पुण्यात सातारकडचं कोणी भेटलं की, त्याच्याबद्दल मला जरा जास्तच ‘आपुलकी’ वाटते. साहजिकच आहे, मी सातारचा, तर ‘प्रत्येक सातारकर’ माझाच ना? झालं असं की, तात्या ऐतवडेकरांच्या ‘ग्राफिना’ मधून पुण्यातील, पुण्याबाहेरील असंख्य माणसं कामाच्या निमित्ताने आली, भेटत राहिली. त्यांच्याशी स्नेहसंबंध जुळले, ते कायमचेच.
तीस वर्षांपूर्वी अशीच एक बापलेकाची जोडी ऑफिसवर आली. आम्हा दोघांना त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले, ‘आम्हाला कलर फोटोंचे कटींग पेस्टींग करुन पाहिजे.’ आम्ही त्यांना बसायला सांगितले. कांबळेंनी स्वतःची ओळख करुन दिली, ‘मी चित्रकार कांबळे व हा माझा मुलगा सचिन कांबळे. आम्ही सातारचे. पोर्ट्रेटची काम करतो.’ त्यांनी केलेल्या कामांचा फोटो अल्बम दाखवला. फोटोवरुन त्यांचं फिगर ड्राॅईंग चांगलं असल्याचं दिसून आलं.
कांबळेंच्या खांद्यावर नेहमी एक मोठी काळ्या रंगाची जड प्रवासी बॅग असायची. कांबळे वयानं पन्नाशीचे असावेत. हेअर डाय केल्यामुळे ते चाळीशीचे दिसायचे. तेल लावून चकाकणाऱ्या केसांचा त्यांनी उजवीकडून डावीकडे भांग पाडलेला होता. सावळा रंग, सतत पान खाण्याच्या सवयीने तोंड लाल झालेले, तलवार कट मिशी, अंगातील निळा शर्ट पांढऱ्या पॅन्ट मध्ये खोचून त्यावर काळा पट्टा लावलेला. पायात सातारी चपला. सुपुत्र सचिनचे वय सोळा सतरा असावे. तब्येतीनं किरकोळ असलेला सचिन वडिलांचीच ‘रिडक्शन झेरॉक्स काॅपी’ होता. कांबळेंचं तोंड अखंड चालू असायचं. कोणत्याही विषयावर कंटाळा येईपर्यंत बोलण्याची त्यांची खासियत होती. बाप बोलत रहायचा व सचिन फक्त हसायचा. तो कधीही स्वत:हून एक शब्दही बोलला नाही.
महिन्यातून एकदा तरी ही जोडी यायचीच. सकाळी दहा वाजता आले की, त्यांना दुपारी काम हवं असायचं. काम देऊन ते जेवण करायला जायचे. जेवण करुन तासाभराने येऊन बसायचे. झालेले काम देऊन कामाचे पैसे सांगितले की, कांबळे असा काही अभिनय करायचे की, आम्हालाच वाटू लागायचं कांबळेंकडून पैसे घेणं म्हणजे आपण त्यांच्यावर फार अन्याय करतो आहोत! कामाचे पैसे कांबळे सचिनच्या हस्ते देत असत. पैसे दिल्यावर, ते सचिनला आमच्या पाया पडायला सांगत असत. या त्याच्या कृत्याने आम्हाला ‘आपण कोणीतरी फार मोठे, ज्येष्ठ असल्यासारखे’ वाटत असे. कांबळे तसे हुशार होते. त्यांनी आधीच कामाचे बजेट ठरवलेले असायचे. त्या बजेटच्या बाहेर ते कधीच गेले नाहीत.
आम्ही चित्रपटाची डिझाईन करतो हे त्यांनी पाहिले होते. त्यांनाही मराठी चित्रपटाचे वेड होते. मराठी चित्रपटसृष्टीतील सचिन पिळगांवकरशी त्यांची ओळख होती. त्याच्या समवेतचे फोटो त्यांनी आम्हाला दाखवले. एकदा का आपण कांबळे आणि सचिनची ओळख मान्य केली की, कांबळे त्या प्रसंगाला मसाला लावून सांगत सुटायचे. सचिन आम्हाला घरच्यासारखं वागवतो.. त्यांच्या घरातील सर्व मंडळी आम्हाला ओळखतात..मी एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.. त्यामध्ये सचिन पिळगांवकर व सचिन कांबळे एकत्र काम करणार आहेत.. चित्रपटाचं नाव आहे ‘लक्ष्मी तू लक्ष्मी’!
हा किस्सा झाला मराठीचा! कांबळे एवढे फेमस की, ते स्वप्नसुंदरी हेमामालिनी पर्यंत जाऊन पोहोचले होते. मी हेमामालिनीकडे गेल्यावर तिने माझे स्वागत कसे केले, हे साअभिनय करुन रंगवून सांगायचे. या गोष्टीला पुरावा म्हणून अल्बममध्ये हेमाबरोबर काढलेला ग्रुप फोटो होताच. मुंबईला गेल्यावर ‘कांबळे जोडी’ कदाचित आमच्या प्रमाणेच अनेक मराठी-हिंदी कलाकारांना भेटून, त्यांना भंडावून सोडत असावी.
कांबळेंबद्दल आम्हाला काही वेळा हे खरंच चित्रकार असावेत का? अशी शंका येत असे. कारण त्यांनी स्वत:चा काम करताना फोटो दाखवला नाही. कधी कागदावर स्केचसुद्धा काढून दाखवलं नाही. त्यांनी सातारमधील रहाण्याचा पत्रव्यवहाराचा पत्ता कधीही दिला नाही. सातारा सिटी बाहेर ते रहायचे असं मोघम सांगितलं होतं. आम्ही सातारमध्ये हिंडताना देखील ते कधीही आम्हाला दिसले नाहीत.
पाच सहा वर्षं ते आमच्याकडे येत होते. नंतर तर त्यांचं येणं बंद झालं. इतक्या वर्षांनी मोठे कांबळे वृद्धापकाळामुळे बाहेर पडत नसतीलही, किमान सचिन तरी कामा निमित्ताने पुण्यात आल्यावर दिसायला हवा होता. त्यांच्याबद्दल कळायला काहीएक मार्ग नाही. त्यांनी काढलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पोर्ट्रेटची एक फोटो प्रिंट आम्ही जपून ठेवलेली आहे. ती पाहिल्यावर सातारचे कांबळे पिता-पुत्र आठवतात…
सचिन कांबळे आता मोठा बाप्या झाला असेल. त्याचं लग्नही झालेलं असेल. कदाचित एखाद्या दिवशी ‘दत्त’ म्हणून आमच्यापुढे येऊन जोडीनं उभा राहिल आणि वडिलांनी घडविलेले संस्कार आठवून, नम्रपणे वाकून आम्हा दोघांना नमस्कार करेल….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
६-९-२०.
Leave a Reply