अमुक रोगावर आयुर्वेदात काही सांगितले आहे काहो ?
नवीन नवीन रोगावर जुन्या आयुर्वेदातील औषधे कशी लागू पडतील ?
ही चौदा प्रकारची औषधे डाॅक्टरनी कायमचीच घ्यायला सांगितली आहेत. त्या औषधांबरोबर आयुर्वेदातील औषधी चालतील का ?
एखादे कायमचे घेण्यासाठी औषध सांगा हो वैद्यराज !
केमोचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी आयुर्वेदात काही आहे का ?
अॅलोपॅथीमधे जसं क्रोसीन आहे तसं आयुर्वेदात काय सांगितले आहे ?
आम्हाला वैद्यांनी सांगितलेले पथ्य आणि औषध घ्यायच्या वेळा पाळता येत नाहीत, ते सोडून आयुर्वेदातील औषधे देऊ शकता का ?
बी काॅम्लेक्ससाठी आयुर्वेदात काय ?
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करायची नाही तर आयुर्वेदात काही आहे का ?
अशा प्रकारचे असंख्य प्रश्न वैद्य मंडळींना विचारले जात असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वैद्याच्या शैक्षणिक आयुष्यातील निम्मी वर्षे फुकट गेलेली असतात. किंबहुना त्यासाठीच पाच वर्षाचा सिलॅबस पूर्ण करायला काहीजणांना सात आठ वर्षे पण द्यावी लागतात.
या एक मिनीटात विचारलेल्या दोन ओळीच्या प्रश्नांची उत्तरे अशी तीन चार ओळीतच कशी देता येणार ? पाच सहा दिवस विचार केल्यानंतर लक्षात येते की उत्तरे द्यायला सात तास तरी लागतील. म्हणजे आठवडा गेला. तोपर्यंत चांगलेच नाकी नऊ आलेले असतात. आणि दहा वेळा प्रश्नांची उत्तरे सांगितली तरी आणखी अकरा जण बारा प्रश्न घेऊन तयार असतात.
आजच एका गटात विचारणा झालीय. “प्रमेहाचे सर्व पंचवीस भाग वाचले. आता साखर नाॅर्मल राहण्यासाठी काय करायचे ते सांगा.” म्हणजे लोकांना किती ‘इन्स्टंट फाॅर्म्युले ‘ हवे आहेत ते बघा.
आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. ही विशिष्ट पॅथी नाही. विशिष्ट चौकट आखून त्यात औषधे आणि पथ्य कोंबायची म्हणजे आयुर्वेद नव्हे. असं जर कोणी करत असेल तर त्याला खरंतर आरोग्यच कळलेलं नाही.
समजा आपल्याकडे एखादे मशिन आणलेले आहे. तीन वर्षे वाॅरंटीचे ! काही कारणानी ते मुदतीपूर्वीच बंद पडले.
ते कसे बंद पडले, तेव्हा काय काम करीत होतो, याचे रसभरीत वर्णन ऐकवल्यानंतर तो काय म्हणतो ?
तज्ञाला दाखवल्यानंतर तो म्हणतो,
“अहो, या मशिन बरोबरचे हे ‘लिफलेट’ वाचले नाहीत का ? त्यावर हे बघा, स्पष्ट शब्दात लिहिले आहे, हे मशीन कसे वापरायचे ते ! तुम्ही हे मशीन तस्से वापरलेले नाही. सबब तुम्हाला या मशीनची ‘वाॅरंटी’ लागू होत नाही. ”
आपण कपाळावर हात मारून फक्त “ओऽहोऽऽ” एवढंच म्हणू शकतो. म्हणतो. कारण तेवढंच आपल्या हातात असते. आणि ते ‘लिफलेट’ वाचायची वेळ निघून गेलेली असते.
जीवनाचं असच होतं. या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही, असे हे दुर्लभ यंत्र जेव्हा तो शंभर वर्षाच्या वाॅरंटीसह, आपल्या हातात देतो, तेव्हाच एक ‘लिफलेट’ त्याने या यंत्राला जोडून पाठवलेले असते. हाऊ टु युज इट. लिहिलेलं असतं त्यावर !
पण आम्हाला हे ‘लिफलेट’ वाचून बघण्याची तसदी घ्यावी असे सुद्धा वाटत नाही. जेव्हा मशीन बंद पडते, तेव्हा हे मशीन का बंद पडले, कसे बंद पडले, कधी बंद पडले, हे शोधण्यासाठी, ‘लिफलेट’ शोधायची धावाधाव सुरू होते.
पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
असे होऊ नये……
या ‘लिफलेटचे’ नाव आहे.
” आयुर्वेद ”
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
11.02.2017
Leave a Reply