आयुर्वेदीय चिकित्सा म्हणजे अॅलोपॅथीला पर्याय. असा जर कोणाचा समज असेल तर तो गैरसमज आहे. पॅरासीटामोलच्या ऐवजी आयुर्वेदात काय आहे असे विचारणे म्हणजे मोहोरीच्या ऐवजी बेसन आहे का असे विचारल्यासारखे आहे.
यांची तुलना कधीही करू नये. प्रत्येक पॅथीची स्वतःची अशी खास वैशिष्ट्य असतात. प्रत्येक शास्त्राचे स्वतःचे सिद्धांत असतात. त्यांचा योग्य तो आदर राखलाच पाहिजे. बीकाॅम झालेल्या विद्यार्थ्यांनी म्हणावे, बीएस्सी करून काय होणारे, बीएस्सी करत असलेल्यांनी म्हणावे आर्टस् शिकण्याची काही आवश्यकताच नाही. हे योग्य नव्हे.
मधुमेहा सारख्या आजारात रुग्णाला नेमकेपणाने काय होते आहे, त्याला काय हवेय हे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. भविष्यात अमुक होईल म्हणून आत्ता असे वागले पाहिजे ही भीती अवाजवी आहे.
नखाला भविष्यात चुकुन होणारे नखुर्डे हे कॅन्सरमधे रूपांतरीत होऊ शकते, हो किंवा नाही. या दोन पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायला सांगितला तर दुर्दैवाने याचे उत्तर हो असेच द्यावे लागते, असे आजचे वैद्यक शास्त्र सांगते. नियमावर बोट ठेवले तर भविष्यात होणारा नखाचा कॅन्सर टाळण्यासाठी आपण नखच काढून टाकूया, असा विचार करणे योग्य होईल का ? जे अस्तित्वातच नाही, त्याची भीती निर्माण करून आपली पोळी भाजून घ्यायची ? प्रत्येकाची आळीमिळी गुपचिळी. प्रत्येकाचा बिझनेस. प्रत्येकाला स्वतःची काळजी.
रक्तातली साखर वाढली तर किडनी, डोळे इ. अवयवांवर विपरीत परिणाम होतात, असे एक वैद्यक शाखा म्हणते. अवयवांवर विपरीत परिणाम होतो तो, रक्तातली साखर वाढली म्हणून की, त्यासाठी कायमस्वरूपी घ्याव्या लागणाऱ्या औषधांचे ते दुष्परिणाम आहेत, यावर अजूनही संशोधन सुरूच आहे. शिवाय मनात निर्माण झालेली भीती देखील हाॅर्मोन्स मधे बदल घडवित असतेच.
मधुमेहामधे रक्तातली साखर तपासणी, किंवा तत्सम रासायनिक तपासण्या करणे, हाच एकमेव योग्य निकष आहे, असे म्हणण्याची काहीच आवश्यकता नाही. त्या वैद्यकामधे अजूनही संशोधन सुरूच आहे. त्याचे निकष अजूनही बदलत आहेत.
आणि रक्तातल्या साखरेचा निकष खरं सांगायचं तर आयुर्वेदात सांगितलेलाच नाही. त्यामुळे मधुमेहामधे रक्तातली साखर नाॅर्मल करणे हा आयुर्वेदीय चिकित्सेचा उद्देश असूच शकत नाही. हे वैद्यांच्याच अजून ध्यानात येत नाही तर सामान्य लोकांनी तशी अपेक्षा करणे चुक नव्हे.
हा विचार समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने निदान केले जाते, त्याच पद्धतीने चिकित्सा, पथ्य अपथ्य, योग, प्राणायाम यांचा विचार केला तर चिकित्सा पूर्णत्वाला जाईल. जे सिद्धांत आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत, ते अन्य पॅथीमधे कसे बसवता येतील ? असे करणे म्हणजे गोल भोकात चौकोनी पाचर ठोकण्यासारखे आहे. कृपया असा विचार सुद्धा करू नये. नाहीतर जे पाहिजे ते (आरोग्य ) आपल्याला कधीही पूर्णत्वाने मिळणार नाही. आणि औषधे मात्र कायमस्वरूपी पूर्णपणे घ्यावी लागतील.
जर आपल्याला घोडा बनवायचा असेल तर त्याचे डोके, पोट, आयाळ तोंड आणि अगदी शेपूट देखील घोड्याचीच बनवली पाहिजे. तरच त्या कलाकृतीला घोडा असे म्हणता येईल. नाहीतर तोंड करायचे घोड्याचे, आयाळ करायची सिंहाची, पोट करायचे वाघाचे, आणि शेपूट लावायचे शेळीचे. कसा दिसेल हा प्राणी ? त्याला पूर्णत्व येणार नाही.
प्रत्येक शास्त्राची स्वतःची एक परिभाषा असते. त्याच परिभाषेत ते सिद्धांत समजून घ्यावे लागतात. तसे केले नाही तर आपल्याला जे पाहिजे ते पूर्ण स्वास्थ्य कदापि मिळणार नाही.
निदान करायचे अॅलोपॅथीनुसार, तपासण्या करून घ्यायच्या रसायनशास्त्राप्रमाणे, चिकित्सा ठरवायची आयुर्वेदानुसार, पथ्य करायचे निसर्गोपचारानुसार, आणि औषध घ्यायचे होमियो पद्धतीनुसारच्या !
याशिवाय पुष्पादिदिचे सल्ले, स्वामीजीनी सांगितलेले उपाय, वाॅटसप महाराजांचे नुस्खे आहेतच.
अशा भीतीच्या पायावर उभारलेल्या विचारसरणीने रोग कसा बरा होईल ? हे रुग्णांनी लक्षात ठेवले पाहिजे.
…..आणि वैद्यांनी सुद्धा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.02.2017
Leave a Reply