आषाढी कार्तिकी
जसा पाहतसे वाट
तसा माझा बाप
गावी उभा राऊळी
डोळ्यात जशी विठूच्या
प्रतीक्षा लेकरांची
म्हाताऱ्या बापाचीही
अवस्था तीच
त्याला तरी आहे
विटेची सोबत
थकलेला माझा बाप
उरे एकाकी
आणावे वाटते
शहरात त्याला
पण नाही हवा
म्हणे मानवत
उमगते मला
तगमग त्याची
पण भ्रांत पोटाची
करी हतबल
गावच्या मातीशी
त्याची नाळ जुळलेली
अन् शहराच्या बेड्या
माझ्या पायी बांधलेल्या
समजून घेतो बाप
अडचणी साऱ्या
दडवून दुःख
ठेवी अंतरात
भक्ताच्या मनीचे विठू
जाणतसे गुज
तसे माझे मन जाणे
बाप विठूराया
– महेन्द्र कोंडे
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply