार आपली प्रतिकारशक्ती हे दिले जाते .
आयुर्वेदात याचा विचार अगदी , आपल्या जन्मापासून केला जातो . आपल्या मातापित्यांमध्ये जर अनेक विकृती असतील , धातूंचे प्रमाण ( रस , रक्त , मांस इ . ) अयोग्य असेल तर त्याचा परिणाम बालकावर निश्चितच होतो व त्यामुळे जन्मतः त्या बालकात एखादा अवयव नाजुक बनतो . उदाहरणार्थ काही बाळांमध्ये सर्दी , खोकला अति प्रमाणात होण्याचे दिसून येते . त्यांची श्वसनवह संस्था काहीशी नाजुक असल्याचे आढळते . ज्यामुळे त्यांना वारंवार रोग होतो . यालाच खवैगुण्य म्हणतात व अशा रुग्णाला सामान्य रूग्णापेक्षा वेगळ्या प्रकारची चिकित्साच उपयोगी पडते व अशा रुग्णांना जेव्हा श्वसनवह संस्थेचा विकार होतो तो बरा होण्यास ही त्रासदायक असतो . त्यांना केवळ औषधाने बरे न वाटल्यास मग पंचकर्मासारख्या चिकित्सेची आवश्यकता भासते .
पण मग जेव्हा बाहेरून रोगाचे आक्रमण शरीरावर होते अशा वेळेस आपण काय करणे अपेक्षित आहे ?
आपण आपल्या शरीराची शक्ती वाढवणे अपेक्षित आहे व तिचा विचार आयुर्वेदात खूपच विस्तृत स्वरूपात केलेला आढळतो .
प्रत्येक माणूस एक विशिष्ट दोषावस्था घेऊन जन्मलेला असतो . कारण हे कफ , पित्त व वात तिन्ही दोष शरीरात स्वस्थावस्थेतही असतातच . तर त्यांची स्वस्थावस्था बिघडू न देणे हे आपल्या हातात असते . योग्य वैद्याकडून आपण आपली प्रकृती म्हणजे शरीरात असणाऱ्या दोषांची उपस्थिती जाणून घेऊ शकतो . मग आपण जेव्हा निरोगी असतो अशा वेळेसच आपण योग्य त्या औषधी चिकित्सा , पंचकर्म व योग्य आहार याद्वारे आपले शरीर आणखी बलवान बनवण्याचा प्रयत्न करू शकतो . यामध्ये केवळ त्रिदोषच नाही तर सर्व सात धातू , मल या सर्वाचा विचार करावा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा , जसे दमट हवा , उष्ण हवामान याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो . तसाच ऋतुनुसार बदलणाऱ्या हवेचा परिणाम देखील शरीरावर होतो . मग शरीरामध्ये अस्वास्थ्य निर्माण होऊ शकते . उदाहरणार्थ अचानक ऑक्टोबर हिट सुरू होते व आपल्या शरीरावर त्या उष्णतेचा परिणाम होऊन अनेकांना मूत्रदाह होतो . मग जर आपल्या प्रकृतीनुसार आपणास ह्या रोगाचा त्रास होण्याची जास्त शक्यता आहे हे आपल्याला माहीत असेल तर आपण औषधे व पंचकर्म ऑक्टोबर हिट चालू होण्याआधीच चालू केली तर हा रोग निश्चित टाळता येऊ शकतो .
सांधेदुखी हा थंडीत वाढणारा त्रास. आपण थंडीच्या आधीच जर यावर पंचकर्म चिकित्सा केली तर हा त्रास असह्य होण्यापासून निश्चित सुटका होऊ शकते .
रोग जे बाहेरील जंतू , कीटाणूंमुळे होतो तो का ?
कारण ते जंतू , कीटाणू आपल्या शरीरात वाढण्यासाठी ते आपल्या शरीरात निर्माण झालेली दोषाची विकृत अवस्था होय . उदाहरणार्थ जेव्हा आपण कफ वाढण्याच्या काळामध्ये पथ्य पालन केले नाही ; जास्त कफ निर्माण होऊन तो घशात येऊ लागला तर अशा वेळेस जंतूंनी होणारा खोकला आपल्यावर सहज हल्ला करू शकतो व मग खूप त्रासदायक अशा खोकल्यास सामोरे जावे लागते .
म्हणूनच आपल्या शरीरात जे आपल्या आहाराने , कामाच्या स्वरूपाने , ऋतूमुळे दोषांचे चढउतार होतात , विकृती निर्माण होतात त्यांची काळजी घेणे , ते योग्य अवस्थेत ठेवणे हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे .
आहार , व्यायामासह योग्य निद्रा म्हणजे झोप हा ही दोष योग्य अवस्थेत रहाण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे . सध्याचा काळात योग्य वेळी झोपणे हे विसरून गेल्यासारखेच आहे . अयोग्य वेळी , भरपूर पोटभर जेवून लगेच झोपणे , अति झोपणे वा कमी झोपणे या सर्वामुळे शरीरात वात , पित्त विकृती निश्चितच होते आणि हे वारंवार घडत राहिले तर मग त्यातून आम्लपित्त , शिरःशूल सारखे आजार निर्माण होतात .
काही रोग असाध्य समजले जातात , जसे कर्करोग . हा रोग जरी असाध्य समजला जात असला तरी तज्ज्ञ टिकणारे चांगले आरोग्य आपल्यापासून कधीच दूर जाणार नाही .
वैद्य. अर्चना देसाई
सुश्रेया पंचकर्म आणि आयुर्वेदिक ब्युटी क्लिनिक
मुलुंड (पू.)
९८९२०३५०१३
Leave a Reply