‘तू तिथं मी’ चित्रपटाची स्मिता तळवलकर तयारी करीत होत्या, तेव्हाची ही गोष्ट आहे.. दिग्दर्शक संजय सुरकर यांना रात्री एक वाजता मसाला पान खाण्याची तीव्र इच्छा झाली. आता एवढ्या रात्री पानपट्टी कुठे उघडी असणार? स्मिताताईंनी खुर्चीत बसून पेंगुळलेल्या, एका सडपातळ तरूणाला टू व्हिलरची चावी दिली व संजयची इच्छा पुरी करण्यास फर्मावले… ताे तरूण गेला व तासाभरात मसाला पान घेऊन हजर झाला! स्मिताताईंना खात्री होती की, दत्ताला एकदा काम सांगितले की, ते काम कसेही करुन तो पूर्ण करणारच.. त्या मसाला पानासाठी दत्ताला, लाॅ काॅलेज रोडवरुन नीलायम टाॅकीज गाठावी लागली होती… त्याने आपल्या कामात कोणतीही कसूर ठेवलेली नव्हती… ही त्याची कामावरील निष्ठा लक्षात घेऊनच आज दत्ता भणगे याचा ज्येष्ठ वेशभूषाकार म्हणून बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव होत आहे…
दत्ताचा जन्म १९६४ चा. तो नऊ वर्षांचा असताना काही महिन्यांच्या फरकाने आधी आई व नंतर वडिलांचे निधन झाले.. दत्ता पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला गेला. तिथे फावल्या वेळात तो पन्हाळ्याला जाऊन चित्रपटाची शुटींग पहात असे.. असाच एकदा पन्हाळ्यावर गेलेला असताना त्याने स्मिता पाटीलच्या ‘रावण’ या हिंदी चित्रपटाचे शुटींग पाहिले.. ऐतिहासिक मराठी चित्रपट ‘धन्य ते संताजी धनाजी’च्या क्लायमॅक्सचे शुटींग पाहिले व त्याने निश्चय केला की आपण याच चित्रपटसृष्टीत काम करायचे.
१९८० साली दत्ता पुण्यात परतला आणि शिंदे मेकअप सर्व्हिसमध्ये पडेल ते काम करू लागला. तिथे त्याची व सुप्रसिद्ध रंगभूषाकार, विक्रम गायकवाडशी भेट झाली. तेव्हा बालनाट्यांना चांगले दिवस होते. दीपक काळे, राजाराणा, सुनील महाजन, नितीन आरोळे, श्रीराम बडे यांची बालनाट्ये हाऊसफुल्ल चालायची. या बालनाट्यांच्या वेशभूषेची संपूर्ण जबाबदारी दत्तावर असे. अशी तीन वर्षे दत्ताने शिंदे मेकअप सर्व्हिसमध्येच मुक्काम करुन काढली. या संघर्षाच्या काळात त्याला नितीन आरोळेने अविस्मरणीय अशी साथ दिली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’ हे महानाट्य सुरू केले. या महानाट्यात १५० कलाकार व ५० सहायक होते. एवढ्या कलाकारांची ऐतिहासिक वेशभूषा सांभाळण्यासाठी फक्त चारच माणसे झटत असत.. त्यातील एक दत्ता असे. ‘जाणता राजा’चे दत्ताने हजारो प्रयोग केले. त्या निमित्ताने त्याने संपूर्ण भारत देश पालथा घातला.. तो वेशभूषेचा घेतलेला अनुभव त्याला पुढील वाटचालीसाठी महत्वाचा ठरला.
अवधुत सानेच्या ओळखीने ‘चौकट राजा’च्या पुण्यातील शुटींगसाठी दत्ताने वेशभूषेचे काम केले व स्मिताताईंच्या परिवारात तो सामील झाला. ‘सवत माझी लाडकी’, ‘तू तिथं मी’, ‘घराबाहेर’ या चित्रपटांसाठी त्याने स्वतःला वाहून घेतले. ‘तू तिथं मी’ चित्रपटावेळी मी स्थिरचित्रणाचे काम करीत असताना, दत्ता माझ्यासोबत होता.
दत्ताने दूरदर्शन मालिकांसाठीही काम केलेले आहे. ‘फुलवंती’ या भोरच्या राजवाड्यात पहिल्यांदाच चित्रीकरण झालेल्या मालिकेचा, दत्ता साक्षीदार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, राम गबाले यांच्यासह अनेक नामवंतांसोबत दत्ताने काम केलेले आहे. जेव्हा व्हिडीअो सीडींची लाट होती तेव्हा राजू फुलकर यांच्या अनेक धार्मिक, पौराणिक सीडींसाठी वेशभूषेची जबाबदारी त्याने पार पाडलेली आहे.
कोरोनानंतर चित्रपट व मालिकांची कामे कमी होऊ लागली. पूर्वी त्याने रघुनाथ ड्रेसवालाचे मालक मिलिंद व सचिन करंबळेकर यांच्या दुकानात दहा वर्षे त्याने पगडी तयार करण्याची कला अवगत केली. आधी तो सिंहगड रोडला रहात होता, आता विश्रांतवाडीला राहतोय. अलीकडेच त्याने ‘भागिरथी मिसींग’ या मराठी चित्रपटासाठी काम केलेले आहे.
पुलंच्या ‘नारायण’च्या अंगात जसं लग्नघर म्हटलं की बाराहत्तीचं बळ संचारतं, अगदी तसंच दत्ताला चित्रपटाचं काम मिळालं की होतं.. तो शुटींग संपेपर्यंत लढत असतो.. त्याच्या सोबतचे २५ वर्षांपूर्वीचे काळू, दशरथ, डामसे असे अनेक मित्र आपापल्या व्यवसायात मग्न आहेत. चार तपांच्या मेहनतीनंतर आता साठीला पोहोचलेला दत्ता मित्रांना भेटण्यासाठी नारायण पेठेत येऊन जातो. ज्येष्ठ कलाकारांना मिळणार्या मानधनातून सध्या त्याचा चरितार्थ चालू आहे. आज ५६व्या बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ वेशभूषाकार या बालगंधर्व पुरस्काराने दत्ता भणगे यास नाट्य-चित्रपटसृष्टीमध्ये चाळीस वर्षाहून अधिक काळ केलेल्या कारकीर्दीबद्दल नक्कीच कृतकृत्य वाटेल यात शंका नाही…
हा बालगंधर्व पुरस्कार मिळाल्याबद्दल सिनेमा, सिरीयल, व्हिडीओ सीडी व बालनाट्य या साडेतीन पीठाचे संवर्धन करणार्या दत्ता भणगेचे, मनःपूर्वक अभिनंदन!!!!!
– सुरेश नावडकर
पुणे २५/६/२४
मो. ९७३००३४२८४
Leave a Reply