लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 6
एकदा दवाखान्यात एक जोडपे आले. बायको एकामागून एक तक्रारी सांगत होती.
माझे डोके दुखते, चक्कर आल्यासारखे वाटते, डोळ्यासमोर काळोख येतो, छातीत धडधडते, घशाला कोरड पडते, पोटात ढवळते, हात पाय वळतात, झोप लागत नाही. पायाची बोटे सुन्न होतात……. इ.इ. पायापासून डोक्यापर्यंत सर्व अवयवांच्या तक्रारी एकामागून एक सांगत गेली. म्हटलं, सर्व शरीर तपासून घेऊया. एक कागद फाडून दिला. माझं काम संपलं.
…….रुग्णांना पण हौस खूप असते, असल्या तपासण्या करून घेण्याची. आणि काहीवेळा काहीजण तर इतके अतिहुशार असतात आणि डाॅ. गुगुल यांच्याकडून मिळवून, “हे घ्या एम आर आय पर्यंतचे सर्व रिपोर्टस्.” असं म्हणून टेबलावर आपटतात.
एखाद्या नवविवाहितेला तिच्या दागिन्यांचे एवढे कौतुक नसेल, तेवढे हे केलेले मेडीकलचे रिपोर्टस् दाखवण्यात काही जणांना असते.
असो.
…….तर त्या बायकोला कोण आनंद झाला, तपासणी करण्याचा. म्हणाली, “बरं झालं, एकदा कळेल, काय झालं आहे मला ते ! ”
नवरा बिचारा गप्प होता. म्हणाला, “मला पण तो रिपोर्ट काढायचा कागद द्या. कंपनीकडून तपासणीसाठीचे पैसे मिळणार आहेत, घेतो तपासून !” त्याला दुसरा कागद फाडून दिला, माझं काय जात होतं ?
संध्याकाळी दोघंही परत आली, वहिनींचा चेहरा पडलेला, “काय हो झालं ? काही रिपोर्ट मधे काही गंभीर गडबड कळली का ? ” मी सहजपणे (पण चेहेऱ्यावर तेवढाच गंभीर भाव आणून) विचारलं.
ती तोंड एवढंस करत म्हणाली, ” कशातच दोष मिळाला नाही.”
“बरं झालं ना मग.”
“एवढे पैसे खर्च केले पण कुठेच दोष मिळाला नाही, असं कसं ?” आता मात्र मला हसू आले, “अहो, चांगलंच आहे. त्यात वाईट काय ? ”
म्हणाली,
“मला हे एवढे ढीगानी आजार. पण रिपोर्ट सगळे नाॅर्मल. पण ह्यांना काय सुद्धा होत नाय्ये, पण यांचे सगळे रिपोर्ट अॅबनाॅर्मल. असं कसं ?”
बघितलं तर खरंच नवऱ्याचे जवळपास सर्व रिपोर्ट अॅबनाॅर्मल होते. त्रास काहीही नव्हता, सहज म्हणून रिपोर्ट केलेले, ते अॅबनाॅर्मल.
आता माझ्या समोर मोठ्ठा प्रश्न होता,
औषधे कोणाला द्यायची ?
जिला त्रास आहे पण रिपोर्ट नाॅर्मल आहेत तिला, की ज्याला काहीही त्रास नाही, पण रिपोर्ट नाॅर्मल नाहीत, त्याला ?????
शेवटी लॅबवरील रिपोर्ट वरूनच खरं उत्तर मिळाले. त्यावर तीन शब्द लिहिले होते..
Please correlate clinically.
कृपया जुळवून बघा क्लिनिकली.
म्हणजे रुग्ण सांगतोय त्या तक्रारीशी जर लॅबचा रिपोर्ट जुळला तर औषध. नाहीतर नको.
म्हणजे यंत्र काहीही सांगूदेत, जर त्याचा त्रास रुग्णाला जाणवत नसला किंवा तशी शंका नसली तर यंत्र काय सांगतेय, ते महत्त्वाचे नाही. शरीर काय सांगते ते जास्त महत्वाचे !
सुटले कोडे मिळाले उत्तर!
आणि फक्त वहिनींनाच औषध दिले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.02.2017
Leave a Reply