नवीन लेखन...

बाप आणि लेक

काय गंमत असते पहा. अचानक एक दिवस लग्न होऊन घरातली लाडकी लेक सासुरवाशीण होते, आणि आम्हा बापांना ना, खरंच खूप एकटेपण येऊन जातं. आता हे एकटेपण कसलं असतं, खरंच नाही सांगता येत. घरात लग्नाची प्रेमळ ?बायको असते, लाडका लेक असतो, म्हणजे शब्दशः एकटेपण मुळीच नसतं. तरीही….. म्हणजे नाही…..खरंच कळत नाही, हे एकटेपण कसलं असतं. हे रितेपण समजूतदार असलेला लेकही भरून काढू शकत नाही, सहधर्मचारीणी…??? असो !
होतं काय की लग्नानंतर अधून मधून लेक माहेरी येऊन जाते,. तास दीड तास किंवा अगदी दोनेक तास बसते, गप्पा, धमाल सुरू असते, जुन्या गोष्टींना उजाळा मिळत असतो, आणि अचानक ती म्हणते,
“चला, निघते. बराच उशीर झाला ग ! बराच वेळ बसले मी”.
आनंदात असलेलं मन अचानक भानावर येतं.
‘नाही ‘ हे उत्तर माहीत असूनही मी आशेने म्हणतो,
“रहा ना आज, उद्या जा सकाळी”.
यावर ती हसून माझ्याकडे पहाते, आणि म्हणते,
“रहा काय पप्पा ? आताच ता राहायला येऊन गेले ना?”

हे ‘आताच ‘ म्हणजे चार महिन्यांपूर्वी असतं. मग ती दुसऱ्या दिवसाच्या कामांची जंत्री सांगायला सुरवात करते. खट्टू झालेलं मन थोडसं कातरही होतं खरं, पण तिचा सासरचा ओढा सुखावूनही जातो. तसं पाहायला गेलं तर आमच्या घरापासून तिचं सासर फार फार तर अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. हे लेकीचं सासर जवळ असणं म्हणजे कधीही जाता येतं, या सबबीवर कित्येक दिवस जाणं होतच नाही. अगदी लग्न होऊन सासरी निघाल्याच्या दिवसापासून तेच बोलणं रिपीट होत असतं,
“अरे येईन कधीही, जवळच तर आहे”,
“तुम्ही या हो कधीही, लेकीला पहावसं वाटलं की तडक यायचं.”
“नाहीतर तिला घेऊन जायचं राहायला काही दिवस.”
“लांब थोडच आहे ?”

पण खरं सांगू का ? हे काहीही घडत मात्र नाही, आणि आम्ही बाप लोक फार उदास होऊन जातो हो.
तसं पाहिलं तर, लेकीला हाताचा पाळणा वगैरे करून, रात्र रात्र जागून, त्यांची आजारपणं काढून मोठं करण्यात बराचसा किंवा max. वाटा तिच्या आईचाच असतो. आम्ही बाप आपले हातभार लावून ममं म्हणण्यापुरतेच. म्हणजे अगदी सरसकट विधान नाही करणार मी. अहो, आजच्या पिढीतले बाप तर संगोपनाच्या बाबतीत आमच्या पिढीच्या अनेक पाऊलं पुढे आहेत. आपल्या बायकोच्या बरोबरीने ते रात्री जागतात,( म्हणजे आपत्यासाठी)
डायपर बदलतात, छान जोजवतात, फेऱ्या मारत झोपवतात. अगदी मनापासून न कंटाळता सगळं करतात.(न करून सांगणार कुणाला?) नेटवर मुलांना आवश्यक अनेक गोष्टींचा शोध घेऊन, त्याच्या असली नकलीपणाची शहानिशा करून , डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांना हवं नको ते सारं पहातात. आम्ही हे खरंच काही केलं नाही. आमच्या बायकांनिही,( म्हणजे जनरल विधान करतोय म्हणून अनेकवचन वापरलं)

‘सकाळी ऑफिसला जायचं असतं, कशाला रात्रीचं उठवायचं’ असा विचार करून, आमचं कौतुक केलं आणि सगळं आपणच करत राहिल्या. त्यामुळे आमचंही चांगलंच फावतं. म्हणजे रात्रीच्या शांततेत लेकीच्या रडण्याचा आवाजाने जाग आलेली असायची, पण दर्शवायचं असं की, इतकी गाढ झोप लागलीय की काही म्हणून ऐकू येत नाहीय. जरासा त्रासिक चेहरा करून कुस वळवायची. आणि शी शू काढण्यापासून तर मी तरी फारच लांब. म्हणजे सांगायचा मुद्दा काय ? तर लहानपणी तिच्यासाठी बाप म्हणून फारशी….किंवा बरीचशी अंगमेहनत केलेली नसते, तरीही घरात कलेकलेने वाढणारी लेक बापाच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदी करत असते. सकाळी ऑफिसमध्ये जाताना तिचा चेहरा डोळ्यांसमोर ठेवणारा बाप, संध्याकाळी घरी येताना, घरात शिरताच तिचं रूप दृष्टीसमोर येणार या विचाराने खूप खूप आनंदात असतो. घरात शिरताच दिवसभराचा सारा शीण, ताप,ताण सगळं विसरून तिला उचलून घेतो.

आपल्याला पहिला मुलगाच हवा, मुलगा म्हणजे कुळाचा उध्दारकर्ता , मुलगी काय परक्याचं धन असले विचार तर आम्हा दोघांच्याही मनाला कधी शिवले नाहीत. मुलीच्या जन्मानंतर आठ वर्षांनी आमच्या घरात एका गोड लेकाचा जन्म झाला, ही गोष्ट वेगळी.

माझ्या लेकीच्या बाबतीत मी किती हळवा आहे, हे आमच्या नात्यात अगदी सगळ्यांना माहीत आहे. पुढे शाळा कॉलेज मध्ये आपल्या बुद्धिमत्तेने तिने स्वतःला नेहमीच अव्वल स्थानी ठेवलं. अभ्यासासोबत इतर उपक्रमातही ती नेहमीच पुढे राहिली. लहानपणी खाण्या जेवण्याच्या बाबतीत मात्र जो त्रास तिने दिलाय तो विसरणं अशक्य आहे. दोन दोन तास दूध, खाणं,जेवण चालायचं. बायको हैराण होऊन जायची. पुढे स्वतःच्या हाताने जेवायखायला लागल्यावरही तासभर जेवण चालायचं. गोव्याच्या भाषेत सांगायचं तर सुशेगाद.(माझी बायको गोव्याची आहे ना !)
माझ्या लेकापेक्षा ती आठ वर्षांनी मोठी. त्याच्यासाठी मात्र ती idol होती आणि आजही आहे. म्हणजे सांगू का ? तिच्यावरच्या त्याच्या प्रेमामध्ये असलेला आदर आणि भारावलेपण, तिचं लग्न होऊन आज पाच वर्ष उलटून गेल्यानंतरही अगदी तस्सच आहे. आपल्या ताईशी तो खूप खूप attached आहे. आज तो ही पांचविशित पोहोचला आहे, पण गंमत म्हणजे, आजही ताई येणार हे समजताच त्याचं सुरू होतं,
“किती वाजता येणार ताई”?
“किती वेळ असणार ती आपल्याकडे ?”
“तिला रहायलाच सांग ना ”
त्याचा आणखी एक ठाम समज आहे की, मी ताईला काही सांगितलं की ती ते ऐकणारच. म्हणून मग तो माझ्या मागे लागतो ,
“पप्पा, सांग ना तिला रहा म्हणून. तू सांग मग ती ऐकेल.”
असं त्याचं सारखं सुरू असतं.
ती घरी आली, की याला फक्त तिच्यासोबत वावरायचं, थट्टा,मस्करी करत राहायचं असतं. आणि आमच्या प्रचंड प्रयत्नांनी ती राहायला कबूल झालीच, की आमच्या घरात कमालीचा आनंद पसरतो. प्रत्येकाच्या आनंदाचं स्वरूप वेगळं असतं. बायको तिला कोणकोणते पदार्थ खायला करून घालायचे, तिच्या आवडीच्या fish च्या कोणत्या रेसिपीज करायच्या या विचारात दंग असते, माझा लेक, ताई येणार म्हणजे संपूर्ण दिवस ते रात्री उशिरापर्यंत ती आपल्याला मिळणार, धम्माल मस्ती करायची या आनंदात तर मी, ती रहाणार तितके दिवस तिला पहात राहायचं, भरपूर मनसोक्त गप्पा मारायच्या, जुन्या स्मृती उजळवायच्या या आनंदात. त्याचबरोबर तिने कबूल केलेले दिवसही मोजत असतो. एकूण काय ? ती असेपर्यंतचे ते दोन तीन दिवस(हो, याच्या वर ती रहात नाही) भुर् कन उडून जातात आणि मग जाण्याच्या दिवशी ती

सकाळी निघणार असेल तर ,
“दुपारी जेवूनच जा ना”
दुपारी निघणार असेल तर,
“संध्याकाळी चहा घेऊनच निघ”
आणि संध्याकाळी निघणार असेल तर,
“आता जेवूनच जा ग रात्री. ”
असं करत तिचा माहेरचा मुक्काम तासानी, मिनिटांनी वाढवत रहाण्याचा आम्ही प्रयत्न करत रहातो. ती घराबाहेर पडली, की माझा लेक पुन्हा मूळपदावर येतो. मूळपदावर म्हणजे, त्याच्या बेडरूममध्ये, त्याच्या कामाच्या आणि त्याच्या विश्वात शिरतो. ताई असेपर्यंत हे सगळं त्याने पूर्णपणे बाजूला ठेवलेलं असतं. आतून तो अस्वस्थ असतो. मध्येच बाहेर येऊन म्हणतो,

“काय हे ! जास्त दिवस का नाही रहात ताई? लगेच जाते आपली.”
तसा तो मितभाषीच, पण ताई घरात असेपर्यंतचे दिवस भारावलेले असतात, त्यामुळे थोडा वेळ आमच्यासोबत बसून गप्पाही मारतो. ते आनंदाचे क्षण त्याला विसरायचे नसतात, इतका तो बहिणीच्या बाबतीत possessive आहे.
खरं सांगू का ? मलाही अगदी असच वाटत असतं. आतून अस्वस्थ खूप वाटत असतं. पण आपल्या वयाची बूज राखून मी उद्गारतो,
“अरे तिचं आता लग्न झालंय. ती आता काही फक्त तुझी ताई राहिलेली नाही. एका घराची सून झालीय. आपल्याला हवं तितके दिवस ती कशी रहाणार सांग बरं ?”

हे त्याला समजावताना माझाच स्वर ठाम नसतो, हे मलाही जाणवत असतं. पण माझी लेक ना, खूप ठाम आहे, एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्णझाल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. हा गुण तिने तिच्या आईकडून घेतलाय. कुणाच्याही दबावाखाली ती येत नाही. तितकीच ती समजुतदारही आहे. क्षणाक्षणाला आमच्यासारखी( म्हणजे मी आणि माझा लेक) हळवी होत नाही. आपलं करिअर तिने चढत्या मार्गाने सर केलय. लग्नानंतर गेली दोन वर्ष ती एकटीच परदेशात असतानाही, येणारा प्रत्येक सण,सगळ्या गोष्टींसहित ती साजरा करत होती. अर्थात या गोष्टी अनेक लेकी करत असतीलही. आम्हाला आपलं स्वतःच्या लेकीचं कौतुक. निराश वगैरे ती होत नाही आणि कधी आलीच निराशा तर ती तिच्या चेहऱ्यावर जराही दिसत नाही. तर मुद्दा काय? जेव्हढा आळशीपणा माहेरी असताना ती करत होती, तितकीच सासरी ती उत्साहात असते म्हणा किंवा ती समज त्यांना येते म्हणा.

तिच्या अगदी उलट माझा लेक. कोणत्याही बाबतीत चटकन nervous होणारा, जराशा अपयशाने हवालदिल होणारा , फार विचार न करता लगेच surrender होणारा, शालेय जीवनात अभ्यासाला जरा दूरच ठेवणारा आणि मस्तीला प्रचंड प्राधान्य देणारा. इथे मला एक किस्सा मनापासून सांगावासा वाटतोय. बऱ्याच वर्षांपूर्वी मी चार चाकी घेतली. त्यापूर्वी ट्रेनिंग स्कूल लावून शिकलो चालवायला. कॉन्फिडन्स जरा कमीच होता, तरी लेकीला कॉलेजमध्ये सोडायला जायचो. एकदा असाच तिला सोडायला निघालो, तर मुलगाही सोबत आला. एका सिग्नलला आम्ही थांबलो. सिग्नल हिरवा झाला पण थोडासा चढ असल्याने गाडी पुढे जाईना. घुरघुर करत तिथेच. मागून ट्रॅफिकच्या हॉर्नचे आवाज सुरू झाले. मला तर घामच फुटला. त्यातच गाडी रिव्हर्स गेली आणि एका ऑटो रिक्षाला धडकली. मागे बसलेला माझा लेक इतका घाबरून गेला, आणि म्हणू लागला,
“मला नाही बसायचं गाडीत. मी जातो.”

मला तर काय करावं तेच कळेना. या सगळ्यात माझी लेक मात्र शांत होती. तिने आधी मला स्थिर केलं, धीर दिला, भावाला रागावून गप्प केलं. मी ही थोडा शांत झालो आणि पुन्हा स्टार्ट केल्यावर गाडी सुरू झाली. आता हे सगळं लेकाने कोणाकडून घेतलय सांगायला नकोच. दहावी शालांत परीक्षेनंतर मात्र त्याने भरारी घेतली. ताईमधल्या सगळ्या सकारात्मक गोष्टी जराही आत्मसात न करूनही, त्याचं तिच्यावरचं आदरयुक्त प्रेम, आणि सुरवातीला मी म्हटल्याप्रमाणे असलेलं भारावलेपण अगदी आजही थोडंसुद्धा कमी झालेलं नाही. आज तो ही तिच्या मार्गाने चालण्याचा मनापासून प्रयत्न करतोय. त्याला आपल्या ताईसारखं व्हायचंय, अनेक गोष्टी तीच्याप्रमाणे achieve करायच्या आहेत. तिच्यासारखच बनायचंय. स्वभाव आड येतो पण वाटणं मनापासुनचं आहे. आपल्या आई पप्पासाठी, आपल्या घरासाठी तिने खूप काही केलंय आणि ताईच्या पावलांवर पाऊल ठेवून लेकही वाटचाल करतोय.

अगदी दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट. लेक आणि जावई संध्याकाळी घरी आले होते, आणि हि ने त्याचवेळी मुलाला काहीतरी आणायला बाहेर पाठवलं. रागाने फडफडतच तो गेला. राग कसला होता माहित आहे ? तेव्हढा वेळ त्याला ताईचा सहवास कमी मिळाला याचा. अगदी ती दोघं गेल्यावरही याची रागाने बडबड सुरू होती. तो भावना बोलून, रागावून व्यक्त करू शकतो, कारण तो लहान आहे, शोभून दिसतं त्याला. पण बापाचं काय ? आम्ही बाप लोक कितीही वाटलं तरी असं वागू शकत नाही, ती गेल्यावर येणारं एकटेपण दाखवूही शकत नाही, आणि मनाची चलबिचल थांबवून शांत बसूही शकत नाही.

आज २८ मे, माझ्या लेकीचा आणि आईसमान निर्व्याज प्रेम दिलेल्या माझ्या ताईचा वाढदिवस. माझ्या ताईचं लग्न झाल्यावर आलेलं प्रदीर्घ रितेपण , आमच्या पोटी लेकीने जन्म घेतल्यावर संपलं. आणि तिच्या लग्नानंतर पुन्हा आलेलं एकटेपण कदाचित घरात सून प्रवेश करेल तेव्हाच संपेल बहुधा.
तुमचा काय अनुभव ???

प्रासादिक म्हणे

–प्रसाद कुळकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..